-->
अजूनही विदर्भ तहानलेलाच

अजूनही विदर्भ तहानलेलाच

गुरुवार दि. 28 सप्टेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
अजूनही विदर्भ तहानलेलाच
यंदा राज्यात बहुतांशी भागात चांगला पाऊस पडल्याचे सांगितले जात होते. मात्र ही स्थिती सर्वसाधारणपणे नाही. पावसाळा संपत आला तरीही राज्यातील अकरा जिल्हे अद्याप तहानलेलेच असल्याची माहिती पुढे आली आहे. विदर्भातील आठ, तर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये पावसाने अद्यापही सरासरी गाठलेली नसल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. राज्यातील नगर या एकमेव जिल्ह्यात तेथील सरासरीच्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. पावसाळ्यातील जून ते 25 सप्टेंबर या सुमारे चार महिन्यांमध्ये पडलेल्या पावसाचे विश्‍लेषण हवामान खात्यातर्फे करण्यात आले आहे. त्यातून ही माहिती पुढे आली. जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांच्या मध्यावधीनंतर राज्यात पावसाने जोर धरला होता. मात्र, ऑगस्टमध्ये श्रावणधारांनी पाठ फिरवली. कोकण आणि घाटमाथावगळता राज्याच्या उर्वरित भागांत एखादी पावसाची हलकी सर हजेरी लावत होती. त्यामुळे ऑगस्टच्या मध्यवधीपर्यंत निम्मा महाराष्ट्र कोरडा असल्याची स्थिती निर्माण झाली होती.
ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरमध्ये पडलेल्या दमदार पावसाने सरासरी भरून काढली. राज्यातील प्रमुख धरणांची पातळी वाढली. धरणांमधून नदीपात्रात विसर्ग सुरू झाला. ही स्थिती मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात दिसत असली तरीही विदर्भातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठलेली नाही. तर, यंदा विदर्भात उशिरा पोचलेल्या मॉन्सूनने अद्यापही तेथे दमदार हजेरी लावली नसल्याचे चित्र दिसत असल्याचे निरीक्षण हवामानतज्ज्ञांनी नोंदविले.
विदर्भातील अकरापैकी बुलडाणा, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. अमरावती, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशीम आणि यवतमाळ हे आठ जिल्हे अद्यापही तहानलेले आहेत. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुख्यतः विदर्भात पाऊस पडतो. तेथून येणारे बाष्पयुक्त वारे जमिनीवर आल्यानंतर वायव्येकडे वळतात. हे वारे विदर्भात पाऊस देतात. या वर्षी कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकण्याऐवजी उत्तरेकडे सरकला. त्याचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे भारताच्या उत्तरेकडे वाहू लागले. त्यामुळे विदर्भात यंदा पावसाने हजेरी लावली नाही. आता यापुढे विदर्भात चांगला पाऊस पडेल व सरासरी गाठली जाईल ही शक्यता जवळपास नाही. आता काही भागात परतीचा पाऊस सुरु होईल. यंदा मुळातच पावसाला उशीरा सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाऊस चांगला झाला असला तरी लांबला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तेथील सरासरीच्या 20 ते 59 टक्के पाऊस पडला. नगर जिल्ह्यात तेथील सरासरीच्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. सातारा, सांगली, कोल्हापूर, येथे सरासरी पाऊस नोंदण्यात आला. उत्तर महाराष्ट्रातही चार जिल्ह्यांपैकी नाशिक येथे सरासरीच्या 35 टक्के पाऊस पडला आहे. नंदूरबार, धुळे आणि जळगाव येथे पावसाने सरासरी गाठली आहे. दुष्काळी समजल्या जाणार्‍या मराठवाड्यात यंदा सुरवातीला चांगला पाऊस पडला. मात्र, जुलैमध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे मराठवाड्यावर पुन्हा दुष्काळाच्या टांगत्या तलवारीची भीती निर्माण झाली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये पडलेल्या दमदार पावसाने बीड, लातूर, जालना जिल्ह्यांना दिलासा मिळाला. नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली हे जिल्हे अद्यापही तहानलेले आहेत. उस्मानाबादमध्ये सरासरीच्या 31 टक्के पाऊस पडला. विदर्भातील 11 पैकी फक्त वर्धा या एका जिल्ह्यात ऑगस्टच्या मध्यावधीपर्यंत सरासरीइतक्या पावसाची नोंद झाली होती. उर्वरित सर्व जिल्हे कोरडे होते. त्यानंतर बुलडाणा, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. अमरावती (-28), यवतमाळ (-33), वाशीम (-27), अकोला (-21), पूर्व विदर्भातील भंडारा (-26), गोंदिया (-36), चंद्रपूर (-31) आणि गडचिरोली (-22) या जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे पावसाने सरासरी गाठली, तर मुंबईसह पालघर, ठाणे आणि सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. कोकणात पाऊस नेहमीप्रमाणे अपेक्षेप्रमाणे चांगलाच पडला आहे. हवामानखात्याचा अंदाजही त्याबाबतीचा खरा ठरला आहे. कोकणात चांगला पाऊस पडूनही काही जिल्ह्यात मात्र पाण्याची टंचाई जाणवते. अर्थात तो प्रश्‍न मानव निर्मीत आहे. परंतु गेल्या वर्षाची पावसाची सरासरी पाहता यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे बहुतांशी भागाला दिलासा मिळाला आहे. तीन वर्षापूर्वी अल निओच्या सावटामुळे पावसाची सरासरी कमी झाली होती. ही सरासरी दोन व्ऱे, कमीच राहिली. मात्र गेल्या वर्षी अल् निओचा प्रभाव कमी झाला. त्यामुळे पाऊस चांगला झाला. आपल्याकडे संपूर्ण राज्याचा विचार करता मराठवाडा व विदर्भ हे दोन विभाग बहुतांशी दुष्काळाच्या छायेत असतात. यंदा त्या परिस्थितीत सुधारणा झाली, हे वास्तव स्वीकारावेच लागेल. आता पडलेल्या प्रत्येक थेंबाचा संचय व त्याचे व्यवस्थापन करणे आपल्या हाती आहे. त्याव्दारे आपण दुष्काळावर मात करु शकतो. मात्र त्यासाठी दिर्घकालीन धोरण आखण्याची आवश्यकता आहे. सरकारने जलयुक्त शिवारची योजना गेल्या दोन वर्षात राबविली आहे. त्यातील काही ठिकाणी भ्रष्टाचार झाला हे मान्य केले पाहिजे. परंतु त्याचे काही चांंगले परिणामही आपल्याला दिसत आहेत. मोठी धरणेे बांधण्यापेक्षा अशा प्रकारे लहान प्रकारातील धरणे, बाधारे व जलसाठा साठविण्याचे प्रयोग केल्यास आपण दुष्काळाची मुक्ती करु शकतो. नद्यांचे प्रवाह बदलणे हा प्रयोग चांगला असला तरीही खर्चिक आहे. त्यापेक्षा अशा प्रकारे छोटे प्रयोग राबवून आपण पाण्याचे चांगले नियोजन करु शकतो. अर्थात त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.
------------------------------------------------------------------ 

0 Response to "अजूनही विदर्भ तहानलेलाच"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel