-->
घोडेबाजार सुरु आहे...

घोडेबाजार सुरु आहे...

मंगळवार दि. 17 ऑक्टोबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
घोडेबाजार सुरु आहे...
मुंबई महानगरपालिकेतील मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेचे शिवबंधन मनगटी लावल्याने सर्वांनाच आश्‍चर्य वाटले आहे. त्यामुळे आता मनसेचा देशाच्या आर्थिक राजधानीतील महानगरपालिकेत आता एकमेव शिलेदार शिल्लक राहिला आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार, दोन-तृतियांश पेक्षा जास्त सदस्य फुटल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येत नाही. त्यामुळे या सहा नगरसेवकांचा शिवसेनेतील प्रवेश सुकर झाला आहे. भांडूप येथील कॉँग्रेसच्या दिवंगत नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या सून जागृती पाटील यांना भाजपाने तिकीट दिले होते. त्यामुळे भाजपाला एक जागा वाढविता आली असताना शिवसेनेने सहा नगरसेवक आपल्या गोटात घेऊन सर्वात मोठा धक्का भाजपाला दिला आहे. अशा प्रकारे निवडणूक संपल्यावर जेमतेम आठ महिन्यातच मुंबईत घोडेबाजार जोरात सुरु झाला आहे. खरे तर भाजपा काही नगरसेवक फोडून शिवसेनेवर बाजी मारण्याच्या प्रयत्नात होती. परंतु आता फासे भाजपाच्या विरोधात गेल्या महिन्याभरात पडू लागले आहेत. त्यामुळे राज्यात सत्ता असतानाही भाजपाला नगरसेवक फोडून शिवसेनेवर कुरघोडी करता आलेली नाही. आजवर गेल्या तीन वर्षात भाजपाने सर्वच राजकीय पक्षांची फोडाफोडी करुन आपला किल्ला मजबूत केला. त्याचा आधार हा घोडेबाजारच होता, हे सत्य काही लपून राहाणारे नाही. आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचा तो... ही म्हण यासाठी योग्य ठरावी. केंद्रापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत भाजपाने आपल्या पक्षाचा विस्तार हा अशाच प्रकारे केला आहे, हे जनतेपुढे आहेत. तत्वासाठी पक्ष सोडण्याचे दिवस आता संपले आहेत. आता पक्ष हे स्वार्थासाठी आणि सत्ता मिळविण्यासाठी सोडले जातात. त्याचा पाया हा आर्थिक लाभ हाच असतो. अर्थात या घोडेबाजाराचा वापर ज्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे ते सर्व पक्ष करीत आले आहेत. राजकारणात याची सुरुवात कॉँग्रेसने केली व भाजपा आता त्यांचीच गादी चालवित आहे. भाजपा ही एक प्रकारची भगवी कॉँग्रसेच आहे असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. आता शिवसेनाही यात काही कमी नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. या हालचालींमुळे मनसे आता हळूहळू संकुचित पावला आहे. त्यांच्या लोकप्रतिनिधींचा विचार करता एक आमदार व एक नगरसेवक अशी दयनीय अवस्था झाली आहे. कदाचित मनसेने आपले दुकान गुंडाळण्याची वेळ आली आहे का, असाही प्रश्‍न पडावा. परंतु अशा प्रकारचे राजकीयमॉल बंद होत नसतात. भारतीय राजकारणात त्यांना कधीही उभारी येऊ शकते आणि त्याच आशेवर अनेक पक्ष वर्षानुवर्षे जगत असतात. खरे तर मनसे व शिवसेना यांच्यात वैचारिक भिन्नता अशी काहीच नाही. दोघांचे श्रध्दास्थान एकच आहेत. विचार एकच आहेत. मनसेची स्थापना ही केवळ राज ठाकरे यांच्या राजकीय इर्षेपोटी झालेली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाला लोक गर्दी करतात पण मते देत नाहीत. त्यांचे नकला असलेले भाषण लोकांना आवडते. मात्र यांच्या हातात सत्ता द्यावी असे नेतृत्व नाही असे मतदारांना वाटते. आज शिवसेनेकडे मुंबईसारखी सर्वात मोठे उत्पन्न असलेली महानगरपालिका ताब्यात आहे. त्यामुळे त्यांच्याकडे नगरसेवक आकर्षित होणे स्वाभाविक आहे. त्याचबरोबर प्रत्येक नगरसेवकांना फुटण्यासाठी तीन कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे. अर्थात अशा प्रकारचे आरोप काही सिध्द करता येत नाहीत. परंतु काही ना काही तरी व्यवहार झाल्याशिवाय नगरसेवक येणार नाहीत हे देखील तेवढेच सत्य आहे. आता भाजपा शिवसेनेच्यावर करघोडी करण्यासाठी सज्ज झाला आहे अशा बातम्या पेरल्या गेल्या आहेत. कॉँग्रेसमधून भाजपाच्या गोटात गेलेल्या एका माजी आमदारांना कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे असे समजते. सध्या कॉँग्रेसचे 30 व राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक आहेत. यातून काहींना फोडून त्यांचा वेगळा गट करणे किंवा थेट भाजपात सामिल करण्याचा बेत रचला जात आहे. सध्या सत्ता असल्यने घोडेबाजारात भाजपा आघाडी मारु शकतो. मात्र किती नगरसेवक फुटतील ते आताच सांगणे कठीण आहे. कदाचित भाजपाला हे जमणार देखील नाही. केवळ पैसा टाकूनच सर्व कामे होतात असे नाही. अर्थात अशा प्रकरणात लोकांमध्ये जी बदनामी होते ती लोकप्रतीनिधींना पुढील निवडणुकीत महागही पडू शकते. मुंबईतील मतदार हा सुशिक्षीत आहे. आपण ज्याला विनडून देतो त्याच्यावर त्याचे पूर्ण लक्ष असते. त्यामुळे मुंबईत एखाद्या नगरसेवकाचा बालेकिल्ला आहे असे सांगता येत नाही. जर एखाद्याचा बालेकिल्ला असेलच तर तो त्याच्या कामावर असतो. घरोघरी संपर्क असणे व लोकांची कामे करणे यातून तो लोकांत प्रिय होतो असा अनुभव आहे. शिवसेनेचे असे अनेक नगरसेवक यामुळेच लोकप्रिय आहेत. मात्र शिवसेनेने सध्या तरी भाजपाच्यावर कुरघोडी करण्यात यश मिळविले आहे. पुढे भाजपा आणखी फोडाफोडी करुन त्यांच्यावर बाजी मारेलही. मात्र अशा प्रकारच्या घोडेबाजाराला जनता माफ करणार नाही. त्याचबरोबर आता पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करण्याची वेळ आली आहे. सध्याच्या नियमानुसार दोन-तृतियांश सदस्य फुटले तर पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. मात्र आता या कायद्यात बदल करुन एकाही सदस्याने पक्ष सोडला तरीही त्याला पुन्हा निवडून यावे लागेल असा कायदा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण जनता ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून मतदान करते त्याने तो पक्ष सोडल्यास त्या मतदारांशी केलेली प्रतारणा ठरते. यासाठी पुन्हा निवडणूक लढवून निवडून येणे हाच एक उपाय आहे व यामुळे हा घोडेबाजार थांबू शकेल.
--------------------------------------------------------

0 Response to "घोडेबाजार सुरु आहे..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel