-->
पर्यटनाचे महत्व

पर्यटनाचे महत्व

बुधवार दि. 27 सप्टेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
पर्यटनाचे महत्व
आज जागतिक पर्यटन दिवस. खरे तर पर्यटनाचे महत्व आजच्या दिवसापुरते नसून ते संपूर्ण वर्षभर जपले पाहिजे. तसे पाहता आपण पर्य्टनाकडे फार उशीरा लक्ष दिले. पर्यटनातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो, आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते याचे महत्व आपल्याला उशीराच समजले. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. आज जगात असे अनेक देश आहेत की, ज्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलूंन आहे. एवढेच कशाला आपल्याकडे पर्य्टनाचे महत्व केरळ व गोवा या दोन राज्यांनी सर्वात प्रथम ओळखले व त्याचे जागतिक पातळीवर मार्केटिंग केले. यातून येथील सर्वच चित्र पालटण्यास मदत झाली. लोकांचा जीवनस्तर तर बदलाच शिवाय विदेशी पर्य्टकांमुळे ही दोन राज्ये जागतिक पर्यटनाच्या पटलावर आली. आज या दोन्ही राज्यांना अन्य उत्पन्नाच्या मर्यादा असताना त्यांनी केवळ पर्यटन व्यवसायामुळे आपल्या तिजोरीत भर घालून दाखविली आहे. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्याकडे समुद्रकिनारे, देवळे, सृष्टीसौंदर्य, दर्‍याखोर्‍या, विविध धर्मियांची एतिहासिक प्राथनास्थळे, बर्फाच्छादीत प्रदेश, एतिहासिक वास्तू, आपली संस्कृती अशी विविध ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करणारी  आहेत. त्याशिवाय अनेक ठिकाणे ही दुर्लक्षित आहेत, त्यांचा चांगल्यारितीने विकास केल्यास पर्यटकांना ती ठिकाणे आकर्षित करतील. गेल्या वर्षी आपल्याकडे सुमारे 89 लाख विदेशी पर्यटक आले. दरवर्षी विदेशी पर्यटकांची भारतात येण्याची संख्या किमान दहा टक्क्याने वाढत आहे. गोवा व केरळ वगळता महाराष्ट्र, तामीळनाडू व उत्तरप्रदेश या राज्यात प्रामुख्याने विदेशी पर्यटक येतात. त्याशिवाय विदेशी पर्यटक वैद्याकीय सेवा घेण्यासाठी येत असतात. आपल्याकडील उत्कृष्ट वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी येणारे हे पर्यटक आपल्यासाठी बरेच काही देऊन जातात. त्यामुळे भारतीय वैद्यकीय सेवा जगात प्रसिध्दीच्या झोतात येतेच शिवाय आपल्याला त्यांच्याकडून परकीय चलनाचा लाभ होतोच. महाराष्ट्राला देशाची आर्थिक राजधानी मुंबई लाभली आहे, याचा आपल्याला पर्यटनाच्या वृध्दीसाठी उपयोग करता येऊ शकतो. नुकतेच महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने गणपतीत विदेशी पर्यटकांना भारतात आमंत्रित करुन त्यांना आपल्या संस्कृतीचे अनोखे दर्शन घडविले. गेल्या वर्षात राज्यातील पर्यटन महामंडळाने पर्यटनाला चालना मिळण्यासाठी महामंडळातर्फे असे अनेक उपक्रम राबविले आहेत, त्याचे स्वागत झाले पाहिजे. आता कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी सरकारने कोकणासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून कोकणातील पर्यटनाला निश्‍चितच चालना मिळणार आहे. आपल्याकडे कोकणात अनेक भाग हा पर्यटनाचा विचार करता दुर्लक्षित राहिला आहे. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा जाहीर होऊन आता दोन तपे लोटतील परंतु येथे पर्यटनाच्या विकासासाठी शासकीय पातळीवर विशेष प्रयत्न झाले नाहीत आता रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करावा अशी मागणी पुढे आली आहे. खरे तर संपूर्ण कोकण हा विभागच पर्यटन विभाग जाहीर झाला पाहिजे. आता नव्याने स्थापन होणारे कोकणाचे पर्यटन विकास महामंडळ त्यासाठी एक विकासाचे माध्यम म्हणून कार्य करु शकते. संपूर्ण कोकणाला सुमारे 700 कि.मी. लांबीचा समुद्रकिनाला लाभला आहे. हीच कोकणासाठी एक मोठी जमेची बाजू ठरावी. आज जगात जिकडे किनारपट्टी आहे तिकडे पर्यटन विकसीत झाले आहे. आपल्याकडे समुद्रकिनारपट्टी ही अनेकांना संकट वाटते व त्यातून सी.आर.झेड.चा बागुलबुवा उभा केला जातो. खरे तर किनारपट्टी ही उद्योगाची नामी संधी आहे. त्यासठी सी.आर.झेड. देखील काही भागात शिथील करण्याची आवश्यकता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडून असलेल्या गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात तर कोकणाच्या किनारपट्टीत का येत नाहीत, याचा विचार करुन पुढील पावले टाकली पाहिजेत. यासाठी सर्वात पहिले म्हणजे, पर्यटनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. चांगले रस्ते, वीज, पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध झाल्यास पंचतारांकित हॉटेलपासून ते कॉटेजमध्ये राहाणारा विविध प्रकारातील पर्यटक कोकणात येऊ शकतो. सिधुदुर्गात मालवण येथे समुद्राच्या खाली जाऊन तेथील नैसर्गिक संपत्ती पाहाण्याची नामी संधी आता उपलब्ध झाली आहे. अशा प्रकारचे पर्यटन या किनारपट्टीवर आपण ठिकठिकाणी करु शकतो. रायगडातील मांडवा, मुरुड, श्रीवर्धन त्यानंतर रत्नागिरीतील भाट्ये, हर्णे, लाडघर, गवणेश्‍वर तर सिंधुदुर्गातील मालवण हे किनारे पर्यटकांना निश्‍चितच भूरळ घालतात, मात्र विदेशी पर्यटक येथेे आकर्षित झाल्यास आपल्या राज्याच्या तिजोरीत आणखी भर पडेल. रत्नागिरीतील ऐतिहासिक थिबा पॅलेस, कवी केशव सुत, टिळक यांची जन्मभुमी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबडवे गाव याच जिल्ह्यात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील माचाळ हे पर्यटन स्थळ समुद्रसपाटीपासून 915 मीटर उंचीवर वसलेले आहे. येथील वातावरण थंड व आल्हाददायक असल्यामुळे मोठ्याप्रमाणात पर्यटक येथे आकर्षित होतात. या पर्यटनस्थळाला अधिक चालना मिळण्यासाठी माचाळ थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषित करण्याची गरज  आहे. तसेच याच जिल्ह्यातील गणपतीपुळे हे प्राचीन व अतिमहत्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ असून या ठिकाणास शासनाने सध्या ब वर्ग पर्यटन स्थळामध्ये समाविष्ट केले आहे. रायगडातील शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक रायगड किल्ला, महाड येथील चवदार तऴे अशी अनेक ठिकाणे पर्यटनासाठी महत्वाची आहेत. सिंधुदुर्गातील आंबोलीचा धबधबा हे पर्यटकांचे नेहमीचे लोकप्रिय ठिकाण. अशी अनेक ठिकाणे कोकणात जगातील पर्यटक खेचू शकतात. सिंधुदुर्गात होणारा म्योजित विमानतळ, मुंबई-गोवा महामार्गाचे दुपरीकरण, रेल्वे मार्गाचे दुपरीकरण तसेच सागरीमहामार्गाला गती देण्याचे सरकारने दिलेले आश्‍वासन यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळू शकणार आहे. यात स्थानिक रोजगाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आजच्या पर्यटन दिनाच्या निमित्ताने आपण पुढील पाच वर्षात पर्यटनाचा आराखडा आखून पाऊल पुढे टाकूया असेच सांगावेसे वाटते.
---------------------------------------------------------------

0 Response to "पर्यटनाचे महत्व"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel