-->
ब्रिटनमधील बॉम्बस्फोट

ब्रिटनमधील बॉम्बस्फोट

गुरुवार दि. 25 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
ब्रिटनमधील बॉम्बस्फोट
मॅन्चेस्टरमध्ये परवा रात्री अमेरिकी पॉप स्टार एरियाना ग्रांदे हिच्या संगीताच्या कार्यक्रमातून हजारो लोक बाहेर पडत असताना इसिसने घडविलेल्या आत्मघाती स्फोटात 22 जण ठार, तर 59 जण जखमी झाले. या कार्यक्रमासाठी तरुण व किशोरवयीन मुले मोठ्या प्रमाणात आली होती. या हल्ल्यात मुले बळी पडली आहेत. शो संपल्यावर एरियाना ही स्टेजवरून गेल्यानंतर हा स्फोट झाला. या स्टेडियमची क्षमता 21 हजार असून, ते पूर्णपणे भरले होते. लोक बाहेर पडतानाच हा स्फोट झाला. स्फोटानंतर लोक सैरावैरा पळू लागले. मॅन्चेस्टर एरिना हे शहराचे सर्वात मोठे ठिकाण आहे. येथे नेहमीच संगीताचे कार्यक्रम होतात. स्फोट झाल्यानंतर लोकांना मोफत सुरक्षित पोहोचविण्याचे काम येथे उभ्या असलेल्या टॅक्सीचालकांनी केले. तसेच स्थानिकांनीही अनेकांना रात्री आपल्या घरी राहण्याची व्यवस्था केली. या स्फोटात ठार झालेल्या आत्मघाती हल्लेखोराचे नाव सलमान अबेदी असे होते व तो 22 वर्षांचा होता, असे मॅन्चेस्टर पोलिसांनी जाहीर केले. मात्र तो कोणत्या देशाचा नागरिक होता हे त्यांनी लगेच उघड केले नाही. हल्लेखोराची ओळख पटल्यानंतर दहशतवादविरोधी पथकांनी संपूर्ण मॅन्चेस्टरमध्ये जोरदार धाड व झडतीसत्र सुरु केले. त्यात ठार झालेल्या हल्लेखोराच्या एका 22 वर्षांच्या संशयित साथीदारास अटक केली गेली. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी या घटनेचा निषेध केला आहे.सर्वच देशांच्या प्रमुखांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही घटनेची निंदा केली आहे. ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या काही आठवडे अगोदरच हा हल्ला झाल्याने थेरेसा मे आणि लेबर पार्टीचे जेरेमी कोर्बिन यांनी प्रचार मोहीम स्थगित केली. लंडनमध्ये 7 जुलै 2005 मध्ये अतिरेकी हल्ला झाला होता. मध्य लंडनमध्ये त्यावेळी साखळी स्फोट घडवून आणण्यात आले होते. यात 52 ठार, तर 700 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. त्यानंतरचा आता झालेला हा हल्ला. पॉप संगीताच्या कार्यक्रमात झालेल्या स्फोटानंतर खचून गेलेल्या एरियाना ग्रांदे हिने आपला जगातील प्रमुख देशातील नियोजित दौरा रद्द केला आहे. इंग्लंड, बेल्जियम, पोलंड, जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथे तिचा नियोजित दौरा होता. या हल्ल्यामुळे आपण तुटलो आहोत व या घटनेविषयी माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत, अशा शब्दात तिने वर्णन केले आहे. तरुणांमध्ये एरियानाची प्रचंड क्रेझ आहे. तिचे प्रॉब्लेम हे गाणे 2014 मध्ये ब्रिटनचे नंबर 1 गाणे होते.
अशा प्रकारच्या लोकप्रिय कार्यक्रमालाच नेमका बॉम्बस्फोट करमे म्हणजे अतिरेक्यांचे यासंबंधी किती मोठे नियोजन होते ते स्पष्टपणे जाणवते. ब्रिटनमधील या घटनेमुळे युरोपात अतिरेकी कारवाया स्थिरावत चालल्याचे आता दिसू लागले आहे. अतिरेक्यांनी सध्या तरी ब्रिटन व फ्रान्स या दोन देशात आपल्या कारवाया सुरु करुन तेथील जनतेच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी हे स्फोट घडविण्याचे डाव आखले आहेत. आजवर जगात युरोपातच अतिरेकी कारवाया फारशा दिसत नव्हत्या. अमेरिकेत  द्वीन टॉवरच्या घटनेनंतर मोठे काही हल्ले झाले नाहीत. कारण त्यांची तशी सुरक्षा यंत्रणा त्यांनी उभारली आहे. युरोपातही तशीच सुरक्षा यंत्रणा आहे. मात्र ती भेदण्यास आता अतिरेक्यांनी सुरुवात केली आहे. हा धोकादायक प्रकार आहे.

0 Response to "ब्रिटनमधील बॉम्बस्फोट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel