-->
कॉग्रेस अध्यक्षपदी राहूल गांधी

कॉग्रेस अध्यक्षपदी राहूल गांधी

रविवार दि. 03 डिसेंबर 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
कॉग्रेस अध्यक्षपदी राहूल गांधी
---------------------------------------
एन्ट्रो- काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनच नव्हे, तर देशातले सक्षम विरोधी नेतृत्व या नात्याने राहुल गांधी यांच्यावर आलेली ही ऐतिहासिक जबाबदारी आहे. नेहरु-गांधी घराण्याने आजवर कॉग्रेसला मोतीलाल नेहरु, जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी असे पाच अध्यक्ष दिले आहेत. आता त्यानंतर या रांगेत सहावे अध्यक्ष राहूल गांधी असतील. राहूल गांधींवर फार मोठी जबाबदारी असेल. कॉग्रेसला फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यात राहूल गांधी यशस्वी ठरले तर ती त्यांची ऐतिहासिक कामगिरी असेल. भाजपाच्या सध्याच्या ध्येय धोरणातूनच त्यांना हे बळ लाभेल, यात काही शंका नाही...
------------------------------------------------
स्वातंत्र्य लढ्यापासून देशाच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात अग्रभागी आसणार्‍या कॉग्रेसच्या नेतृत्वपदी आता राहूल गांधी यांची निवड होणार हे नक्की झाले आहे. गेल्या महिन्यात कॉग्रेस अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी कॉग्रेसने एक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार, अध्यक्षपदासाठी फक्त राहूल गांधी यांना स्पर्धक कोणीही नसणार व त्यांची निवड एकमताने होईल असेच चित्र होते. गेली दोन-चार वर्षे विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती त्यांना साथ देत नसल्यामुळे नवीन अध्यक्ष निवडला जाणार आहे. राहूल गांधी हे गेली चार वर्षे उपाध्यक्षपदी आहेत व भावी अध्यक्ष म्हणूनच त्यांच्याकडे कॉग्रेसमधील नेते बघत आहेत. गेली तीन वर्षे भाजपा सत्तेत आल्यापासून व त्याअगोदरचे वर्ष हेे कॉग्रेससाठी अत्यंत वादळी ठरले. या वादळात सोनिया गांधी प्रकृती अस्वस्थामुळे सक्रिय नव्हत्या, मात्र राहूल गांधी बर्‍यापैकी सक्रिय होते. आता त्यांची अध्यक्षपदी निवड होणार हे नक्की असताना भाजपाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. काल सोनिया होत्या, आज राहुल आहेत, उद्या राहुल यांचा मुलगा काँग्रेसच्या अध्यक्षपदी येईल, अशी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करणारी ही प्रतिक्रिया आहे. अर्थात भाजपाकडून असाच प्रकारची प्रतिक्रिया अपेक्षित होती. कॉग्रेसची घराणेशाही व गांधी घराणे याशिवाय त्यांच्याकडे टीका करण्यासारखा एकही विषय नाही. याचा अनुभव आपण गेली कित्येक वर्षे घेत आलो आहोत. परंतु एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, गांधी घराण्याला लोकांनी स्वीकारले आहे तसेच काही घटनांत अव्हेरले देखील आहे. केवळ कॉग्रेसजनांनीच नव्हे तर देशातील जनतेने त्यांना स्वीकारलेले आहे. आणीबाणीनंतर याच जनतेने इंदिरा गांधींना अव्हेरले होते. परत केवळ 18 महिन्यांच्या आत सत्तेवरही बसविले. या घटना पाहता आपल्या देशात काही राजेशाही अस्तित्वात नाही. त्यामुळे गांधी घराण्याची घराणेशाही जनतेने निवडून दिल्यावर सत्तेत आलेली आहे. मात्र भाजपाला नेहमीच याची एक प्रकारची भीती वाटत आली. कारण जोपर्यंत हे घराणे आहे तोपर्यंत आपल्या सत्तेचे काही खरे नाही, असे त्यांना वाटते. त्यामुळे कॉग्रेसच्या ध्येयधोरणावर टीका करण्याऐवजी ते नेहमी गांधी घराण्यावर टीका करीत आले आहेत. गेल्या निवडणुकीपासून त्यांनी म्हणूनच राहूल गांंधींना टार्गेट करुन त्यांना पप्पू असे संबोधून बदनाम केले गेले. अर्थातच मिडियाला हाताशी घेऊन भाजपाच्या नेतृत्वाने जाणूनबुजून केलेला हा कट होता. त्यात ते निश्‍चितच यशस्वी झाले. कॉग्रेस देखील सलग दहा वर्षे सत्तेत राहिल्यामुळे त्यांच्यावर सुस्तपणा आला होता. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते. अर्थात हे आरोप काही भाजपला गेल्या तीन वर्षात सिध्द करता आले नाहीत, हे देखील तेवढेच खरे. राजीव गांधींवर किंवा कुणावरही वैयक्तिक पातळीवर केली गेलेली टीका ही फार काळ करता येत नाही. विरोधात असताना टाळ्या मिळविण्यासाठी ही विधाने चालू शकतात. अथार्र्त अशा प्रकारची व्यक्तिगत टिका करणे हे कायम यश देऊ शकत नाही. एकीकडे कॉग्रेसमुक्त भारत अशी घोषणा करीत असताना व हे आपण सहज करीत आहोत असे भासवित असताना कॉग्रेसच्या नेतृत्वावर अशा प्रकारची टीका करण्याची गरज भाजपाला का वाटते? याचाच अर्थ ते कॉग्रेसला व गांधी घराण्याला घाबरत आहेत. बरे कॉग्रेसमध्ये घराणेशाही ज्यांना नको, त्यांना त्यांच्या पक्षातील मात्र घराणेशाही चालू शकते. भाजपामधील डझनाहून जास्त नेत्यांची मुले ही राजकारणात आहेत. ती घराणेशाही नाही का? अर्थात असे प्रश्‍न उपस्थित करणारे हे देशद्रोही ठरु शकतात. कॉग्रेसजनांना गांधी घराणे प्रिय आहे, मग भाजपाला मोदी प्रिय आहेत, परंतु माझा तो बाब्या दुसर्‍याचे ते कार्टे अशा म्हणीप्रमाणे भाजपाचे वागणे आहेे. या सर्व पार्श्‍वभूमीवर राहूल गांधी यांची अध्यक्षपदी निवड होत आहे. अध्यक्ष झाल्यावर राहूल गांधी यशस्वी होतील का असे सवाल भाजपातर्फे उपस्थित होत आहेत. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, राहूल गांधी यशस्वी होवोत की अपयशी भाजपाने त्यांची धडकी घेतली आहे, हे नक्की. कारण सध्या गुजरातमध्ये भाजपाला राहूल गांधी यांनी चांगलेच दमविले आहे. ही निवडणूक आपल्यासाठी एकतर्फी आहे असे भाजपाला वाटत होते, ती परिस्थीती काही राहिलेली नाही. अगदी कॉग्रेसची सत्ता नाही आली व भाजपाच्या जागा 100च्या खाली जरी गेल्या तरी भाजपासाठी ती नाचक्की असेल व राहूल गांधींसाठी तो एक मोठा विजय असेल. एकेकाळी पप्पू म्हणून ज्याला हिणवत होते त्या राहूल गांधींचा एवढा का बरे गुजरातमध्ये भाजपासाठी मतस्ताप व्हावा याचे आर्श्‍चय वाटते. राहूल गांधी हे कॉग्रेसचा भविष्यातील चेहरा असणार आहे. त्याचा कॉग्रेसला हळूहळू का होईना निश्‍चितच फायदा होणार हे नक्की. गेल्या काही वर्षात राहूल गांधी यांच्यात अनेक बदल झालेले दिसतात. त्यांनी आपली प्रतिमा जाणीवपूर्वक सुधारली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ते संयमी आहेत. भाजपा व मोदींनी त्यांच्यावर टोकाची वैयक्तिक पातळीवरील टीका करुनही ते डगमगलेले नाहीत. याचा राग त्यांनी कधी पंतप्रधान मोदींवर काढलेला नाही. यातून त्यांची राजकीय परिपक्वता स्पष्ट दिसते. उलट भाजपा सत्तेत आल्यामुळे विरोधात काम करताना ते बरेच काही शिकलेले दिसतात. आपल्याकडून एखादी गोष्ट चुकली तर ते आपली चूक मान्य करताना दिसतात, यात त्यांचा एक मोठेपणा जाणवतो. त्यांची देहबोली व भाषा यात बराच मोठा बदल झालेला दिसतो. उगाचच खोटी आश्‍वासने देण्याचा त्यांना शौक नाही हे तर स्पष्टच दिसते. त्यांनी आपली प्रतिमा एक सर्वसामान्यांचा नेता अशीच ठेवली आहे. त्यासाठी ते कधी टी शर्ट, झब्बा लेंगा यात प्रमुख्याने दिसतात. महागडे काही लाखाचे सूट घालणे त्यांना शक्य आहे पण ते घालत नाहीत. त्यावरुन त्यांची मानसिकता समजते. त्यांच्या नजिकचे जे पत्रकार आहेत त्यांच्या सांगण्यानुसार त्यांना वाचनाची चांगली आवड आहे, सोशॉलजी व फिलॉसफी हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे ते तरुण आहेत. त्यामुळे तरुणांच्या समस्या अधिक जवळीने पाहू शकतात. गेल्या वर्षात राहूल गांधींना व्टिटरवर फॉलो करणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढली होती. ही संख्या जशी वाढू लागली तशी सोशल मिडियात भाजपाविरोधी रण पेटू लागले. हा केवळ निव्वळ योगायोग नाही. यावेळी हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या हातून निसटण्याची शक्यता जास्त आहे. पण त्यानंतरच्या कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसनं सत्ता टिकवली, लगोलग मध्य प्रदेशात जनाधार वाढवला किंवा नंतर राजस्थानात थेट बाजीच मारली तर 2019 चे चित्र वेगानं पालटेल. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी हा 2019 सालचा सामना विषम असणार नाही. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनच नव्हे, तर देशातले सक्षम विरोधी नेतृत्व या नात्याने राहुल यांच्यावर ही ऐतिहासिक जबाबदारी आहे. नेहरु-गांधी घराण्याने आजवर कॉग्रेसला मोतीलाल नेहरु, जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी असे पाच अध्यक्ष दिले आहेत. आता त्यानंतर या रांगेत सहावे अध्यक्ष राहूल गांधी असतील. राहूल गांधींवर फार मोठी जबाबदारी असेल. कॉग्रेसला फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यात राहूल गांधी यशस्वी ठरले तर ती त्यांची ऐतिहासिक कामगिरी असेल. भाजपाच्या सध्याच्या ध्येय धोरणातूनच त्यांना हे बळ लाभेल, यात काही शंका नाही.
-----------------------------------------------------------------------

0 Response to "कॉग्रेस अध्यक्षपदी राहूल गांधी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel