-->
मर्केल यांच्या विजयातील पराभव

मर्केल यांच्या विजयातील पराभव

रविवार दि. 01 ऑक्टोबर 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
मर्केल यांच्या विजयातील पराभव
----------------------------------------------
एन्ट्रो- युरोपातील एक महत्वाचा देश व जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चॅन्सलरपदी अँगेला मर्केल यांची सलग चौथ्यांदा निवड झाली आहे. अशा प्रकारे त्यांनी जर्मनीत यापूर्वीचे चॅन्सलर हेल्मूट कौल यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मात्र यावेळी त्यांचे मताधिक्य घटले आहे. त्याहून सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, कडव्या उजव्या विचारसरणीचा पुरस्कार करणारे, जर्मनी फक्त जर्मनांचाच अशी भाषा करणारे आणि आंतरराष्ट्रवादापेक्षा राष्ट्रवादालाच अधिक महत्त्व देणारे अशा आल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी अशा नावाच्या राष्ट्रवादी पक्षाने जवळपास 13.3 टक्के मते बळकावून जर्मन लोकप्रतिनिधिगृहात या निवडणुकीतून प्रवेश केला. ही बाब धोकादायक म्हटली पाहिजे. खरे तर अती उजव्यांना मोठ्या प्रमाणात मिळालेला पाठिंबा ही घटना म्हणजे, मर्केल यांच्या विजयातील पराभवच आहे...
-------------------------------------------------
युरोपातील एक महत्वाचा देश व जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चॅन्सलरपदी अँगेला मर्केल यांची सलग चौथ्यांदा निवड झाली आहे. अशा प्रकारे त्यांनी जर्मनीत यापूर्वीचे चॅन्सलर हेल्मूट कौल यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मात्र यावेळी त्यांचे मताधिक्य घटले आहे. त्याहून सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, कडव्या उजव्या विचारसरणीचा पुरस्कार करणारे, जर्मनी फक्त जर्मनांचाच अशी भाषा करणारे आणि आंतरराष्ट्रवादापेक्षा राष्ट्रवादालाच अधिक महत्त्व देणारे अशा आल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी अशा नावाच्या राष्ट्रवादी पक्षाने जवळपास 13.3 टक्के मते बळकावून जर्मन लोकप्रतिनिधिगृहात या निवडणुकीतून प्रवेश केला. ही बाब धोकादायक म्हटली पाहिजे. खरे तर अती उजव्यांना मोठ्या प्रमाणात मिळालेला पाठिंबा ही घटना म्हणजे, मर्केल यांच्या विजयातील पराभवच आहे. कारण जर्मनीतील कडवा उजवेपणा याचा अर्थ नाझीवाद. दुसर्‍या महायुद्धात या कमालीच्या राष्ट्रवादाने जो काही धुमाकूळ घातला त्याच्या जखमा अद्यापही ओल्या असल्याने अनेकांना जर्मन राष्ट्रवाद या संकल्पनेनेच भीतीचा गोळा येतो. ही भीती केवळ जर्मनीत नाही तर संपूर्ण युरोपात व जगात आहे. हिटलरने जे काही केले त्याचे इतके वैषम्य बाळगण्याचे कारण नाही आणि जर्मनीने आपला गौरवशाली भूतकाळ मिरवायलाच हवा, अशी या अति उजव्यांची मते आहेत. याच उजव्यांचा निर्वासित वा स्थलांतरितांच्या जर्मन प्रवेशास विरोध आहे. गेल्या काही वर्षात युरोपात राष्ट्रवाद बोकाळू लागला आहे. दुसर्‍या महायुध्दानंतर जो युरोपात उदारमतवाद होता व संपूर्ण एका युरोपची संकल्पना होती तिला हरताळ फासण्याचा प्रयत्न इंग्लंडपासून केला गेला. ब्रेक्झीटच्या निर्णयामुळे यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर ही लाट युरोपातील काही देशात सुरु झाली. बेल्जियममध्ये उदयास आलेल्या फ्लेमिश ब्लॉकपासून डेन्मार्क, स्वित्झलँड, नेदरलॅण्ड्समधील उजवे पक्ष यांच्या रूपांतून युरोपात उजवेपण पुढे आले. फ्रान्सच्या निवडणुकीत मात्र ही लाट थोपवली गेली आणि संपूर्ण युरोपला काहीसे हायसे वाटले. फ्रान्समध्ये निवडणुकीच्या काळात से काही चित्र निर्माण केले होते की, तेथे देखील राष्ट्रवाद मानणारा उजवा पक्ष सत्तेत येणार आहे. मात्र ही भविष्यवाणी खोटी ठरली. आता देखील मर्केल यांचा विजय नक्की होता मात्र आल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी हा पक्ष मोठे आव्हान निर्मण करेल असे बोलले जात होते. मात्र आज तरी उदारमतवादाच्या बाजूने जर्मन नागरिक उभे राहिले आहेत, ही एक दिलासादायक घटना म्हटली पाहिजे. युरोपीय संघटनेतील पोलादी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणार्‍या अँगेला मर्केल या निवडणुकीत विजयी झाल्याने युरोपातील सर्वात बलाढय अशा अर्थव्यवस्थेचे प्रमुख सारथ्य आता त्यांच्याकडेच राहील. ख्रिश्‍चन डेमॉक्रॅट्स पक्षाच्या नेत्या असलेल्या मर्केल यांचे मताधिक्या घटले आहे, कारण त्यांची कारकिर्द वाईट होती म्हणून नव्हे तर युरोपात गेल्या काही वर्षात सुरु जालेल्या राजकीय वादळामुळे. त्यांच्या पक्षास 33 टक्के मते मिळाली. अपेक्षेपेक्षा पाच टक्क्यांनी हे मताधिक्य घटलेले आहे. जर्मनीत दुसर्‍या महायुद्दानंतर अति उजव्यांची मते कधीच वाढत नव्हती. किंबहुना हा पक्ष नेहमीच नगण्य असल्यासारखा होता. मात्र यावेळी त्यांचे मताधिक्य दोन आकड्यांवर पोहोचले आहे. आजवर उजव्या विचारांना जनतेने झिडकारले होते. आता मात्र त्यांच्या विचारांची रुजवात पुन्हा सुरु झाली आहे. आता त्यांच्या हातात हात घालून मर्केलबाईंना काम करावे लागणार आहे. संपूर्ण युरोपात निर्वासितांचा मोठा प्रश्‍न भेडसावित आहे. जर्मनीत गेल्या काही वर्षांत तब्बल 10 लाखांहून अधिक निर्वासित आले आहेत. ते बहुतांश सीरियातील आहेत. या निर्वासितांचे काय करायचे, याबाबत जर्मनीत दोन प्रवाह आहेत. काहींच्या मते मर्केल यांनी भविष्यात कमी प्रतीची कामे करण्यासाटी त्यंना आसरा दिला आहे. तर काहींना असे वाटते की त्यंना आश्रय देऊन सरकारने अस्तिरता ओढावून घेतली आहे. यातून मुस्लिम दहशतवाद जर्मनीला पोखरणार आहे. यातूनच या उजव्याची मते वाढली आहेत व त्यांना मिळालेल्या मतांतील साधारण सात टक्के मते ही नवमतदारांची आहेत. ज्यांनी कधीच मतदान केले नव्हते अशांनी या वेळी पहिल्यांदाच आपला कौल दिला आणि तोदेखील कडव्या उजव्यांच्या बाजूने. युरोपातील बहुतांशी देश सध्या अतिशय बिकट आर्तिक परिस्थीतून वाटचाल करीत आहेत. इटली, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन हे आर्थिक आघाडीवर गेली काही वर्षे विफल ठरले आहेत. अशा स्थितीत युरोपचा भार जर्मनी आपल्या खांद्यावर वाहून नेत होता. यात मर्केल यांचे कणखर नेतृत्व महत्वाचे ठरले. 2008 च्या मंदीनंतर युरोपच्या आर्थिक स्थिती डभघाईला आली. जर्मनी वगळता बाकीच्या युरोपीय देशांची आर्थिक वाढ मंदावली, गुंतवणूक मंदावली, उत्पादन घसरले आणि बेरोजगारी वाढली. ग्रीस, इटली, पोर्तुगाल, स्पेन इत्यादी देशांना या मंदीचा फटका बसला. सर्व खंडात एकेकाळी सत्ता गाजविणार्‍या ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदावली. फटका बसलेल्या देशांनी आर्थिक शिस्त लावून स्वतःची स्थिती सुधारावी, त्यासाठी जर्मनी त्यांना मदत करेल अशी भूमिका मर्केल यांनी घेतली. यातूनच ग्रीस, ब्रिटन इत्यादी देश शिस्त लावून घ्यायला तयार नसल्याने त्यांनी युरोपीयन समुदायातून बाहेर पडण्याचे ठरविले. मात्र जर्मनी एकसंघ युरोपच्या बाजुने ठाम राहिला. याचे सर्व श्रेय अर्थातच मर्केल यांनाच जाते. जर्मनीपुढे आता अनेक आव्हाने असली तरी मर्केल आपले उदारमतवादाचे धोरण सुरुच ठेवणार यात काही शंका नाही.
------------------------------------------------------------------- 

0 Response to "मर्केल यांच्या विजयातील पराभव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel