-->
साधु माणूस

साधु माणूस

मंगळवार दि. 26 सप्टेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
साधु माणूस
मराठी आणि इंग्रजीतील पत्रकारितेच्या रोजच्या धबडग्यामध्येही सर्जनशील वृत्ती व संवेदनक्षम प्रतिभा कायम ठेवून सकस तसेच वास्तवदर्शी साहित्यनिमिर्तीची यशस्वी मुशाफिरी करणारे अरुण साधू काळाच्या पडद्याआड गेले. गेली 50 वर्षे साहित्य क्षेत्रात व 30 वर्षे पत्रकारितेत आपला ठसा उमटविणारे साधू हे अतिशय विनम्र वृत्तीचे म्हणून ओळखले जात. त्यामुळे ते आडनावाप्रमाणेच खर्‍या अर्थाने साधू होते. त्यांना त्यांच्या मोठेपणाचा कधीच गर्व वाटला नाही. त्यामुळेच ते पत्रकारिता करताना सर्वसामान्यात, कामगार-कष्टकर्‍यांमध्ये मिसळून त्यांची बातमीपत्रे देत असत. एकाचवेळी मराठी व इंग्रजी भाषेत पत्रकारिता व साहित्यकृती करणारे ते मोजक्याच साहित्यिकांपैकी एक होते. फ्री प्रेस जर्नल या दैनिकाचे संपादकपद त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले होते. पत्रकारिता करताना त्यांना राजकारण्यांपासून ते विविध थरातील नेते, कार्यकर्त्यांच्या त्यांच्या ज्या भेटीगाठी होत त्यातून त्यांनी आपल्या कथा, कादंबर्‍यातून व्यक्तिरेखा रंगविल्या. झिपर्‍या, सिंहासन, मुंबई दिनांक या त्यांच्या कादंबर्‍या यातून जन्माला आल्या. अनेक प्रतिभावान कवी-लेखक जसे त्यांच्या स्वत:च्या कल्पनाविश्‍वाची मिजास मारतात व त्यांचे ते जग सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या पलीकडचे आहे असे सुचवतात, तशी धारणा साधूची कधीच नव्हती. सर्वसामान्यांना धार्जिणा असा त्यांचा स्वभाव होता व त्यांचे ते बलस्थान होतेे. साधूंनी आपल्या कथा-कादंबर्‍यातून समाजातील वस्तुस्थिती दाखवत जीवनाचा अनेकदा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला, त्यात ते बहुतांशी वेळा यशस्वीही ठरले असे आपल्याला म्हणता येईल. त्यांची मुंबई दिनांक ही पहिली कादंबरी वरकरणी मुंबईच्या जीवनाचा काहीशा थ्रिलर पद्धतीने वेध घेते. अर्थातच ही कादंबऱी आपल्याला वाचताना वेड लावते. पुस्तक वाचून होईपर्ंयत हातातून खाली सोडवत नाही, एवढी जबरदस्त तादक त्याच्यात होती. त्यामुळे ती वेधक बनते, ती मनुष्याला, त्याच्या सभोवतालाला - त्यामधील प्रतिकुलतेला व तरीही जगत राहण्याच्या त्याच्या धडपडीला भिडते. त्यांची सिंहासन ही कादंबरी देखील तसाच आपल्या मनाचा ठाव घेते. त्यावर निघालेला चित्रपट तर त्याहून सरस निघाल्यासारखा वाटतो, परंतु त्यामुळे या कादंबरीचे महत्व काही कमी होत नाही. त्यांनी आपले लिखाण हे पत्रकारितेशी जोडल्यामुळे व अनेक जीवंत विषय हाताळल्यामुळे त्यांच्यामागे लेखक-पत्रकार हा शिक्का बसला, तो शेवटपर्यंत. अगदी गेली वीस वर्षे ते पत्रकारितेत फारसे सक्रिय नव्हते, तरी देखील त्यांची पत्रकार-साहित्यिक अशीच ओळख सर्वंना होती. अर्थातच त्यांनी हाताळलेले कांदबर्‍यांतील सर्वच विषय हे पत्रकारितेतून जन्मलेले असल्यामुळेच कदाचित त्यांच्या मागे हे बिरुद लागले. साधूंनी आपले लिखाण सुरु केले त्यावेळी जग हे समाजसत्तावाद व भांडवलशाही यात विभागलेले होते. देशपातळीचा विचार करता विविध क्षेत्रांतील आंदोलने जागरूक संवेदनाशील माणसांना अस्वस्थ करत होती. यातूनच त्यांची जडणघडण झाली. त्यांनी लिहिलेले फिडेल चे आणि क्रांती, आणि डे्रगॉन जागा झाला ही पुस्तके समकालिन एतिहासिक दस्ताएवज ठरले आहेत. यातून त्यांच्यातला डावा लेखकही डोकावतो. त्यांच्या पुस्तकातून अनेक तरुणांना चळवळीची प्रेरणा लाभली. त्याचबरोबर त्यांच्या स्वभावानुसार, त्याच्या लेखनात मानवी करुणा ओतप्रोत भरलेली होती. संतांची परमेश्‍वरचरणी एकरूपता आणि येशूची मानवाप्रती सहृदयता या दोन्हीचा अपूर्व संगम साधूंच्या लेखनात दिसतो आणि महत्त्वाचे म्हणजे ते सारे अस्सल मानवी भावभावनांचे सामाजिक जग असते. त्यांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची शब्दयोजना समर्पक होती. जिकडे आवश्यकता भासेल तिकडे संस्कृतप्रचुरतेपासून आजच्या सरमिसळ मराठीपर्यंतचे विविध आविष्कार गरजेनुसार योजलेले दिसतात. त्यांच्याकडे उत्तम संपादन कौशल्य असते. प्रत्येक पत्रकारात ते असतेच असे नाही. मात्र साधूंकडे ही बाब होती. त्यांनी आपली स्वत:ची सर्व पुस्तके आपणच संपादित केली होती. आपण स्वत: लिहिलेल्या साहित्यावर कात्री फिरवणे ही काही सोपी बाब नसते, परंतु ते कौशल्य साधूंकडे होते. साधूंना अनेक मोठी यशाची शिखरे पार केली परंतु त्यांना कधीच त्याचा गर्व आला नाही. उलट त्यांचा स्वभाव तसा संकोच करणारा होता. त्यामुळे आपल्याच विषयी ते कधी बोललेले कोणाला आढळणार नाहीत. काही वर्षापूर्वी त्यांना साहित्यातील योगदानाबद्दल रचना सन्मान बहाल करण्यात आला. त्याचा फारसा कोणी गवगवा केला नाही. खरे तर हा खूप मोठा सन्मान होता. त्याची फराशी कुणी दखल घेतली नाही, कारण अनेकांना या पुरस्काराचे महत्वही समजले नसेल. मात्र साधूंना त्याची कधीच खंत वाटली नाही. खरे तर या महान लेखकाचे लेखनकर्तृत्वाचे मराठी भूमीत व्हावे तसे कौतुक झाले नाही, असेच म्हणावेस वाटते. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार व नागपूरच्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड या घटना त्यांना सुखावणार्‍या होत्या. परंतु त्यांनी त्याचा कधी मोठेपणाने सांगितल्या नाहीत. एकीकडे मराठी आणि इंग्रजीत तुल्यबळ साहित्याची निर्मिती करणारे साधू हे मराठीचे कट्टर समर्थक होते. मराठीच्या प्रसाराविषयी अनेक वर्षे ते प्रयत्नशील होते. आपल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या भाषणात त्यांनी त्याविषयी व्यक्त केलेले मत सर्वंकष होते. भाषेचे संरक्षण करायचे, तर तिला उद्योग व सत्ता यांचे पाठबळ हवे. साहित्याचा ठेवा तुलनेने कमी असूनही गुजराती भाषा भारतात व बाहेर टिकते आणि वाढते, त्याच वेळी हजार वर्षांची श्रीमंत साहित्य परंपरा लाभलेल्या मराठीची अस्तित्वाची लढाई चालू आहे. कारण तिच्या पाठीशी आर्थिक श्रीमंती नाही आणि सत्ताधारींना आपल्याच संस्कृतीचा अभिमान नाही, हे त्यांनी ठामपणाने मांडले. असा साधू माणूस पुन्हा पत्रकारितेत व साहित्यात होणे नाही.
-------------------------------------------------------

0 Response to "साधु माणूस"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel