-->
स्वाभिमानी(?)

स्वाभिमानी(?)

मंगळवार दि. 3 ऑक्टोबरच्या अंकासाठी अग्रलेख-
---------------------------------------------
स्वाभिमानी(?)
माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसला नुकताच हात दाखविलेले कोकणचे नेते नारायण राणे यांनी अखेर सर्वांचे अंदाज खोटे ठरवित भाजपात प्रवेश न करता स्वतंत्र पक्षाची घोषणा केली आहे. अर्थात त्यांच्या भाजपा प्रवेशाला अनेकांचा विरोध होता. खुद्द मुख्यमंत्र्यांनाच राणे पक्षात नको होते, हे उघड झालेले सत्य आहे. मात्र केंद्रीय नेतृत्व नेतृत्वास प्रामुख्याने अमित शहा यांना राणेंनी पक्षात प्रवेश करावा असे वाटत होते. भाजपाची पितृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राणेंच्या प्रवेशाला सुरुवातीला विरोध होता. मात्र नंतर त्यांचा विरोध मावळला असे सांगण्यात येते. संघ अशा राजकीय बाबतीत उघडपणे कधीही वाच्यता करीत नाही, मात्र पडद्याआड कारवाया करीत असतो. त्यामुळे त्यांची राणेंच्या संदर्भात भूमिका कोणती हे कधीच स्पष्ट झाले नाही. मात्र राणेंचा प्रवेश लांबला व अखेरीस रद्द झाला त्यावरुन संघाचाही त्यांना विरोध होता हे स्पष्टच आहे. नारायण राणे यांचे पुत्र अध्यक्ष असलेल्या स्वाभिमानी संघटनेचे आता पक्षात रुपांतर केले जाणार आहे, असेच म्हणावे लागेल. कारण स्वाभिमानी ही संघटना राणेंनी कॉँग्रेस पक्षात असल्यापासून समांतर सुरु ठेवली होती. खरे तर अशा प्रकारची समांतर संघटना कॉँग्रेस पक्षात खपवून घेतली जात नाही. असे असले तरीही राणेंकडे याबाबत कॉँग्रेस पक्षाने उदारमतवादी दृष्टीकोन ठेवून दुर्लक्ष केले होते. आता राणेंनी पक्षाला स्वाभिमानी असे नाव दिले आहे. मात्र भाजपाने मानहानी केल्यावर त्यांच्यावर स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची वेळ आली आहे, हे विसरता येणार नाही. राणेंचा स्वाभिमान काय आहे ते यावरुन स्पष्ट दिसते. भाजपामध्ये त्यांना होत असलेला विरोेध पाहता त्यांना मागील दरवाजाने अशा प्रकारे सत्तेत वाटेकरी करुन घेण्यचा हा डाव आहे. तसेच राणेंचे चिरंजीव नितेश राणे व आता एकमेव पाठिराखे राहिलेले आमदार  कालिदास कोळंबकर यांची आमदारकी अशा प्रकारे वेगळा पक्ष स्थापन करुन वाचविली जाऊ शकते. नितेश राणे व कोळंबकर या दोघांनीही पुन्हा निवडणूक लढविल्यास त्यांची पुन्हा विजयी होतीलच याची काही खात्री देता येत नाही. कारण हे दोघेही अतिशय निसटत्या माताधिक्याने विजयी झाले होते. त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यातील पळवाट काढून त्यांची आमदारकी वाचविण्याचा बहुदा प्रयत्न केला जाईल. राणेंच्या या स्वाभिमानी पक्षाचे अस्तित्व राज्यवापी असणार अशी घोषणा केली असली तरीही अर्थातच याचे कार्यक्षेत्र कोकणापूरतेच म्हणजे बहुतांशी सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतेच मर्यादीत असेल. राणेंनी आपल्यामागे 25 आमदार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला होता. त्यांच्या या आत्मविश्‍वासाचा फुगा लवकरच फुटेल अशी अपेक्षा आहे. नारायणरावांनी अशा फुकाच्या गमजा यापूर्वी अनेकदा केल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे फारसे कुणी लक्ष देत नाही. मात्र नवा पक्ष स्थापन करुन राणेंनी आपली खरी ताकद राज्यात काय आहे, हे जनतेला दाखविण्याची चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे. आपल्या राज्यात अशा प्रकारे वन मॅन आर्मी असणारे पक्ष काही कमी नाहीत. सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, विनायक मेटे, महादेव जानकर, बच्चू कडू, रामदास आठवले व राज ठाकरे यांच्या जोडीला आता नारायण राणे आले आहेत, असे आपल्याला म्हणता येईल. अर्थात अशा प्रकारचा पक्ष स्थापन करुन आपली सत्तेच्या घोडेबाजारात किंमत वाढवून घेणे फारच फायदेशीर असते. प्रामुख्याने ज्यावेळी एखाद्या पक्षास स्पष्ट बहुमत मिळत नाही त्यावेळी अशा पक्ष नेत्यांची चांगलीच चलती होते. नारायण राणेंचा स्वाभिमानी पक्ष आता भाजपाच्या वळचणीला लागणार आहे. दोन वर्षांनी निवडणूक झाल्यावर कॉँग्रेसला जर सत्तेच्या जवळ जाण्याची संधी मिळाली तर राणे पुन्हा कॉँग्रेसच्या कळपात जाऊ शकतील. अर्थात त्यांनी कॉँग्रेस सोडताना नाही तरी केंद्रीय नेतृत्वावर टीका केलेली नाही. उलट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहूल गांधी यांचे नेहमीच सहकार्य लाभले असे सांगून पुढे काळाच्या ओघात कॉँग्रेस पक्षाशी जवळीक करण्याचा आपला पर्याय खुला ठेवला आहे. अर्थात असे राजकारण करुनही लोक जर स्वत:ला स्वाभिमानी म्हणवून घेतात यावरुन आपले राजकारण किती खालच्या पातळीचे झाले आहे, हे दिसते. सध्या कोणालाही पक्षाची वैचारिक बैठक नको आहे. फक्त हव्या आहेत त्या सत्तेच्या चाव्या. कारण सत्ता असली की आपण समाजसेवा करु शकतो, सत्तेशिवाय ते शक्य नाही अशी ठाम राजकारण्यांची समजूत झालेली आहे. राणेंची जी सध्या मर्यादीत ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे तिकडे त्यांच्या पक्षाला चांगला पाठिंबा लाभेल, यात काही शंका नाही. परंतु आता अशा प्रकारे सतत पक्षांतरे केल्याने त्यांची प्रतिमा मलिन होणार आहे हे नक्की. याचा फायदा विरोधक उचलू शकतात. गेल्या विधानसभेला अशक्य वाटणारा पराभव राणेंना मालवणकरांनी दाखवून दिला आहे, हे विसरता येणार नाही. सध्याच्या स्थितीचा विचार करता राणेंच्या स्वतंत्र पक्षाला भाजपला फारसा काही फायदा होणार नाही. उलट राणेंसारखा स्पष्ट वक्ता व त्यांच्या दोघा मुलांना पक्षात घेऊन भाजपाला फायद्यापेक्षा तोटाच जास्त होईल. शिवसेनेच्या विरोधात तोफा डागायला फक्त राणेंचा चांगला उपयोग होऊ शकतो. भाजपा त्यांचा त्याचबाबतीत चांगला वापर करुन घेईल. राणेंना पक्षात घेतो म्हणून सांगून भाजपाने किमान चार महिने दारात उभे केले त्यावेळीच राणेंचा स्वाभिमान मरण पावला होता. कॉँग्रेसमध्ये तरी त्यांचा स्वाभिमान टिकून होता. आता नवीन स्वाभिमान पक्ष स्थापन करुन राणे कोणता तीर मारतात ते पहायचे.
----------------------------------------------------------------------------------------

0 Response to "स्वाभिमानी(?)"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel