-->
विकासाचे टेम्पल

विकासाचे टेम्पल

मंगळवार दि. 10 ऑक्टोबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
विकासाचे टेम्पल
असे म्हणतात की, सत्ता आली की लक्ष्मी तुमच्याघरी पाणी भरते. यापूर्वी कॉग्रेसच्या सत्ताधार्‍यांना त्यांच्या मालमत्ता वाढीविषयी व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या संपत्तीत होणार्‍या वाढीबद्दल त्यावेळचा विरोधी पक्ष असलेला भाजप कठोर टीका करीत असे. त्यावेळी असे वाटे की, भाजपा हा कॉग्रेसपेक्षा वेगऴा पक्ष आहे. यापूर्वी सत्ता गाजवूनही ते बिचारे लक्ष्मीला काही घरी पाणी भरु देत नाहीत, अशी त्यांची सर्वसाधारण प्रतिमा होती. निदान त्यांनी आपली प्रतिमा तशी रंगविली तर तोती. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही व भ्रष्टाचाराच्या ज्या प्रकरणावरुन रणकंदन माजविले त्याबद्दल जनतेला सहानुभूती वाटली व सत्ता यांच्याच हाती दिली पाहिजे अशी त्यांची ठाम समजूत झाली. यातून कधी नव्हे एवढी गेल्या तीन दशकात भाजपाला जागा मिळाल्या व एक हाती सत्ता जनतेने दिली. अर्थातच अच्छे दिन येणार असे नरेंद्र मोदींनी दिलेली घोषणा लवकरच प्रत्यक्षात उतरेल याची वाट जनता गेली तीन वर्षे पाहत आहे. मात्र अच्छे दिन काही अजून तरी आलेले नाहीत. प्रत्येकाच्या खात्यात विदेशातून काळा पैसा आणून 15 लाख जमा करणार अशी निवडणूक पूर्व केलेली घोषणा आता हवेत विरली आहे. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी भाजपाच्या सरकारने नोटाबंदी जाहीर केली. परंतु यातूनही एक रुपया देखील काळा पैसा बाहेर आला नाही. उलट जनतेला रांगेत उभे राहाण्याची व शेकडो लोकांना जीव गमावण्याची पाळी आली. नोटाबंदीमुळे रोजगारावर परिणाम झाला. त्यापाठोपाठ जी.एस.टी.ची घाई केल्याने सरकार अनेक प्रकरणी अडचणीत आले. एकूणच जनता हैराण झाली असताना सत्ताधारी मात्र आपल्या संपत्तीत वाढ करीत असल्याचे आढळले आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुलाच्या कंपनीवरुन वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहे. अमित शहा यांचा मुलगा जय शाह यांच्या कंपनीच्या उलाढालीमध्ये एक वर्षात तब्बल 16 हजार पट वाढ झाली आहे. याबाबत द वायर या संकेतस्थळाने वृत्त दिले आहे. सन 2014 मध्ये सत्तातंरानंतर अमित शहा यांच्या मुलाचे नशीब फळफळले आहे, असे द वायर संकेतस्थळाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. ही आकडेवारी कंपनी रजिस्टारकडे दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांवरुन मिळविण्यात आल्याचा दावा संकेतस्थळानेे केला आहे. अमित शहा यांच्या मुलाची कंपनी टेम्पल इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड मार्च 2013 मध्ये तोट्यात होती. त्यावेळी कंपनीला 6 हजार 239 रुपयांचे नुकसान झाल्याचे दाखवण्यात आले होते. मार्च 2014 मध्येही कंपनीला एक हजार 724 रुपयांचा तोटा झाला होता. परंतु, 2014-15 नंतर कंपनीला मोठा फायदा झाल्याचे समोर आले आहे. मे 2014 नंतर कंपनीने मोठ्या प्रमाणात उलाढाल व नफा कमविण्यात प्रगती केली असून, त्या आर्थिक वर्षात कंपनीला 18 हजार 728 रुपयांचा फायदा झाला आहे. कंपनीचा एकूण महसूल फक्त 50 हजार रुपये होता. मात्र, खरा बदल हा 2015-16नंतर घडला आहे. 2015-16च्या आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल 80.5 कोटी झाली आहे. एका वर्षात कंपनीच्या उलाढालीत 16 हजार पटीने वाढ झाली आहे. 2014 नंतर कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा होऊ लागला. तसेच राजीव खांडेलवाल नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या फायनान्शियल कंपनीतर्फे टेम्पल इंटरप्रायजेसला 15.78 कोटी रुपयांचं कर्ज दिले. खांडेलवाल हे रिलायन्सच्या एका बड्या पदाधिकारी तथा राज्यसभा सदस्याचे व्याही आहेत. ऑक्टोबर 2016 मध्ये टेम्पल इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बंद झाली. कंपनी तोट्यात असल्याने बंद केल्याचे कारण सांगण्यात आले. जय शाह यांच्या नावे असलेल्या दुसर्‍या कंपनीवरही गंभीर आरोप केले आहे. कुसुम फिनसर्व या दुसर्‍या एका कंपनीतही जय शाह यांचे 60 टक्के शेअर्स आहेत. या कंपनीलासुद्धा राजेश खंडेलवाल यांनी कर्ज दिले होते. एकूणच हे सर्व प्रकरण पाहता भाजपाप्रणित विकासाचे हे आदर्श टेम्पल ठरावे. अमित शहा हे भाजपाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मुलाला व्यवसाय करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अमित शहा हे देखील व्यवसायिक आहेत. पूर्वी ते शेअर ब्रोकर म्हणून कार्यरत होते. त्यांचा हा सट्टेबाजीचा व्यवसाय देखील चांगला चालत होता. मात्र आता त्यांच्या पुत्राच्या कंपनीस जो लाभ मिळून ही कंपनी ज्या झपाट्याने वाढली आहे ते पाहता येथे काही तरी पाणी मुरत आहे हे नक्की. अर्थातच जय मेहता यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. द वायर या संकेतस्थळावर 100 कोटी रुपयांचा नुकसानभरपाईचा दावा ठोकला आहे. अर्थात अशा प्रकारचे दावे हे बोगस असतात. फारच तुरळक प्रकारात अशा प्रकारचे दावे शेवटपर्यंत लढविले जातात. कालांतराने अशा प्रकारचे दावे होते हे जनता देखील विसरते. भाजपाने या बातम्यांचे खंडण केले आहे. मात्र त्यांचे खंडण हे वरवरचे आहे. जय मेहता यांची मालमत्ता कशी वाढली याचे विवरण त्यात नाही. अर्थात कंपनी खात्याला सादर केलेला कंपनीचा ताळेबंद तर समोरच आहे. त्यात झालेली वाढ ही देखील लपविता येत नाही. अशा वेळी भाजपा समर्थन तरी काय करणार,असा सवाल आहे. कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्या मालमत्तेत झालेली वाढ व जय मेहता यांच्या मालमत्तेतील वाढ यातील साम्य एकच आहे व ते म्हणजे सत्ता व अधिकार. भाजपाच्या विकासाच्या या टेम्पलचे समर्थन करताना भाजपाची खूप गोची होणार हे मात्र सत्य आहे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "विकासाचे टेम्पल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel