-->
नुकसान करुन गेलेले ओखी

नुकसान करुन गेलेले ओखी

गुरुवार दि. 07 डिसेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
नुकसान करुन गेलेले ओखी
केरळ, तामिळनाडूनंतर गुजरातच्या दिशेने सरकलेले ओखी चक्रीवादळ गुजरातला पोहोचण्यापूर्वीच शमले आहे. त्यामुळे गुजरातला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी देखील मुंबई व कोकण किनारपट्टी तसेच गुजरातमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरींची शक्यता बुधवारपर्यंत हवामान खात्याने वर्तवली आहे.
गेल्या आठवडाभरापासून ओखी चक्रीवादळाने केरळ, तामिळनाडू व लक्षद्वीप भागात थैमान घातले होते. यानंतर हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने सरकत होते. सोमवारी संध्याकाळपासूनच किनारपट्टीसह राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी देखील मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. वादळ गुजरातच्या दिशेने सरकताच महाराष्ट्रावरील प्रभाव कमी झाला. मंगळवारी संध्याकाळनंतर धास्तीचे ढग विरत गेलेआणि मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. मुंबईवर जर हे वादळ थडकले असते तर किती मोठी हानी झाली असती याचा विचार न केलेला बरे. गुजरातमधील सुरतजवळ हे वादळ स्थिरावणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र स्कायमेटने हे वादळ सुरतला पोहोचण्यापूर्वीच शमल्याचे बुधवारी सकाळी स्पष्ट केले. या वादळाचा आता गुजरातला कोणताही धोका नाही, हे स्पष्ट झाले. मुंबईवरचे ओखी चक्रीवादळाचे संकट टळले आहे. मात्र, खोल समुद्रात घोंघावणार्‍या या चक्रीवादळामुळे मुंबई आणि उपनगरांत सोमवारी रात्रीपासून बिगर मोसमी पावसाने रिमझिम हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वार्‍यासह समुद्राला आलेल्या भरतीमुळे किनार्‍यावर पाच मीटरपेक्षा उंच लाटा उसळत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर समुद्रकिनारी तसेच चौपाट्यांवर न जाण्याच्या सूचना मुंबई पोलिसांनी नागरिकांना दिल्या आहेत.
पाऊस, दाट धुके यामुळे शहरात मंगळवारी ठिकठिकाणी रस्ते वाहतूक मंदावली होती. पूर्व आणि पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. उपनगरी लोकलही 10 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. एकूणच मुंबईचे जनजीवन बर्‍यापैकी विस्कळीत झाले होते. ओखीने रायगड जिल्ह्यालाही मोठा तडाखा दिला आहे. रायगडातील समुद्रकिनार्‍यावर पाच मीटर उंचीच्या लाटा आदळत होत्या. अशीच स्थिती रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात होती. गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात 267 मि.मी. पावसाची नोंद झाली. डिसेंबरमधील पावसाचा हा एक नवा विक्रमच म्हटला पाहिजे. या वादळामुळे कोकणातील काजू व आंब्याच्या पिकाचे मोठे नुकसान होणार हे नक्की आहे. या दोन पिकांच्या उत्पादनात मोठी घट होईल अशी अपेक्षा आहे. सुपार्‍या भिजल्यामुळे सुपारी साठवणूक करणार्‍या सहकारी संस्थांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अलिबाग परिसरात लावण्यात आलेल्या पांढर्‍या कांद्याची रोपे या पावसामुळे मोडून पडली आहेत. त्यामुळे यंदा पांढरा कांदा बाजारात कमी येईल. त्याचबरोबर आंबा व काजूंचा मोहोर गळल्यामुळे हे पिक यंदा कमी येणार आहे. एकूणच ओखीमुळे शेतकर्‍यांचे झालेले नुकसान आता शासनाने भरुन दिले पाहिजे. झालेल्या नुकसानीचे सरकारने तातडीने पंचनामे सुरु करुन शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरु केली पाहिजे. ओखी वादळ लक्षद्वीप बेटांना वळसा घालून अरबी समुद्रात दाखल झाले आणि उत्तरेकडे त्याचा प्रवास सुरू झाला. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास ओखी वादळ मुंबईपासून नैऋत्येला 670 किमीवर होते. येथूनच त्याला अरबी समुद्राकडून बाष्परूपी ऊर्जेची रसद मिळणे कमी झाले. उत्तर अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान कमी असल्याने ओखीचा जोर मंदावला. मंगळवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास ते मुंबईपासून 150 किमीवर होते. ओखी अरबी समुद्रात जसजसे उत्तरेकडे किनार्‍याच्या दिशेने सरकत होते तसतसे तुलनेने थंड असणारा अरबी समुद्र आणि जोराचे वारे यामुळे ओखी मंदावले. केरळ, तामिळनाडू व लक्षद्वीपमध्ये थैमान घातल्यानंतर ओखी वादळ महाराष्ट्र, गोवा व गुजरातमध्ये धडकले. किनारपट्टीवर मुसळधार पावसासह ताशी 70 ते 80 किमी वेगाने वारे वाहू लागले. त्यामुळे पावसाचा हंगाम नसतानाही मुसळधार पाऊस अनुभवला. रायगड जिल्ह्यात तर 267 मि.मी. पावसाची नोंद एका दिवसात झाली. डिसेंबर महिन्यातला हा पावसाचा विक्रमच होता. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरुन हे वादळ गुजरातकडे सरकल आणि सुरत, वलसाड, अहमदाबाद, राजकोटसह सुमारे 22 जिल्ह्यांत तुफान पाऊस झाला. ओखीचे केंद्र मुंबईपासून 300 किमी नैऋत्येला होतेे. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 5 मीटर उंच लाटा उसळत होत्य. गोव्यात ओखीमुळे 14 किनारपट्यांची हानी झाली. तशाच प्रकारची हानी गुजरातच्या किनारपट्टीवर झाली. यात एकूण 39 लोकांचा मृत्यू झाला. सध्या गुजरातमध्ये प्रचार ऐन रंगात आलेला असताना हे वादळ थडकले. त्यामुळे कॉग्रेस व भाजपाच्या गुजरातमध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा, कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एकूण 15 हून अधिक प्रचारसभा ऐनवेळी रद्द झाल्या. ओखीमुळे संपूर्ण दक्षिण भारताची कोकणपट्टी, महाराष्ट्राची कोकणपट्टी व गुजरातची किनारपट्टी या भागात तीन दिवस पावसाचे थैमान होते. यात मोठे नुकसान झाले आहे. गुजरातमधील या भागातील प्रचारही पूर्णपणे थंडावला होता. आता वातावरण निवळल्याने अंतिम टप्प्यातील प्रचार पुन्हा एकदा जोरात सुरु होईल. परंतु शेतकरी व सर्वसामान्यांचे जे नुकसान झाले आहे ते सरकारने भरुन दिले पाहिजे.
---------------------------------------------------------------

0 Response to "नुकसान करुन गेलेले ओखी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel