-->
यथोचित सन्मान

यथोचित सन्मान

सोमवार दि. 29 जानेवारी 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
------------------------------------------------
यथोचित सन्मान
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने यंदा जाहीर झालेले पद्म पुरस्कार पाहता बहुदा यावेळी त्यावरुन कोणतेही वादळ उठणार नाही असेच दिसते. कारण सरकारने यावेळी या पुरस्कारांची निवड करताना कोणतेही वाद उफाळून येऊ नयेत याची पूर्ण खात्री घेतलेली दिसते. त्याबद्दल सरकारचे अगोदर आभार मानवयास हवेत. कारण देशातर्फे दिले जाणारे हे सर्वोच्च पुरस्कार हे वादाचे कारण ठरता कामा नये असा एक संकेत आहे. आजवर मग ते सरकार कोणतेही असो अनेकदा अशा प्रकारचे पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यावरुन वाद उफाळून येतात. अनेकदा विजेत्यांची लायकी काढली जाते. मात्र ते चुकीचेच आहे. अनेकदा सरकार हे पुरस्कार देताना आपले राजकीय हेतू डोळ्यापुढे ठेवून निर्णय घेते, हे देखील चुकीचेच आहे. परंतु यावेली सरकारने खरोखरीच यथोचित व्यक्तींचा सन्मान केला आहे, असेच म्हणावे अशा व्यक्ती आहेत. आपल्या जादुई संगीताने जगातील चित्रपटरसिकांना मंत्रमुग्ध करणारे इलय्याराजा, ज्येष्ठ गायक शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खॉँ, केरळातील साहित्य-शिक्षण क्षेत्रातील नामवंत परमेश्‍वरन यांना पद्मविभूषणाने सन्मानित केले आहे. देशाच्या क्रिकेट संघाटा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोणी, बिलियर्डसमधील भारतीय स्टार खेळाडू पंकज अडवाणी यांच्यासह नऊ जणांना मद्मभूषण हा सन्मान बहार झाला आहे. त्याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींमध्ये आरोग्याच्या प्रश्‍नावर काम करणारे दाम्पत्य डॉ. अभय व राणी बंग यांना पद्मश्रीने सन्मानित केले आहे. गडचिरोलीच्या भागात त्यांनी उभारलेला सर्च हा प्रकल्प आणि त्याव्दारे आदिवासींच्या आरोग्याची सेवा हे त्यांचे कार्य मोठे आहे. केवळ शहरात राहून पैसा कमविण्यासाठी आपली प्रॅक्टिस न करण्याचे व्रत घेऊन या दाम्पत्याने आदिवासी समाजाच्या उथ्थानाचे काम गेल्या तीस वर्षात केले आहे. आजवर या दाम्पत्याने जे काम केले आहे, त्यांच्या कामाची सरकारने पावती या सन्मानाने दिली आहे. त्याशिवाय विज्ञान खेळणी लोकप्रिय करणारे पुण्याचे अवलिया संशोधक अरविंद गुप्ता, ज्येष्ठ विचारवंत गंगाधर पानतावणे, अभिनेते मनोज जोशी, सिकल क्षेत्रातील कार्याबद्दल मरणोत्तर संपत रामटेके, देशाला पॅराऑलिंपिकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे मुरलीकांत पेटकर या व 73 जणांना पद्मश्रीने सन्मानित केले जाणार आहे. गोव्याचे जागतिक किर्तीचे चित्रकार लक्ष्मण पै, आपल्या सतारवादनाने रसिकांना भूरळ पाडणारे अरविंद पारिख, गायिका शारदा सिन्हा, वेदप्रकाश नंदा, रामचंद्र नागास्वामी, रशियाचे राजदूत अलेक्झांडर कडाइकिन यांना मरणोत्तर हे सन्मान प्राप्त झाले आहेत. दलित साहित्य व त्याच चळवळीतील एक ज्येष्ठ विचारवंत म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना ओळखतो त्या गंगाधर पानतावणे यांचा देखील यानिमित्ताने झालेला सन्मान यथोचितच म्हटला पाहिजे. अस्मितादर्शन या त्रैमासिकाचे संपादन व प्रकाशन ते प्रदीर्घ काळ करीत आहेत. 1965 सालच्या भारत-पाकिस्तान युध्दात आपला हात गमावलेले लढवय्ये सैनिक मुरलीकांत पेटकर यांनी आपल्या अपंगात्वावर मोठ्या जिद्दीने मात केली व पॅराऑलिंम्पिकमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांच्या या जिद्दीची दखल घेऊन सरकारने त्यांना सन्मानित करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. अशाच प्रकारे जवळजवळ प्रत्येक सन्मानित व्यक्तीचा आदर्श ठेवावा व त्यांनी देशासाठी, समाजासाठी भरीव काही केले आहे, अशाच गोष्टी आहेत. केरळच्या लक्ष्मीकुट्टी यांनी सर्पदंशावर जालीम औषध शोधून काढले आहे. अनेक किटकांच्या विषारी दंशावर उपचार करण्यासाठी त्यांनी 500 वनौषधींचा आधार घेत त्यापासून जालिम औषधे शोधली आहेत. आजही त्या केरळच्या जंगलातच राहातात व त्यांचे झावळ्यांचे छत असलेले घर आहे. त्या भागातून पन्नासच्या दशकात शालेय शिक्षण घेणारी ही मुलगी एकमेव होती. अशा या लक्ष्मीकुट्टींनी काढलेल्या जालीम उपचारामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. त्याचबरोबर पद्मश्री सन्मान मिळालेल्या गोंड कलाकार भज्जू शाम यांनी आपल्या गौंड शैलित युरोप चितारला आहे. अतिशय गरीबीत दिवस काढलेल्या या कलाकाराचे अलिकडच्या काळात त्यांच्या शैलिजे जगाला दर्शन झाल्यावर खर्‍या अर्थाने चीज झाले. त्यांच्या द लंडन जंगल बुक या पुस्तकाच्या तीस हजार प्रति खपल्या आहेत. हे पुस्ताक पाच भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे. बंगालचे सुधांशू विश्‍वास हे गरीबांची रुग्णसेवा करण्यात तसेच गरीबांसाठी शाळा चालविण्यासाठी प्रसिध्द आहेत. त्यांचे अनाथालयाचे काम देखील मोठे आहे. बंगालमधील सुभाषिणी मिस्त्री यांनी मोलमजुरी करुन गरीबांसाठी रुग्णालय उभारले आहे. त्यांना देखील सरकारने पद्मश्रीने सन्मानित केले आहे. केरळातील राजगोपाल हे दुर्धर आजारांचे महिसा म्हणून ओळखले जातात. त्यांनी हजारो नवजात अर्भकांना जीवनदान दिले आहे. प्लॅस्टिकचा वापर करुन रस्ते बांधणीचे काम करुन प्लॅस्टिकचा वापर कशा प्रकारे योग्यरित्या करता येईल हे जगाला दाखविणार्‍या राजगोपालन वासुदेवन यांचाही सन्मान झाल आहे. तामीळनाडूतील लोककला अभ्यासक, लोककला जतन करण्यासाठी झटणार्‍या विजयालक्ष्मी नवनीतकृष्णन यांना त्यांचया कार्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. तिबेटीयन वनौषधांचा अभ्यास करणारे हिमाचलप्रदेशाचे येशी धीदेन, कर्नाटकात मागार भागात नर्सिंग सेवा करणार्‍या सुलागत्ती नरसम्मा, नागालँडमधील विचारवंत लेंटिना ठक्कर, अंदमान निकोबार बेटातील वन्यजीव रक्षक रोमुलास व्हाइटेकर, भगवतगीचेचे उर्दुत भा,तर करणारे उर्दु कवी अन्वर अन्वर जलालपुरी, कर्नाटकातील हिंदु-मुस्लिम एकतेचे प्रतिक व गायक इब्राहीम सुतार योगशिक्षक व्ही. नानाम्मल यांच्यासारख्यांचा सरकारने यथोचित असा सन्मान केला आहे. खरोखरीच सरकारने यावेळी हे पुरस्कार निवडताना मोठी मेहनत घेतली आहे हे नक्की.
---------------------------------------------------------------

0 Response to "यथोचित सन्मान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel