-->
महागाईचे सीमोलंघन

महागाईचे सीमोलंघन

शनिवार दि. 30 सप्टेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
महागाईचे सीमोलंघन
आज दसरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतरचा हा तिसरा दसरा. यंदा तरी दसर्‍याला स्वस्ताई दिसेल असे सर्वसामान्यांना वाटत होते. परंतु अच्छे दिन यंदाही काही नाहीत. उलट बुरे दिनची मालिका दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पूर्वीचेच दिवस आम्हाला परत करा अशी अनेकांनी सोशल मिडियात इच्छा व्यक्त केली आहे, ती खरीच आहे. सणासुदीच्या मुहूर्तावर जीवनावश्यक वस्तूंच्या किमंती वाढवून व्यापार्‍यांनी आपले उखळ पांढरे करुन घेतले आहे. गेल्या वर्षात अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीने आपल्या दरांचे नवनवीन उच्चाक गाठले आहेत. स्वयंपाकाच्या गैसमागील सबसीडी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अनेकांना ही सबसीडी तुमच्या खात्यात थेट जमा होणार असे सांगितले गेले, मात्र प्रत्यक्षात अनेकांच्या बँकात ही रक्कम जमा होत नाही. त्यामुळे शेवटी स्वत:च्या खिशातूनच महागडा गॅस घ्यावा लागत आहे. पेट्रोल व डिझेलच्या किंमती देखील शंभराच्या घरात लवकरच पोहोचतील. त्याबाबत जनतेमध्य्े नाराजी व्यक्त होत आहे. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किंमती वाढत चालल्याने आता आपल्या दशात पेट्रोल काही स्वस्त होणार नाही हे वास्तव मान्य आहे, मात्र ज्यावेळी याच किंमती निचांकाला होत्या, त्यावेळी आपल्या देशात या किंमती निचांकाला गेल्या नव्हत्या, हे देखील लक्षात घेतले पाहिजे. सरकार पेट्रोल डिझेलकडे एक उत्पन्नाचे उत्तम साधन म्हणून पाहते. त्यामुळे दुष्काळावरील जादा कर दुष्काळ संपला तरीही चालूच ठेवला आहे. देशाच्या अनेक भागांत, विशेषत: कडधान्याचे उत्पादन घेणार्‍या महाराष्ट्र व कर्नाटकात गेल्या वेळी कमी पाऊस पडल्यामुळे हे उत्पादन घटणार आहे. मध्य व पश्‍चिम भारतात कडधान्याचे उत्पादन मुख्यत्वे कोरडवाहू शेतीत घेतले जाते. काही भागात अतिवृष्टीने खरिपातील पिके नष्ट झाली. कडधान्ये असोत की तेलबिया, दोहोंबाबत आपला देश स्वयंपूर्ण नाही. वाढती गरज लक्षात घेऊन डाळी व खाद्यतेल आयात करावेच लागते. देशांतर्गत उत्पादन व आयातीचे समीकरण बिघडले की भाव आकाशाकडे झेपावू लागतात. गेल्या वर्षी 1 कोटी 92 लाख 50 हजार टनांवरून देशांतर्गत कडधान्याचे पर्यायाने डाळींचे उत्पादन तब्बल वीस लाख टनांनी घटले. काही महिन्यांपूर्वीे कांद्याच्या भावाने उंची गाठली. यात कांदा व्यापार्‍यांनी हजारो कोटी रुपये कमविले तर शेतकरी मात्र भिकेला लागला अशी स्थिती आहे. सध्या महागाई शिगेला पोहोचली असताना नजिकच्या काळात तरी कमी होण्याची शक्यता दिसत नाही. उलट महागाईचा उद्रेक होणार आहे, हे नक्की. गणपती आपल्या गावाला गेले, त्यापाठोपाठ पितृपक्षही झाला. दसरा ही आला व त्यानंतर दिवाळी... त्यानंतर नाताळ येत आहे. एकूणच आता सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. गेल्या सहा महिन्यात महागाई धीमेगतीने वाढतच आहे. यंदाच्या दुष्काळामुळे खरिपाचा हंगाम मोठ्या प्रमाणात वाया गेला आहे. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या गेलेल्या रायगड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडूनही यंदा भाताचे उत्पादन 11 टक्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने रब्बी हंगामाबाबत आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी या हंगामात अन्नधान्याचे, डाळींचे कितपत उत्पादन होईल याविषयी शंकाच आहे. त्यामुळे येत्या काळात बाजारात अन्नधान्याची अपेक्षित आवक होणार नाही. याचाच अर्थ बाजारात अन्नधान्याची टंचाई राहील. त्यामुळे महागाई ही भडकणार हे ओघाने आलेच. याचा फायदा उठवायला व्यापारी व साठेबाज तयारच आहेत. त्यामुळे महागाईच्या या गंगेत साठेबाज आपले हात धुवून घेतील आणि नेहमीप्रमाणे सरकार त्यांच्याकडे बघत बसेल. यंदा सामान्यांची दिवाळी व्यवस्थित साजरी व्हावी असे वाटत असेल तर डाळीचे भाव कमी करणे सरकारला भाग आहे. त्यातच सरकारच्या दृष्टीने नकारात्मक बाब म्हणजे, पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत.त्यामुळे अर्थव्यवस्थेतील महागाई अजूनही कायमच राहाणार. राज्य सरकारने पेट्रोल-डिझेल वर जादा कर बसविलेले काही कमी केलेले नाहीत. या धोरणांमुळे महागाईचा भडका उडत चालला आहे त्याचे काय? यापूर्वी कॉँग्रेसच्या राजवटीत जीवनावश्यक वस्तुंची कृत्रिम टंचाई, साठेबाजी, काळाबाजार या कारणांमुळे जनतेला दरवाढीला तोंड द्यावे लागत होते आणि आता राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार आले तरीही काही फरक पडलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. यंदाची दिवाळी महागाईत जाणार हे नक्की. महागाईने दसर्‍याला सीमोलंघन केले आहे, त्यामुळे हे सरकार व पूर्वीचे सरकार यात फरक तो काय असा प्रश्‍न निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. सरकारच्या हातात आता केवळ दोन वर्षे शिल्लक आहेत. केवळ गप्पा करुन किंवा आस्वासने देऊन सरकारला दिवस ढकलता येणार नाहीत. यापूर्वीच्या सरकारच्या अपयशावर बोट ठेवून आपली कातडी वाचवायची हे देखील दिवस आता संपले आहेत. आता सरकारला केलेल्या कामाच्या जोरावर लोकांपुढे पुढील दोन वर्षात मतांचा जोगवा मागायला जायचे आहे. जर लोकांच्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही तर हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही हे लक्षात घेणे गरजेच आहे.   आजवर नोटाबंदी, काळा पैसा बाहेर काढणेे, विदेशातील काला पैसा देशात आणणे, बेरोजगारी निर्मुलन, नवीन गुंतवणूक वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देणे या सर्व आघाडीवर सरकार फेल ठरले आहे. आता पुढील दोन वर्षात ही कामे करणे व लोकांच्या मनात पुन्हा विश्‍वास निर्माण करणे या सरकारला शक्य होईल का, असा सवाल आहे.
-----------------------------------------------------------------     

0 Response to "महागाईचे सीमोलंघन"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel