-->
न्यायाच्या प्रतिक्षेत न्या लोया!

न्यायाच्या प्रतिक्षेत न्या लोया!

शुक्रवार दि. 01 डिसेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
न्यायाच्या प्रतिक्षेत न्या लोया!
मुंबईचे सीबीआय न्यायमूर्ती बृजगोपाल लोया ह्यांच्या मृत्यूबद्दल जे गूढ निर्माण झाले आहे त्यासंबंधी सरकारने केलेला खुलासा समाधानकारक नाही. त्यामुळे या न्यायमूर्तींच्या मृत्यूचे गूढ उकलून त्यांना न्याय कधी मिळेल असा प्रश्‍न आहे. कारवान साप्ताहिकात निरंजन टकले यांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्‍नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. न्यायमूर्ती लोया ह्यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला हे निरंजन टकले यांनी या लेखात सज्जड पुराव्यावाशी दाखवून दिले आहे. एनडीटीव्ही वगळता अन्य प्रसारमाध्यांनी ह्या प्रकरणाची फारशी दखल घेतली नाही. इंडियन एक्स्प्रेस आणि लोकसत्ता या दैनिकांनी उशीरा का होईना ह्या प्रकरणातील वस्तुस्थिती तपासून पाहण्याचा प्रयत्न केला; त्यापैकी काही मुद्दे टकले ह्यांचे म्हणणे हाणून पाडले आहेत. म्हणूनच या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी होणे आवश्यक ठरते. सध्या देशातील बहुतांशी चॅनेल्स ही सरकारच्या दबावाखाली आहेत व त्यांच्या विरोधात जाण्यास तयार नाहीत. काही वृत्तपत्रांनी याविषयी बातम्या प्रसिद्द केल्या परंतु त्याचा अपेक्षेप्रमाणे पाठपुरवठा केला नाही. त्यामुळे याचा जर माध्यमातून फारसा पाठपुरवठा झाला नाही तर न्या. लोला यांच्या मृत्यूचे गूढ कधीच उलगणार नाही. आपल्या लोकशाहीसाठी ही सर्वात घातक बाब ठरेल. न्या. लोया यांच्या घरच्यांनी आता न्यायालयात आमची काही तक्रार नसल्याचे प्रतिपादन केले असले तरी त्यांच्यामागे निश्‍चितच काही दबाव असावा अशी शक्यता नाकारता येणार नाही. न्यायमूर्ती लोया यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी ही महाराष्ट्र आहे. त्यांचा मृत्यू नागपूरमधील रवि भवन या सरकारी अतिथीगृहात झाला. लोयांचे जन्म गाव गातेगाव हे लातूर जिल्ह्यातील आहे आणि मुख्य म्हणजे लोया हे मुंबई सीबीआय कोर्टाचे न्यायमूर्ती होते.एवढ्या मोठ्या हुद्यावर असलेल्या माणसाचा मृत्यू संशयास्पद होतो व त्याची सरकार फारशी दखल घेत नाही, यावरुन निश्‍चितच काही तरी काळेबेरे आहे हे नक्की. मृत्यूसंबंधाने उपस्थित झालेल्या संशयाचे निराकरण होणे महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनेही गरजेचे आहे. लोला यांना हृदयविकासाचा झटका आल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रिक्षातून नेण्यात आले, लोयां यांना ह्ृदयविकाराचा झटका आला त्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांना का कळवण्यात आले नाही. अतिथीगृहाच्या ड्युटीवर असलेल्या अधिकार्‍यांनी त्यांची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली की नाही, या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली नाही तर केवळ भाजपाचीच नव्हे तर महाराष्ट्र सरकारचीही प्रतिमा मलीन होण्याचा संभव आहे. लोला यांच्याकडे अनेक महत्वाचे खटले होते. यातील एक खटला गुजरातच्या दंगलीप्रकरणीचा होता. त्यात त्यांना 100 कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर दिल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. गुजरात दंगलींचा थेट संबंध हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याशी आहे. त्यामुळे त्यांना नेमक्या कोणत्या खटल्यासंबंधी 100 कोटी रुपये देऊ केले होते? हे सर्व प्रश्‍न उपस्थित होतात. गुजरातच्या खटल्यात आपली मुक्तता झाली आहे व तो विषय आपल्यासाठी संपलेला आहे असे पंतप्रधान मोदी व अमित शहा सांगत आलेले असले तरीही हा विषय संपलेला नाही. त्यातील अनेक खटले अजूनही प्रलंबित आहेत. त्यासंबंधी अनेक वस्तुस्थिती अद्याप बाहेर आलेली नाही किंवा त्याचे पुरावे देता आलेले नाहीत. अशा स्थितीत लोला यांचा मृत्यू होणे ही सर्वात गंभीर बाब म्हटली पाहिजे. त्याहून सर्वात महत्वाची बाब म्हणजे यासंबंधी सत्ताधारी पक्ष मौन बाळगून आहेत. विरोधकही हा प्रश्‍न आक्रमकतेने लावून धरीत नाहीत असेच दिसते. न्यायमूर्ती लोला यांचे वडिल हरिमोहन लोया हे 85 वर्षांचे आहेत. त्यांच्या बहिणीपैकी एक बहीण जळगावला असून दुसरी बहीण धुळ्याला आहे. धुळ्याच्या त्यांच्या बहिणीने कारवानचे प्रतिनिधी निरंजन टकले ह्यांना दिलेल्या मुलाखतीत ज्या परिस्थितीत आपल्या भावाचा मृत्यू आणि पोस्टमार्टेम झाला त्या परिस्थितीबद्दल संशय व्यक्त केला आहे. ही बहीण स्वतः शासनाच्या सेवेत असल्यामुळे पोस्टमार्टेमसंबंधीची त्यांना स्वतःला तपशीलवार माहिती आहे. बृजमोहन लोयांचा मृत्यू कसा झाला, मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आली नाही, त्यांचा मृत देह अँब्युलन्सने गातेगावला पाठवण्यात आला तेव्हा शवाबरोबर कोणालाच पाठवण्यात आले नाही तसेच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सहकारी न्यायमूर्ती लोयांच्या वडिलांच्या सांत्वनासाठी गेले नाहीत. त्यांच्या सहकार्‍यांशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. मात्र त्यांच्या निधनानंतर ते का फिरकले नाहीत? त्यांच्यावर न जाण्यासाठी कोणता दबाव होता का? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. लोया मृत्यू प्रकरणी किमान खातेनिहाय चौकशीचा आदेश दिला तरी राजकीयदृष्ट्या ह्या प्रकरणाची विरोधकांच्या हातात असलेली सूत्रे फडणवीस सरकारच्या हातात येऊ शकतात. गुजरात निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर लोकसभा अधिवेशन पुढे ढकलण्यात आले असले तरी ह्या ना त्या स्वरूपात हे प्रकरण लोकसभेत उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी चौकशीत राज्य सरकारला आपले स्पष्ट मत नोंदवावेच लागेल. विधीमंडळाच्या अधिवेशनातही हा विषय निघणेे क्रमप्राप्त ठरते. त्यावेळी देखील सरकार साचेबद्द उत्तर देऊन हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न करील. मात्र विरोधकांनी हे प्रकरण लावून धरण्याची आवश्यकता आहे. अनेक नेत्यांनी ह्या प्रकरणावर भाष्य केले असले तरी ते रोखठोक नाही. सीताराम येचुरी यांनी मात्र यासंबंधी रोखठोक मते मांडली आहेत व लोकसभेत ते प्रश्‍न उपस्थित करतीलच. लोकसभेत व विधीमंडळात हा प्रश्‍न उपस्थित करुन सरकारला याची उच्चस्तरीय चौकशी करायला भाग पाडले पाहिजे, तरच या प्रकरणातील गूढ स्पष्ट होईल.
----------------------------------------------------------------------

0 Response to "न्यायाच्या प्रतिक्षेत न्या लोया!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel