-->
गुजरातमध्ये काय होणार?

गुजरातमध्ये काय होणार?

रविवार दि. 24 सप्टेंबर 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
गुजरातमध्ये काय होणार?
-----------------------------------------
एन्ट्रो-गुजरातमध्ये गेल्या दोन वर्षात कॉग्रेसने अनेक जिल्हा परिषदा काबीज केल्याने त्यांना अच्छे दिन येतील असे वाटते. कॉग्रेसला आजवर गेल्या वीस वर्षात ज्या जिल्हा परिषदांमध्ये यश मिळाले नव्हते अशा ठिकाणी त्यांना आपला झेंडा फडकविता आला आहे. त्यावरुन आगामी विधानसभा भाजपाला सोपी नाही, हे नक्की. त्यातच सोशल मीडियातील विकास वेडा झालाय या उपहासात्मक टीका मोहिमेमुळे गुजरातमधील भाजपचे सरकार, तसेच नेते अक्षरश: धास्तावले आहेत. वेगवेगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकारसह राज्य सरकारवर गुजारातमध्ये सोशल मीडियावर सध्या टीकेची जोरदार राळ उठवली जात आहे.
------------------------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमीत आगामी काळात होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत काय होणार असा अनेकांचा सवाल आहे. गुजरातच्या निवडणुकींचा माहोल आत्तापासूनच रंगू लागला आहे. येथील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या कॉग्रेस वरवर पाहता कमकुवत वाटत असला तरीही त्यांना कमी लेखणे म्हणजे भाजपाचा घात झालाच असे समजण्यासारखे आहे. कारण वाटते तेवढी ही निवडणूक भाजपासाठी सोपी निश्‍चितच नाही. पंतप्रधान गुजरातचे असल्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. मात्र गेल्या दोन वर्षात कॉग्रेसने येथील निवडणुकांमध्ये भाजपाला सपाटून मार खायला लावला आहे. त्यातील सर्वात महत्वाचा राज्यसभेचा निकाल म्हणजे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा झालेला निसटता पराभव. हा पराभव निसटता असला तरी भाजपाला लागलेला तो एक मोठा चटका होता.
त्यानंतर खरे तर कॉग्रसेमध्ये उत्साह संचारला पाहिजे होता. परंतु केंद्रातील पराभवानंतर अजूनही कॉग्रेस सावरलेले नाहीत. तरी देखील गुजरातमध्ये गेल्या दोन वर्षात कॉग्रेसने अनेक जिल्हा परिषदा काबीज केल्याने त्यांना अच्छे दिन येतील असे वाटते. कॉग्रेसला आजवर गेल्या वीस वर्षात ज्या जिल्हा परिषदांमध्ये यश मिळाले नव्हते अशा ठिकाणी त्यांना आपला झेंडा फडकविता आला आहे. त्यावरुन आगामी विधानसभा भाजपाला सोपी नाही, हे नक्की. त्यातच सोशल मीडियातील विकास वेडा झालाय या उपहासात्मक टीका मोहिमेमुळे गुजरातमधील भाजपचे सरकार, तसेच नेते अक्षरश: धास्तावले आहेत. वेगवेगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकारसह राज्य सरकारवर गुजारातमध्ये सोशल मीडियावर सध्या टीकेची जोरदार राळ उठवली जात आहे. त्यातच सोशल मिडियावर सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत गुजरातच्या एका महिला खासदार बांधलेल्या गटारांची पहाणी करण्यासाठी गेल्या असता त्या कुचकामी बांधकामामुळे तेथेच कोसळल्या, या व्हिडोओमुळे संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान मोदी विकासाची भाषा करतात, मात्र लोकांचे जीवन फारसे सुसह्य बनलेले नाही. वाढती महागाई व लोकांना दैनंदिन जीवनात होणार्‍या त्रासाबद्दल या मेसेजेसद्वारे जोरदार टीका केली जात आहे. टीकेचे अशा प्रकारचे संदेश व्हॉट्सऍपवरून एखाद्या वणव्याप्रमाणे वेगाने पसरत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे राज्यातील भाजपचे सरकार, नेतेच नव्हे; तर पक्षाचे हाय कमांडही काळजीत पडले आहे. येत्या डिसेंबरमध्ये राज्यात होणार्‍या निवडणुकीत सोशल मीडियातील या नाराजीचा पक्षाला फटका बसण्याची भीती या नेत्यांना वाटू लागली आहे. ज्या सोशल मिडीयाच्या जोरावर आपण निवडणूक जिंकून केंद्रात सत्तेत आलो व त्याची बीजे ही गुजरातमध्ये रोवली गेली तेय्ूनच पराभव होतो की काय अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो अबे व पंतप्रधान मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या दौर्‍यादरम्यान सोशल मीडियात अनेक मेसेज वेगाने फिरत होतेे. त्यांच्या दौर्‍यावेळी अहमदाबाद महापालिकेने काही ठराविक रस्तेच स्वच्छ केले. दोन्ही नेते जाणार असलेल्या रस्त्यावरीलच खड्डे बुजविण्यात आले. तसेच या वेळी शहरी भागांत केलेल्या झगमगाटावरील कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीला सोशल मीडियाने लक्ष्य केले आहे. कोना बापनी दिवाली, विकासना बापनी दिवाली (कोणाच्या वडिलांची दिवाळी, विकासाच्या वडिलांची दिवाळी) हा गुजराती भाषेतील संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या धारदार टीकेची दखल पक्षाध्यक्ष अमित शहा व राज्याचे प्रभारी अरुण जेटली यांनी गांभीर्याने घेतली आहे. या टीकेची फारशी दखल न घेण्याचा सल्ला त्यांनी पक्षकार्यकर्त्यांना दिला आहे; तर विकास वेडा झाला याबाबत मुख्यमंत्री विजय रूपानी, प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी या भाजप नेत्यांनी ज्या प्रकारे नको इतके महत्त्व देत प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्यावर जेटली यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. कारण या भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया आता टीकेचा विषय बनला असून, त्याला गरब्याच्या गाण्याची जोड देत ते रिंग टोन बनविण्यात आले आहेत. तब्बल दशकभर हिंदुत्वाभोवती घुटमळलेल्या राज्याच्या राजकारणाने आता जातीय रंग दाखवायला सुरवात केली आहे. तीन उच्चवर्णीय आणि एका आदिवासी नेत्याने सत्ताधारी भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण केले असून, अन्य पक्ष हे जातीय नेतृत्व आपल्या दावणीला कसे बांधता येईल या विचारात आहे. गुजरातमध्ये नव्वदच्या दशकापासून सत्तेच्या परिघात वावरणार्‍या भाजपला आता प्रथमच किचकट जातीय समीकरणे सोडवावी लागणार आहेत. राज्यामध्ये 2002 मध्ये झालेल्या धार्मिक दंगलीनंतर जात हा घटक काहीसा मागे पडला होता. त्या वेळी दलित आणि आदिवासींनीही भाजपला मतदान केले होते; पण आता होणार्‍या विधानसभा निवडणुकीत तीन जातीय घटक महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. यातील पहिला घटक हा आंबेडकरी जनता दुसरा पटेल समर्थक आणि तिसरा क्षत्रीय हा आहे. भाजपच्या 19 वर्षांच्या सत्ताकाळात नरेंद्र मोदी हे आक्टोबर 2001 ते मे 2014 पर्यंत म्हणजे तब्बल 13 वर्षे मुख्यमंत्री होते. 2002, 2007 आणि 2012 अशा सलग तीन वेळा भाजपने आपला विजयी ध्वज येथे फडकावला. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व 24 जागा जिंकत विरोधकांना भुईसपाट केले होत, पण विधानसभेची आगामी निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही. आनंदीबेन यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेले विजय रूपानी हे प्रभावहीन नेते आहेत, अशी समजूत लोकांची ठाम झाली आहे. अल्पेश ठाकूर (क्षत्रिय ठाकूर नेते) आणि हार्दिक पटेल (पाटीदार नेते) हे दोन घटक आगामी निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. पटेल आंदोलनाची ताकद दिसून आल्यानंतर भाजपप्रमाणेच काँग्रेसनेही या समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने उच्चवर्णींयामधील आर्थिक मागासांना 20 टक्के आरक्षण देण्याचे आश्‍वास दिले होते. पंतप्रधान मोदी यांनी ज्या गुजराती विकासाच्या मॉडेलचे भांडवल केले, तेच भांडवल आता भाजपला पुरणारे नाही, हे संघ परिवारानेही मान्य केले आहे. शरद यादवप्रणीत जनता दल (संयुक्त)चे अध्यक्ष छोटूभाई वसावा हे आदिवासींचा चेहरा म्हणून पुढे आले आहेत. तब्बल सहावेळेस विधानसभेवर निवडून येणारे वसावा हे यादव यांचे निष्ठावंत आहे. दलित विकास आंदोलनाचे नेते जिग्नेश मेवानीस आपल्या गोटात ओढण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत, तर 120 मतदारसंघांमध्ये प्रभाव असलेल्या गुजरात क्षत्रिय ठाकूर सेनेच्या अल्पेश ठाकूर सोबत भाजपच्या वाटाघाटी सुरू आहेत. एकूणच गुजरातमधील समीकरणे झपाट्याने बदलत आहेत, हे मात्र नक्की.
----------------------------------------------------------

0 Response to "गुजरातमध्ये काय होणार?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel