-->
छकुलीला अखेर न्याय!

छकुलीला अखेर न्याय!

गुरुवार दि. 30 नोव्हेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
छकुलीला अखेर न्याय!
राज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार व खून खटल्यातील प्रमुख आरोपी पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय 25), संतोष गोरख भवाळ (30) व नितीन गोपीनाथ भैलुमे (26) यांचा या कटात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने या तिघांनाही जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. यानंतर प्रतिक्रीया देताना मुलीच्या आईने, आज माझ्या छकुलीला न्याय मिळाला, अशी हृदय पिळवटून काढणारी भावना व्यक्त केली. शाळेतील लहान मुलांनी त्यांच्या ताईसाठी मोर्चे काढले. आज त्या मुलांच्या ताईला न्याय मिळाला, असा अत्याचार कोणावरही होऊ नये, असे भाऊक उद्गार त्यांनी काढले. या गुन्ह्याच्या वेळी सकृतदर्शनी पुरावा कोणाचाच नव्हता. त्यामुळे सरकारी वकिल अ‍ॅड. उज्वल निकम यांच्यावर गुन्हा सिध्द करण्याची मोठी जबाबदारी होती. परंतु पिडीत मुलीचे रक्ताचे डाग गुन्हेगारांच्या कपड्यावर लागलेले आढळल्यामुळे हा गुन्हा सिध्द करणे सोपे गेले. कदाचित या गुन्हेगारांना फाशीच्या एवजी जन्मठेप होईल अशी शंका व्यक्त होत होती. न्यायलयाला हा गुन्हा जसा सिध्द झाल्याचे पुरावे मिळाले तसेच जनतेच्या भावनांचाही यात विचार केला असावा. गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जनमत तयार झालेले होते. हा केवळ लहान मुलीवरील बलात्कार नव्हता तर खूनही होताच तसेच या बालिकेवर ज्या प्रकारचे अत्याचार झालेले होते ते पाहता त्यांना फाशी हीच योग्य शिक्षा होती. त्यानुसार न्यायलयाने ही शिक्षा ठोठाविल्याने आता यापुढे अशा प्रकारचे गुन्हे करताना अनेकांचे मन धजावणार नाही. त्यादृष्टीने समस्त महिलांना एक प्रकारचा मोठा न्याय मिळाला आहे, असेच म्हणावे लागेल. जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल बुधवारी जाहीर केला त्यावेळी नागरिकांची जिल्हा न्यायालयाच्या आवारात तुडूंब गर्दी केली होती. कोपर्डी येथील नवनीत शिकणारी ही मुलगी गेल्या वर्षी 13 जुलै रोजी सायंकाळी भाजीचा मसाला आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. आपल्या आजोबांच्या घरुन मसाला घेऊन परतत असताना वाटेत तिची सायकल अडवून रस्त्याच्या कडेला तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर तिचा निघृणपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणी मुलीच्या मावसभावाने पोलिसात फिर्याद दिली होती. मुख्य आरोपी पप्पू शिंदे याला घटनेनंतर पळताना फिर्यादीने पाहिले होते. त्याची दुचाकीही घटनास्थळी आढळली. तो पुरावा या घटनेत महत्त्वपूर्ण ठरला. घटनेनंतर एक वर्षे चार महिन्यांनी निकाल लागला. हा खटला सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी लढविला़ जितेंद्र शिंदे याच्यासाठी न्यायप्राधिकरणाने अ‍ॅड. योहान मकासरे यांची नियुक्ती केली होती. संतोष भवाळ याच्यावतीने अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे व अ‍ॅड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी तर नितीन भैलुमे याच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी हा खटला लढविला. कोपर्डीतील क्रौर्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मारेकर्‍यांच्या माणुसकीशून्य वर्तनाने राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राज्यातील अनेक शहरांतून लाखोंचा समावेश असलेले मूक मोर्चे निघाले. या मोर्चांनी सरकारवर नैतिक दबाव आणला. त्यामुळेच खटला वेगाने चालविण्यासाठी प्रयत्न झाले. हा खटला आव्हानात्मक होता. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने परिस्थितीजन्य पुरावा गोळा करून तो सिद्ध करण्याची जबाबदारी होती. दुर्दैवी मुलीच्या अंगावरील जखमा, आरोपींच्या कपड्यांवरील रक्ताचे नमुने यांबाबतचे पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतरही देशभर असाच क्षोभ निर्माण झाला होता तसाच राग या घटनेनंतर व्यक्त होत होता. निर्भया प्रकरणीही खटला वेगाने निकालात काढून आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली गेली. काहींचा फाशीच्या शिक्षेला विरोध असला तरीही तरी क्रौर्याची परिसीमा गाठणार्‍यांना कठोर शिक्षा होणे गरजेचेच असते. शिवाय अशा प्रकारचे गुन्हे भविष्यात होऊ नये यासाठी जरब बसणेही आवश्यक असते. निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराचा विषय देशभर चर्चिला गेला. हे अत्याचार रोखण्यासाठी काय करता येईल याबाबत विचारमंथन झाले. कठोर कायदे करण्यापासून खटले वेगाने चालविण्यापर्यंतच्या सूचना आल्या. दिल्लीचे निर्भया प्रकरण गाजले त्यातील आरोपींनाही कठोर शिक्षा झाल्या. मात्र दिल्लीतील महिलांवरचे अत्याचार व गुन्हे काही संपले आहेत असे नव्हे. कोपर्डीनंतरही महाराष्ट्रात अशाच प्रकारची चर्चा झाली. महिला अत्याचारांच्या विरोधातील मुद्दा या सार्‍यांमुळे केंद्रस्थानी आला. अशा प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवून गुन्हा नोंदविण्यापासून वेगवान न्यायदान होण्याबाबत सर्व प्रयत्न केले. सरकारी यंत्रणेत म्हणावी तितकी तत्परता आलेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातीलच एका शाळकरी मुलीवर अलीकडेच एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केले; परंतु त्याबाबत यंत्रणेने गांभीर्य दाखविले नाही, असा अनुभव आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्याबरोबर महिला आणि मुली यांच्या अधिक सुविधा निर्माण करून सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्याचीही गरज आहे. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली हे स्वागतार्ह आहे. आता हा कटला उच्च न्यायलयात जाईल. तेथेही याचा निकाल लवकरात लवकर लागून गुन्हेगांना फासावर लटकविले गेले पाहिजे. यातून असे गुन्हे करण्यास भविष्यात गुन्हेगार धजावणारा नाहीत, अशी अपण अपेक्षा बाळगू. त्याचबरोबर मुली आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार होणेही आवश्यक आहे. तसे झाले तरच कोपर्डीतील पीडितेला खर्‍या अर्थाने न्याय मिळेल.
--------------------------------------------------------

0 Response to "छकुलीला अखेर न्याय!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel