-->
या घोटाळ्याला जबाबदार कोण?

या घोटाळ्याला जबाबदार कोण?

रविवार दि. 18 फेब्रुवारी 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
या घोटाळ्याला जबाबदार कोण? 
-------------------------------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी आपल्या गेल्या चार वर्षाच्य राजवटीत कोणताही भ्रष्टाचार न झाल्यचे अनेकदा भाषणात उल्लेख केले आहेत. यापूर्वी सत्तेत असणार्‍या कॉग्रेसच्या राजवटीत अनेक महाकाय घोटाळे झाले, भ्रष्टाचार झाले व त्याचे भांडवल करुन भाजपा सत्तेत आले. परंतु यातील त्यावेळच्या महाकाय समजल्या जाणार्‍या टू जी घोटाळ्यातून कॉग्रेसची सुखरुप सुटका झाली आहे. त्यामुळे अब्जावधी रुपयांचा म्हणून ओळखला गेले हा घोटाळा झालाच नाही, सर्व तो बातम्यांनी केलेला फुगवटा होता, हे कोर्टातही सिध्द झाले आहे. असा स्थितीत आपल्या राज्यात एकही भ्रष्टाचार झाला नाही असे सांगत असलेल्या पंतप्रधान मोदींना धक्का देणारा हा पंजाब नॅशनल बँकेचा हा महाघोटाला उघडकीस आला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यातील मुख्य आरोपी असलेला नीरव मोदी याचे भाजपा कनेक्शनही उघड होत आहे. अर्थात याची जबाबदारी ही बँक व्यवस्थापनाची जशी आहे तशीच ती सरकारचीही आहेच. याचे कारण म्हणजे, ही सरकारी मालकीची बँक आहे व नीरव मोदी याला सत्ताधार्‍यांचा आशिर्वाद आहे. देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणे समजल्या जाणार्‍या अंबानी कुटुंबाशी त्याचे जवळचे संबंध आहेत. धीरुबाई अंबानी यांची नात, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांची भाची इशिता साळगावकरचे लग्न नीरव मोदीचा लहान भाऊ निशाल मोदीशी झाले आहे. इशिता ही दीप्ती साळगावकर यांची कन्या आहे. दीप्ती या धीरुभाई अंबानी यांच्या कन्या आहेत. साळगावकर कुटुंबही गोव्यातील मोठे उद्योजक घराणे आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या दोन कर्मचार्‍यांनी फसवणुकीद्वारे बँकेच्या परदेशातील शाखांमधून नीरव मोदी व त्यांच्या कंपन्यांना कर्ज उभारणीसाठी बनावट हमीपत्रे जारी केली. त्याविषयी बँकेच्या यंत्रणेत कोणतीच नोंद झाली नव्हती. या संशयाच्या आधारेच बँकेने कंपन्यांविरोधात पहिली तक्रार दिली होती. आता हा निरव मोदी देश सोडून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात, म्हणजे जानेवारीत 280 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गुन्हा निरव मोदीविरोधात दाखल करण्यात आला आहे. विजय माल्या पळून गेला तसा निरव मोदीदेखील पळून गेल्याने आता भारतीय यंत्रणांची नाचक्की पुन्हा एकदा झाली आहे. गुन्हा दाखल होण्याच्या आधीच निरव मोदीने देशातून पळ काढला आहे. याचाच अर्थ, आपल्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण या मोदीला लागली असणार. निरव मोदीने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच भारतातून पलायन केले. आता भारतात येईल यावर कोणताही भारतीय विश्‍वास बसणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्याच महिन्यात दाहोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते. याला एक महिनाही झालेला नाही. त्या वेळी घेतलेल्या छायाचित्रात इतर व्यापार्‍यांसोबत निरव मोदीदेखील दिसत आहे. म्हणजे, हा महाघोटाळेबाज पंतप्रधानांसोबत मिरवत होता. चांगले प्रशासन हे पंतप्रधान मोदींचे हेच की काय असा सवाल देखील उपस्थित होतो. देशातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये घोटाळे होण्याचे प्रमाण जास्त आहे. खासगी बँकांमध्ये असा प्रकारचे घोटाळे होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. याचे नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित होतो. 122 वर्षांची परंपरा असलेल्या व देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेतही एवढा मोठा घोटाळा होईल याची कल्पना नव्हती. देशभरात 10 कोटी खातेदार, 6941 शाखा, 904 कोटीचा निव्वळ नफा, 57 हजार 630 कोटीची बुडीत कर्जे असलेली स्टेट बँकेनंतरची सर्वात मोठी बँक असा पीएनबीचा लौकिक आहे. केतन पारेख, हर्षद मेहता, सी.आर. भन्साळी यांच्यासारख्यांचे कोट्यावधी रुपयांचे घोटाळे हे अशा प्रकारे बँकांना केंद्रीभूत ठेवून झाले. परंतु हे घोटाळे होत असताना ते पुन्हा होऊ नयेत यासाठी बँकांनी कोणताही नवी यंत्रणा अथवा नवीन नियम तयार करण्याची तसदी घेतली नाही. मद्यसम्राट विजय मल्ल्याने बँकांना टोपी लाऊन विदेशी पलायन केल्यावरही त्यातून सरकारने अथवा बँकांनी धडे घेतले नाहीत. मल्ल्याला देशाबाहेर पाठविण्यात ही सर्व यंत्रणा सज्ज होती असेच दिसते. कारण मल्ल्या मोकळा सुटल्यामुळेच अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी 11 हजार 400 कोटींचा चुना लावून पोबारा करू शकला. आतापर्यंत बंकेचे  10 कर्मचारी निलंबित झाले. सर्व काही उघड झाल्यावर ईडीने नीरव मोदीच्या घरासह 9 ठिकाणांवर छापे टाकले, सीबीआय चौकशी वगैरे सोपस्कार पार पडतील. दरम्यान, हर्षद मेहताच्या अगोदरपासून सरकारी बँकांना कैक ठकसेन भेटले, 2015 मध्ये बँक ऑफ बडोदात 6 हजार कोटींचा घोटाळा उघड झाला त्यातूनही कोणी धडा घेतला गेला नाही. आपल्या देशातील बँकिंग पध्दतीत अजून बर्‍यात सुधारणा कराव्या लागणार आहेत हे ओळखून त्यादृष्टीने पावले टाकणारे रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन सध्याच्या मोदी सरकारला नकोसे झाले. आपल्याकडे बँकिंग व्यवस्था पारदर्शक व्हावी यासाठी पावले टाकणे कोणत्याही परिस्थितीत आवश्यकच होते. परंतु तसे करणे हे आपल्या देशातील राज्यकर्त्यांनाही परवडणारे नाही. कारण त्यांना आपले हितसंबंध जपण्यासाठी या राष्ट्रीयीकृत बँकांना वापरावयाचे असते. त्यामुळेच बँकिंग प्रशासनात सुधारणा आणण्याच्या, कार्यप्रणाली अधिकाधिक नितळ करण्याच्या दृष्टीने ठोस पावले पडली नाहीत. घोटाळेबाजांचे सत्ताधार्‍यांशी लागेबांधे असतात त्यामुळे प्रत्येक वेळी अडचणीत बँका आल्या, हा आपल्याकडील इतिहास आहे. डायमंड किंग अशी ओळख असलेल्या नीरव मोदीचे मुंबई, दिल्लीपासून लंडन, हाँगकाँग, न्यूयॉर्कपर्यंत 25 लक्झरी स्टोअर्स आहेत. प्रियांका चोप्रा, सिद्धार्थ मल्होत्रा, केट विन्सलेट, डकोटा जॉन्सन हे त्याचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. एकूणच हा घोटाळा दिसतो तेवढा सहज होणे शक्य नाही. अर्थातच त्यासाठी राजकारण्यांचे आशिर्वाद लाभले असण्याची शक्यता मोठी आहे. त्यामुळे याची जबाबदारी निव्वळ बँकांवर नाही तर त्यांच्या मालकीच्या असलेल्या सरकारचीही आहे. आमच्या राज्यात घोटाळे झाले नाहीत असा दावा करणार्‍या नरेंद्र मोदींचे पोल खोल झाले आहे.
-------------------------------------------------------------

0 Response to "या घोटाळ्याला जबाबदार कोण? "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel