-->
शेतीपुरक व्यवसाय आवश्यक

शेतीपुरक व्यवसाय आवश्यक

सोमवार दि. 16 ऑक्टोबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
शेतीपुरक व्यवसाय आवश्यक
यंदा कोकणात अपेक्षेप्रमाणे चांगला पाऊस झाला आहे. अजूनही परतीचा पाऊस काही थांबलेला नाही. आता जर आणखी पाऊस पडला तर उभी पीके आडवी होण्याचा धोका आहे. मात्र पावसाची सरासरी संपूर्ण राज्यात कोकणात चांगली आहे. त्यामुळे यंदा कोकणात भाताचे उत्पादन विक्रमी आल्यास आश्‍चर्य वाटायला नको. कोकणात त्याचबरोबर नारळ, काजू, आंबे, फोफळी यांचे उत्पादन हे शेतकरी घेतच असतो. मात्र केवळ या पिकांवर अवलंबून न राहात आता शेतीपुरक जोड धंद्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. कारण केवळ एकाच प्रकारच्या शेतीवर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा त्याला पुरक जोड धंदा दिल्यास शेतकरी स्वावलंबी होऊ शकतो. यातून त्याचे उत्पन्नही वाढू शकतो. यसाठी कोकणात शेळीपालन, दूध उत्पादन, मत्सोद्योग हे जोड धंदे म्हणून विकसीत झाले पाहिजेत. सध्या महाराष्ट्रातील शेतकरी सर्व बाजूने संकटात सापडला आहे. हुकमी पीक व हमखास नगदी उत्पन्न यापासून दूर चालला आहे. शेतीचा उद्योग दिवसेंदिवस बेभरवशाचा होत चालला आहे. कोकणातील शेतकरी आज आपल्या जमा खर्चाची मेळ घालून काम करीत असला तरीही त्याने पर्यायी व्यवस्था आत्तापासून करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. कोकणात शेतकर्‍यांच्या आत्महत्या न होण्यामागे बरीच कारणे असली तरीही त्याने शांतपणे हातावर हात ठेवून बसण्यात काहीच अर्थ नाही. पशुपालन, शेळी-मेंढी-कोंबडी-मासे पालन याकडे गांभीर्याने पाहिले तरच शेतकरी भविष्यात जगेल. मासे उत्पादनामध्ये आंध्र प्रदेश देशात आघाडीवर आहे. या राज्यातील धोरणे त्यास पूरक आहेत. आपल्यला एवढा मोठा समुद्रकिनारा लाभला असला तरीही आपण मत्स्योत्पादन आपण एक व्यवसाय म्हणून अजूनही करीत नाही. ज्याप्रमाणे  अनेकांना रोजगार देणारे ठरु शकते. आपल्याला लहान कोळी बांधवांचा व्यवसाय जपायचा आहे तसेच मोठा व्यवसाय खोल समुद्रात जाऊन करायचा आहे. त्याच्या जोडीला कृत्रीम तळ्यातील मत्स्योपादन देखील शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न देऊ शकते. तिलापीया माशांचे उत्पादन केले तर 7 ते 8 महिन्यांमध्ये 10 लाख रुपये प्रति एकरी उत्पन्न मिळू शकते. चालू वर्षी 250 कोटींची तरतुद पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय व दुग्धव्यवसायासाठी आहे. उर्वरित 125 कोटींपैकी पशुसंवर्धन विभागाकडे फक्त 60 कोटी रुपये वर्ग झाले आहेत, तर पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी काय निर्णय घ्यावे व राज्याचे काय नियोजन करावे, हा मोठा प्रश्‍न आहे.
कृषीपूरक व्यवसायामध्ये 50 टक्के भाग उत्पन्नाचा आहे. शेळीपालन हे शेतकर्‍यासाठी एक चांगले उत्पन्न देणारे ठरु शकते. कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील हवामानाला पुरक अशी शेळीची जात तयार केली आहे. ही शेळी चांगले उत्पन्न देते. महाराष्ट्रात शेळ्यांची संख्या वाढली तर त्यांच्या दुधापासून चीज उत्पादन करणारे आपले राज्य म्हणून जगात नावारूपास येईल. शेतकर्‍यांना त्यांच्या पायावर उभे करायचे असेल तर त्यांना अशा प्रकारचे जोड धंदे उपलब्ध करुन दिले पाहिजेत. त्यासाठी शेतकर्‍यांचे समूह स्थान केले पाहिजेत. यातून त्यांची क्रयशक्ती वाढू शकते. कोकणात नारळ, काजू, आंबा यांचे उत्पादन कसे वाढेल हे पाहिले पाहिजे. त्यासाठी केरळने केलेल्या प्रयोगांकडे आपल्याला पहावे लागेल. खरे तर सुरुवातीला कोकणातील नारळ व काजू हे देशात सर्वत्र लोकप्रिय होते. मात्र आता केरळने आपल्यावर बाजी मारली आहे. त्यांनी त्यासाठी नारळासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करुन शेतकर्यांना विशेष प्रशिक्षण दिले. किडीचा प्रतिकार करणार्‍या कही नवीन नाराळाच्या जाती शोधून काढल्या. यातून उत्पादन वाढले. काजूचे देखील तसेच आहे. काजूच्या विविध जाती शोधून शेतकर्‍यांना उत्पादन वाढवून दिले. यासाटी आपल्याकडील कृषी विद्यापीठांनी अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र याचा प्रसार व प्रचार अजूनही सर्वसामान्य शेतकर्‍यात झाला नाही. त्यामुळे अनेकदा शेतकर्‍यांना कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधनाचा फारसा उपयोग होत नाही. कोकणात दुग्ध उत्पादन आजवर चांगले रुजलेले नाही. पश्‍चिम महाराष्ट्रात ज्या प्रकारे हा व्यवसाय् घरोघरी केला जातो त्या प्रकारे कोकणात जर याची पाळेमुळे रुजली तर शेतकर्‍यांना एक चांंगले वरदान ठरु शकते. शेतकर्‍यांने केवळ दुधाचे उत्पादन करुन चालणार नाही तर त्या जोडीला त्याचे दूध खरेदी करणारी सहकारी संख्या उभारली जाणे गरजेचे आहे. त्यामुळे घरातून दूधाचे उत्पादन उचलले जाऊ शकते. सहकारी क्षेत्र कोकणात रुजत नाही असे म्हटले जाते. परंतु चांगले सहकारी क्षेत्रातील प्रयोग आजवर झालेलेच नाहीत. सहकारी क्षेत्रातील बँका कोकणात चांगल्या रितीने चालू शकतात. तर दूधाची सहकारी संस्था का नाही चालणार असा सवाल आहे. कोंबडी पालन कोकणात अनेक भागात शेतकर्‍यांनी यशस्वी करुन त्यातून चांगले उत्पादन मिळू शकते हे दाखवून दिले आहे. त्याच धर्तीवर शेळी पालन व दुग्ध व्यवसाय चालविला जाऊ शकतो. हे जर झाले तर येथील शेतकरी अधिक समृध्द होऊ शकतो. यासाठी आत्तापासून आखणी केली गेली पाहिजे. याचा शेतकर्‍यांनी व राजकीय पुढार्‍यांनी विचार केला पाहिजे. शेती व्यवसाय वाढवायचा असेल व शेतकर्‍याला वाचवायचा असेल तर शेती पुरक व्यवसायांची जोड दिलीच गेली पाहिजे.
----------------------------------------------------

0 Response to "शेतीपुरक व्यवसाय आवश्यक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel