-->
अशोकपर्वाने काँग्रेसला संजिवनी

अशोकपर्वाने काँग्रेसला संजिवनी

शनिवार दि. 14 ऑक्टोबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
अशोकपर्वाने काँग्रेसला संजिवनी
लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली पराभवाची मालिका खंडित होऊन नांदेडमध्ये मिळालेल्या निर्विवाद यशाने राज्यात काँग्रेसला नैतिक बळ लाभले आहे. या विजयाने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे राजकीय वजन पक्षात वाढले आहे. कॉग्रेसला एकीकडे संजिवनी मिळाल्याचा आनंद झाला असताना राष्ट्रवादी कॉग्रेसला अजूनही सूर गवसलेला नाही. राज्यात भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमध्येच लढत होत असल्याने शिवसेना किंवा राष्ट्रवादी या पक्षांची काहीशी पीछेहाट होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. या वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कॉग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले नव्हते. नांदेड, सिंधुदुर्ग आणि नगर या तीन जिल्ह्यांमध्येच पक्षाला चांगले यश मिळाले होते. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या अपयशाने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली होती. भिवंडी, मालेगाव आणि परभणी या तीन महानगरपालिकांमध्ये मिळालेल्या सत्तेने काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आता नांदेडमध्ये मिळालेल्या एकतर्फी विजयाने काँग्रेसचे मनोधैर्य नक्कीच उंचावणार आहे. सातत्याने होणार्‍या पराभवांच्या पार्श्‍वभूमीवर नांदेडचा विजय काँग्रेसला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीपासून मुस्लीम समाज काँग्रेसपासून दूर गेला होता. भिवंडी, मालेगाव, परभणीपाठोपाठ नांदेडमध्ये मुस्लीम समाजाने साथ दिल्याने काँग्रेससाठी तेवढीच समाधानाची बाब ठरली आहे. नांदेडमध्ये दलित समाजाचाही काँग्रेसला पाठिंबा मिळाला. हाच कल पुढील निवडणुकांमध्ये कायम राहील, असा काँग्रेसला विश्‍वास आहे. नांदेडच्या विजयाने खासदार अशोक चव्हाण यांचे राजकीय वजन पक्षात नक्कीच वाढले आहे. नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याचे सर्वाधिकार काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्याचा एक ओळीचा ठराव बुधवारी रात्रीच करण्यात आला होता. नवा अध्यक्ष नेमताना मराठा समाजाकडेच हे पद कायम ठेवण्याचा निर्णय पक्षाने घेतल्यास अशोकरावांकडेच हे पद कायम राहू शकते. अशोकरावांच्या शब्दाला आता दिल्ली दरबारी वजन आले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, परभणीची सत्ता गमाविणार्‍या राष्ट्रवादीच्या पराभवाची मालिका अद्यापही खंडित झालेली नाही. नांदेडमध्ये गेल्या वेळी 10 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी त्यांची कामगिरी निराशाजनकच झाली आहे. महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला फार काही चांगले यश मिळाले नव्हते. गेल्याच महिन्यात झालेल्या मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला. परभणीत सत्ता गमवावी लागली. राष्ट्रवादीबद्दल जनतेच्या मनात विश्‍वासार्हता राहिलेली नाही हेच निकालांवरून स्पष्ट होते. त्याचबरोबर शिवसेनेलाही लोकांनी झिडकारले आहे. राज्यातील राजकीय चित्र बघितल्यास भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्येच मुख्यत्वे लढती होत आहेत. शिवसेनेला मुंबई व ठाण्याबाहेर यश मिळाले नाही. भाजपने गेल्या साडेतीन वर्षांत राज्यात जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपच्या चढत्या आलेखाने शिवसेनेचे नुकसान होत आहे. नांदेड महापालिकेत 81 जागांपैकी 70 जागा जिंकून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. नगरसेवकांची फोडाफोडी करून भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे नेहमीची फोडाफोड करुन सत्ता कमाविण्याचे भाजपाचे तंत्र यावेळी काही यशस्वी झालेले नाही. फोडाफोडीचे राजकारण करून भाजपने मांडलेली मतांची गणिते चुकली आणि पक्षाला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले. 14 जागा असलेली शिवसेना 3 जागा घेत औषधापुरतीच शिल्लक राहिली. पूर्वी 11 जागा असलेल्या एमआयएमचे तर यंदा अस्तित्वच राहिले नाही. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपने मिळवलेल्या यशाची तुलना करता नांदेडमध्ये मतदारांनी भाजपला अव्हेरल्याचेच चित्र आहे. नांदेडची महापालिका ताब्यात घ्यायचीच या इराद्याने भाजपने जवळपास डझनभर मंत्री आघाडीवर लावले होते. कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपचे सरचिटणीस व आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्याकडे येथील प्रचाराची सूत्रे देण्यात आली होती. त्यांच्या जोडीला शिवसेनेत राहून भाजपचा प्रचार करण्यासाठी आ. प्रताप पाटील चिखलीकर हे होते. याबरोबरच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री गिरीष महाजन, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, गुरूद्वारा बोर्डाचे अध्यक्ष सरदार तारासिंह, आ. सुधाकर भालेराव, तुषार राठोड आदी भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी यांनी कंबर कसली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन सभा घेतल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फोडून आपल्या बाजूने जोरदार हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मागील वेळी केवळ दोन जागा जिंकणार्‍या भाजपमध्ये काँग्रेससह जवळपास 15 विद्यमान नगरसेवकांनी प्रवेश केल्याने त्यांना भाजपने तिकीट देवून निवडणुकीत उतरवले होते. शिवसेना काँग्रेसची बी टीम आहे, त्यांचे उमेदवार विजयासाठी नाहीत तर भाजपच्या पराभवासाठी उभे आहेत, असा आरोप खुद्द मुख्यमंत्र्यांनी केल्याने सेनेत चांगलीच खळबळ माजली. फडणवीसांच्या या आरोपामुळे शिवसेना-भाजपात चांगलीच जुंपली. त्याचा परिणाम काँग्रेसविरोधी मतामध्ये विभाजन होण्यात झाला. परिणामी सेना व भाजप दोघेही गारद झाले. काँग्रेसला मुस्लीमेतर प्रभागातही विजय मिळविणे सोपे झाले. एमआयएमने 2012 साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 12 टक्के मते घेतली होती. तसेच त्यांचे त्यावेळी 12 नगरसेवक निवडून आले होते. यंदा मात्र, तेथील मुस्लिम मतदारांनी एमआएमलाही साफ नाकारल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत औवेसी बंधूंनी चार दिवस नांदेडमध्ये तळ ठोकला होता. त्याचा काहीही फायदा त्यांच्या पक्षाला झाला नाही. अर्थात या निवडणुकीमुळे अशोक चव्हाण यांचे पक्षात वजन वाढले तसेच पक्षालाही संजिवनी मिळण्याचे काम झाले आहे.
---------------------------------------------------------

0 Response to "अशोकपर्वाने काँग्रेसला संजिवनी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel