-->
चक्रीवादळाचा धोका

चक्रीवादळाचा धोका

मंगळवार दि. 05 डिसेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
चक्रीवादळाचा धोका
मुंबईसह कोकणात थंडीचे वातावरण सुरु झाले असताना अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावू लागले आणि कोकणासह संपूर्ण किनारपट्टीला मोठा धोका निर्माण झाला. ओख्खी वादळाच्या पार्श्‍वभूमीवर गोवा आणि कोकण किनारपट्टीसह गुजरातला सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला. चार दिवसांपूर्वी हे वादळ दक्षिणेच्या किनारपट्टीवर आदळले आणि तेथे बरेच नुकसान झाले. आता हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. ओख्खी चक्रीवादळ हे हळूहळू पश्‍चिम किनारपट्टीच्या लक्षद्वीप भागातून पुढे सरकत आहे. त्याचा परिणाम कोकणसह गुजरात किनारपट्टीलादेखील भोगावा लागणार आहे. हजारो मच्छीमारी नौका सध्या किनारपट्टीला लागल्या असून बंदर विभागानेदेखील धोक्याचा 2 नंबरचा बावटा किनारी लावला आहे. मच्छीमारांनी व इतर कोणीही खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन बंदर विभागाकडून करण्यात आले आहे. बंदर विभागाची टीम प्रत्येक तासाला या वादळाबाबतची माहिती मच्छीमारांना देत आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तटरक्षक दल आणि नौदलाने तामिळनाडू आणि केरळमधील सुमारे 223 मच्छीमारांची वादळाच्या तडाख्यातून सुटका केली आहे. हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ओख्खी चक्रीवादळ पुढील तासांत उत्तरेकडे प्रवास करत गुजरात आणि मुंबईकडे येणार आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर जोरदार वारे व पाऊस घेऊन हे वादळ आलेच आहे, सुदैवाने त्याचा जोर एवढा नाही. अरबी समुद्रात सुरु झालेले हे वादळ कोकणाच्या किनापट्टीवर थडकेपर्यंत बहुदा सौम्य झालेले असेल अशी अपेक्षा आहे. त्याचा जोर ओसरलेला असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस समुद्रात 3 ते 5 मीटर उंचीच्या लाटा सतत येणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई व रायगड किनारपट्टीवर लाटा अधिकच तीव्र झाल्या असून त्यांची उंची देखील वाढलेली आहे. त्यामुळे हे वादळ किती वेगाने येते ते पहावे लागेल. ओख्खी चक्रीवादळाने तामिळनाडू व केरळला जोरदार तडाखा दिला असून त्या ठिकाणी मोठया प्रमाणात जीवितहानी झाली आहे. तेथे आतापर्यंत या वादळात 22 जण मृत्युमुखी पडले आहेत. समुद्रात गेलेले अनेक मच्छीमार बेपत्ता आहेत. कोकण किनारपट्टीवरील समुद्रात मोठया लाटा येत आहेत. समुद्रातील संभाव्य धोका लक्षात घेऊन 2 डिसेंबपर्यंत खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन बंदर विभागाकडून करण्यात आले आहे. रायगडातील बहुतांशी मच्छिमार बोटी परतल्या आहेत. फक्त सात बोटींचा पत्ता अद्याप लागलेला नाही. हा तपास लवकरच लागेल असा विश्‍वास प्रशासनाला वाटतो. कोकणातीले किनारपट्टीजवळील गावांतील मासेमारी नौकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. दि. 2 डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील 250 बोटी मासेमारी करण्यास समुद्रात गेल्या होत्या. मात्र, ओखी चक्रीवादळाचा इशारा समजताच, त्यांना तातडीने परतीचा प्रवास करण्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील 51 बोटी परतल्या. तर उर्वरित 199 बोटी नौकामालकांच्या संपर्कात असून, त्या सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.  रायगड जिल्ह्यातील मच्छिमारी मासेमारी करण्यास खोल समुद्रात जात नाहीत. त्यामुळे या चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना फारसा फटका बसणार नाही. मुंबईतील अनेक मच्छिमार बोटी या गुजरातच्या दिशेने मच्छिमारी करणे पसंत करतात. वादळ आता गुजरातच्या दिशेने सरकत असल्यामुळे या मच्छिमार बोटींचा शोध सुरु आहे. या वादळाच्या बरोबरीने येत्या 48 तासात रायगड  जिल्ह्यातील काही भागात पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहेे. केंद्रीय वेधशाळेच्या सांगण्यानुसार, कोकणात या वादळामुळे पाऊस पडेल, मात्र फार मोठे नुकसान होण्याची शक्यता नाही. कारण हे वादळ थडकेपर्यंत त्याची तीव्रता निश्‍चितच कमी होणार आहे. चक्रीवादळ येणेे हे किनारपट्टीतील लोकांसाठी काही नवीन बाब नाही. मात्र यावेळी हवामानखात्याने याबाबत अगोदर इशारा दिल्यामुळे अनेकांना या वादळापासून दूर नेणे शक्य झाले. त्याबाबत हवामानखात्याचे आभार मानले पाहिजेत. यासंबंधी जे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसीत केले आहे त्याबद्दल आपल्या शास्त्रज्ञांचेही अभिनंदन केले पाहिजे. कारण त्यांच्या या प्रयत्नांमुळेच हजारो लोकांचे आपण प्राण वाचवू शकलो आहोत. चक्रीवादऴ ही जगात कोठेही येतात मात्र त्याची आपल्याला आगावू सूचना मिळणे महत्वाचे ठरते. त्याचबरोबर आपल्याकडील आपतकालीन यंत्रणा कार्यान्वित होऊन त्यांनी तातडीने हालचाली करणे ही महत्वाची बाब ठरते. याबाबतीत आपण यशस्वी ठरलो आहोत. अर्तात यावेळी आपल्याला पुरेशी आगावू सूचना वादळाची मिळाली असल्यामुळे या हालचाली करता आल्या. मात्र कधीकधी या सूचना अतिशय कमी वेळ अगोदर मिळतात व त्यामुळे आपल्याकडे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण होतो. यातील सर्वात महत्वाची हानी म्हणजे, मनुष्यहानी व दुसरी हानी ही घरांची, झाडांची पडझड. सुदैवाने यावेळी फारशी मनुष्यहानी अजून झाली नाही व येत्या चार दिवसात वादळ थडकल्यावर किती हानी होऊ शकते याचा अंदाज येईल. हवामानखात्याचा अंदाज बर्‍यापैकी अगोदर मिळल्याने समुद्रात गेलेल्या मच्छिमारंना पुन्हा सुरक्षित ठिकाणी आणणे शक्य झाले. सध्याच्या आधुनिक जगात आपल्याला आता अशा प्रकारचे धोक्याचे इशारे अगोदर मिळू लागल्याने आपले जीवन बर्‍यापैकी सुखकर झाले आहे. सर्वात मोठा दिलासा मच्छिमार व किनार्‍यावर राहाणार्‍या लोकांना झाला आहे. त्यामुळे आपण सध्याच्या ओखा चक्रीवादळाचा चांगल्या तर्‍हेने मुकाबला करु शकलो आहोत.
---------------------------------------------------------------

0 Response to "चक्रीवादळाचा धोका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel