-->
कन्हैयाकुमारचा झंझावात

कन्हैयाकुमारचा झंझावात

सोमवार दि. 13 नोव्हेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
कन्हैयाकुमारचा झंझावात
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारने नुकताच राज्यातील नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर येथील शहरात जोरदार भाषणे करुन झंझावात निर्माण केला. कन्हैयाकुमारने यावेळी केलेल्या भाषणात सत्ताधार्‍यांवर आसूड उगारले. भाजपाच्या जनविरोधी धोरणांवर सडकून टीका केली. कन्हैयाकुमार याला विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनानांनी प्रत्येक ठिकाणी निदर्शने आयोजित केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. अर्थात कन्हैयाकुमार हा आपल्या देशाचा नागरिक आहे व त्याच्यावर देशद्रोहाचा खटला सरकारने आसूडापोटी भरला होता. मात्र त्याची यातून सुटका झालेली आहे. कन्हैयाकुमारला आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे व तो देशातील कोणत्याही कानाकोपर्‍यात जाऊन आपली मते व्यक्त करु शकतो. त्यामुळे त्याला हिंदुत्ववादी संघटनांनीं केलेला विरोध चुकीचाच होता. सरकारने गेल्या दोन वर्षात कन्हैयाकुमारवर विविध खटले भरुन पूर्णपणे जेरीस आणले असले तरीही त्याच्या नेतृत्वाखालील पॅनेलच पुन्हा जबरदस्त बहुमताने जिंकून आले आहे. याचा अर्थ स्पष्टच आहे की, विद्यार्थी नेता म्हणून कन्हैयाकुमार लोकप्रिय आहे. आज राज्यातही त्याने घेतलेल्या विविध सभांना तरुणांचा मोटा प्रतिसाद लाभला, त्यावरुन त्याच्या विषयी तरुणांमध्ये मोठे आकर्षण आहे. कन्हैयाकुमारची मते जाणून घेण्यास जनता व तरुण उत्सुक आहे. कन्हैयाकुमार जिकडे जातो तिकडे सरकारवर घणाघाती हल्ला करतो त्यामुळे तो भाजपाला व सरकारला नको आहे. त्याने प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच थेट टार्गेट अनेक सभांमध्ये केले आहे. त्याने केलेल्या कोल्हापूरच्या सभेत सांगितले, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी दावा केला होता की ते चहा विकत होते. त्यांनी चहा विकला की नाही ते माहिती नाही परंतु आता ते देश नक्कीच विकत आहेत. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी जातीपातीची व्यवस्था मोडून काढण्यासाठी आपल्या सामाजिक कामातून गंगाधर कांबळे याला हॉटेल काढून दिले. तेथे ते चहा विकत होते. एक हे जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठी चहा विकणे होते. ते समाजातील भेदभाव मोडून काढण्यासाठी होते, असे त्याने आपल्या मातीतील उदाहरण देऊन अनेकांना चकित केले. हिंदुत्ववादी संघटनांनी आपल्या विरोधात निदर्शने केल्याबाबतीत त्याने सांगितले की, ते मला देशद्रोही मानत आहेत. मला कोल्हापुरात यायला मनाई करण्याची मागणी करत आहेत. मी जर देशद्रोही आहे तर मग मी दिल्लीत सुद्धा राहू शकत नाही. ज्या विद्यापीठात मी राहतो. त्या विद्यापीठाला नॅक ने सर्वात उत्तम विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. ज्याला राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आहे. त्या विद्यापीठात राहण्याचा आम्हाला अधिकार नाही का? असा सवाल करत मी जर खरच देशद्रोही असेन तर यांच्या सरकारने माझ्यावर पोलिसात गुन्हा दाखल करावा. आरोपपत्र दाखल करावे मी देशविरोधी घोषणा केल्याबद्दल मला तुरुंगात पाठवावे. या देशात पंतप्रधान, उपपंतप्रधान, राष्ट्रपती, देशात आणि 18 राज्यात सरकार यांचेच तर मग माझ्यावर आरोपपत्र का दाखल करू शकत नाही, असा जोरदार सवाल करुन कन्हैया म्हणाला की, यांना माहित आहे की मला दोषी मानण्यासारखे यांच्याकडे काहीच नाही. संपूर्ण देशभरात भ्रष्टाचारी मंत्र्यांवर आणि भाजपाविरोधी नेत्यांवर कारवाई करण्यात सीबीआय आणि अन्य यंत्रणा इतक्या कुशल आहेत, तर मग यांनी मला कोल्हापूरला कसे सोडले असते. त्यामुळे यांनी एकदा सुरुवात केली तर आता त्यांना मागे येता येणे शक्य नाही म्हणून ते बोलत आहेत. जसे या देशाचे पंतप्रधान सुद्धा बोलण्यासाठीच बोलत आहेत, काम होवो न होवो, मन की बात सांगत आहेत अशी खिल्ली कन्हैया कुमारने उडवली. नोटाबंदीनंतर तीन लाख करोड काळा पैसा परत आल्याचे सांगितले जात आहे मात्र असा कोणताही काळा पैसा परत आला नाही असे रिझर्व्ह बँक सांगत आहे. जर खरच काळा पैसा परत आला आहे तर सरकार, बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटीचे जपानकडून कर्ज का घेत आहे? असा सवाल कन्हैयाकुमारने सरकारला केला. त्याच्या या प्रश्‍नात तथ्य आहे. देशात नोटबंदी नंतर तणावाचे वातावरण वाढीला लागले आहे असे सांगून कन्हैयाकुमार म्हणाला की, ज्यांच्याजवळ काळा पैसा आहे त्यांना तो कसा लपवायचा याची चांगलीच माहिती आहे. काम करण्याच्या प्रयत्नात तीन वर्षे अशीच निघून गेली गेली. या देशात या तीन वर्षात काय महिलांवरील अत्याचार कमी झाला? का नक्षलवाद कमी झाला? भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाले का? कोणते काम या सरकारने पूर्ण केले असा प्रश्‍न त्याने उपस्थित केलेला काही चुकीचा नाही. याउलट आता या देशातले ज्यांना भ्रष्टाचाराची विद्यापीठे म्हणता येईल अशा नेत्यांना भाजप आपल्याकडे वळवत आहे. या देशात मोदी आणि सरकारच्या विरोधात बोलले, प्रश्‍न विचारला की देशद्रोहाचा शिक्का मारला जातोय. त्यामुळे देशाच्या नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे कन्हैयाकुमारचे मत काही चुकीचे नाही. शेतकरी आत्महत्या, सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन, समान शिक्षण यांसारख्या प्रश्‍नापासून दूर नेण्यासाठी भाजपकडून राम मंदिर, ताजमहल सारखे मुद्दे समोर आणले जात आहेत असे जे कन्हैयाकुमारने म्हटले यात तथ्यच आहे. आज कन्हैयाकुमार केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्‍यात फिरुन मोदीं व त्यांच्या धोरणाच्या विरोधात झंझावात निर्माण करीत आहे. याचा भाजपाला निश्‍चितच फटका बसणार आहे. नुसते कन्हैयाकुमारला देशद्रोही ठरवून चालणार नाही तर त्याने उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतील. खरे तर त्याची उत्तरे सरकारकडे नाहीत.
---------------------------------------------------------------

0 Response to "कन्हैयाकुमारचा झंझावात"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel