-->
ऋषीतुल्य व्यक्तीमत्व

ऋषीतुल्य व्यक्तीमत्व

सोमवार दि. 5 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
ऋषीतुल्य व्यक्तीमत्व
कोकणातील परशुरामाच्या भूमीत जन्मलेले हाडाचे शिक्षक, राजकारणी, पत्रकार व त्याहून माणसांचा अलोट संग्रह असणारे निशिकांत उर्फ नाना जोशी यांच्या निधनाने केवळ कोकणातील नव्हे तर महाराष्ट्रातील एक ऋषीतुल्य व्यक्तीमत्व काळाच्या पडघ्याआड गेले आहे. चिपळूणातील युनायटेड हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. कालांतराने त्यांच्यातला पत्रकार जागा झाला व त्यांनी सागर हे नियतकालीक जन्माला घातले. 52 वर्षापूर्वी एक नियतकालीक चालवित असताना नानांना फार कष्ट सोसावे लागले. त्यावेळी त्यांच्यासोबत मदतनीस म्हणून त्यांचे शाळेतील सहकारी मदत करीत. नाना स्वत घरोघरी फिरुन आपले हे नियतकालीत देत व वाचून त्याविषयी प्रतिक्रीया विचारीत. पुढे चिपळूणसारख्या त्यावेळच्या लहानशा शहरवजा गावात दैनिक सुरु करणे हे एक मोठे धाडसच होते. परंतु ते आव्हान त्यांनी स्वीकारले. आतासारखी त्याकाळी दळणवळणाची साधने नव्हती. एखादी बातमी पोहोचायलाच तासन-तास लागत. त्यातच लाईट गेलेली असेल तर त्याकाळी चिपळूनचा जगाशी संपर्क तुटलेला असे. मात्र त्याच्याशी दोन हात करीत नानांनी सागर उभा केला. आज सागरचा वटवृक्ष मुंबई, ठाण्यापासून ते तळकोकणापर्यंत अशा पाच आवृत्यांएवढा झाला आहे. सागरचा हा पसारा त्यांनी वाढविला असला तरी त्यांना आर्थिक गणित काही जमले नाही. कारण त्यांचा तो पिंड नव्हता. मात्र ती धुरा त्यांच्या पत्नींनी सांभाळली. वृत्तपत्राचे संपादकत्व सांभाळीत असताना त्यावेळी ते कॉँग्रेसमध्ये सक्रीय होते. काळाच्या ओघात ते 80 च्या दशकात आमदार झाले. खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाले. मात्र त्यांना त्या पराभवाची खंत कधीच वाटली नाही. सध्याच्या राजकारणाची तुलना ज्यावेळी ते पूर्वीच्या राजकारणाशी करीत त्यावेळी त्यांना सध्याच्या या बरबटलेल्या राजकारणाची चिड आलेली प्रकर्षाने जणवे. सध्याच्या या राजकारणात आपण जगू शकत नाही, आपली केवळ पैसे मिळविणे ही मानसिकता नाही, ते त्यांनी जाणून घेतले आणि टप्प्याटप्पयाने राजकारणातून बाहेर आले. असे असले तरीही प्रत्येक राजकीय घडामोडींवर त्यांचे बारकाईने लक्ष असे, जे चुकीचे असेल, मग कॉँग्रेस असो वा कोणताही पक्ष त्यांच्यावर एक जागृत संपादक म्हणून नेहमीच आसूड ओढीत. अगदी काँग्रेसचे आमदार असतानाही त्यांनी पक्षाच्या चुकीच्या धोरणाला कधीच माफ केले नाही. कोकणी जनतेच्या फायद्यासाठी आपला हातभार लागला पाहिजे, त्यासाठी आपण व सागर अग्रभागी असले पाहिजे ही त्यांची भूमिका होती. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी ही भूमिका सोडली नाही. त्यांचे सर्व पक्षात मित्र होते, तीन वर्षापूर्वी केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपातही व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही होते. मात्र त्यांनी त्यांच्या राजकारणापसून आपल्याला जाणूनबुजून चार हात दूरच ठेवले. भाजपाने एखादी चांगले धोरण घेतले तर त्याचे त्यांनी स्वागतही केले, मात्र त्यांचे चुकले त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर सडकून टीकाही केली. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी देखील त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. सामना सुरु करतान बाळासाहेबांनी नानांचा सल्ला घेतला होता व आपल्या  सहकार्‍यांना सागरचा प्रेस बघण्यास पाठविले होते. सामनाची कोकण आवृत्ती सुरु झाली त्यावेळी सुरुवातीला छपाई सागरमधून केली जात होती. अशा प्रकारे नानांनी पक्षाच्या पलिकडे जाऊन आपले मित्र जोपासले होते. नारायण राणे यांनी देखील प्रहारच्या सुरुवातीच्या काळात सागर प्रेसची मदत घेऊन कोकणातून अंक प्रकाशीत केला होता. आपल्या सागरला यातून स्पर्धा होईल हा विचार कधी त्यांच्या मनालाही शिवला नाही. उलट सर्व वृत्तपत्रांनी या कोकणात यावे व येथील लोकांना समृधद् करावे अशी त्यांची भूमिका होती. नाना हाडाचे शिक्षक होते त्यामुळे त्यांनी शिक्षकी पेशा सोडला असला तरीही राजकारणात, पत्रकारितेत ते नेहमीच शिक्षकाची भूमिका बजावित. कोकणात कोणत्याही पक्षाचा प्रमुख नेता येणार असेल तर त्याचे पाय हे सागरला लागणारच, हे जणू काही समिकरणच झाले होते. एकदा का कुणी नानांकडे आला की, काळ-वेळ विसरुन किमान दोन-तीन तास मनसोक्त गप्पा मारणे हे ओघात आलेच. मग तो राजकीय नेता असो की, पत्रकार. बॅरिस्टर नाथ पै यांच्या संस्कारातून वाढलेल्या नानांवर मधू दंडवते, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी यांच्या विचारांचा जबरदस्त प्रभाव होता. त्यांच्या भाषणात त्यांचा नेहमी उल्लेख असे. कॉँग्रेसी विचारसारणीवर त्यांचा पूर्ण विश्‍वास होता. सर्वधर्मसमभाव ही आपल्या देशाची गरज आहे, हे ते नेहमी सांगत. साधी रहाणी व उच्चविचारसरणी हे त्यांनी तंतोतंत अंमलात आपल्या आयुष्यात आणले होते. त्यांचा विविध विषयांवरील अभ्यास व वाचन पाहिल्यावर तरुण पत्रकारांना लाज वाटे. सध्याच्या काळात बदललेल्या पत्रकारितेची त्यांना चिड होती. वृत्तपत्रसृष्टीत तांत्रिक बदल होण्याच्या बाजूने ते नेहमीच होते, मात्र पत्रकारिताही निष्ठेने करण्याची बाब आहे, तो धंदा नाही, हे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी सागरला या सर्व घटकांपासून दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कोणताही पत्रकार संकटात सापडलेला असला तर नाना आपल्या सर्व तातदीचा वापर करुन त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत. हाच आपला धर्म आहे असे ते मानित. त्यांनी माणसे जोडली ही याच त्यांच्या मदत करण्याच्या वृत्तीतून. त्यांच्या या खास बाबीची पोच पावती कोकणातील मुसलमानांनी दुबईत एकत्र येऊन नानांचा सन्मान करुन केली. कोकणाविषयी त्यांना विशेष प्रेम, आपुलकी होती. मुंबई-गोवा चार पदरी महामार्ग करण्याच्या प्रश्‍न त्यांनी वारंवार लिहून सरकार दरबारी मांडला होता. आता या रस्त्याचे काम सुरु झाल्याने कोकणाचे चित्र बदलेल हे ते आवर्जुन सांगत. मात्र ते पहायला आपल्यात आता नाना नाहीत. त्यांच्या स्मृतीला कृषीवलचे अभिवादन.
----------------------------


0 Response to "ऋषीतुल्य व्यक्तीमत्व"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel