-->
जर्मनीत मोदी फ्लॅप?

जर्मनीत मोदी फ्लॅप?

शुक्रवार दि. 2 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
जर्मनीत मोदी फ्लॅप?
युरोपातील एक आघाडीची अर्थव्यवस्था व जगातील तिसरी मोठी आर्थिक शक्ती असलेल्या जर्मनीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच दौरा केला. सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान आपल्या देशात येतात म्हटल्यावर जर्मनीने त्यांचे यथोचित स्वागत जरुर केले. मात्र या दौर्‍यातून फारसे काही निष्पन्न निघाले नाही असेच म्हणता येईल. कारण जर्मनीने भारतापेक्षा चीनला विशेष महत्व दिले आहे. आपल्याकडे स्वातंत्र्यपूर्व काळापासून जर्मन बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. त्यांचा भारतातील पसारा मोठा आहे. मात्र चीन पुरवित असलेल्या पायाभूत सुविधा लक्षात घेता जर्मन कंपन्या आता भारतात गुंतवणूक करण्याऐवजी चीनमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहे. त्यामुळेच जर्मनीतील वृतपत्रांनी चीनच्या पंतप्रधानांच्या भेटीच्या वेळी जेवढी प्रसिध्दी दिली होती त्या तुलनेत भारताचे पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे वृत्तांकन तेवढ्या जोमदारपणे केले नाही. युरोपमध्ये भारतासाठी जर्मनी जवळचा सहकारी देश असला तरी, जर्मनीसाठी मात्र भारतापेक्षा चीन जास्त महत्वाचा आहे. जर्मनीचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पेनसाठी रवाना होताच चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांची भेट घेतली. चीन आमच्यासाठी आर्थिक आणि व्यापारी दुष्टीकोनातून महत्वपूर्ण देश आहे असे जर्मनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. युरोपच्या बाहेर चीन जर्मनीचा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. पण अर्थव्यवस्थेच्या पलीकडे चीनची व्यापारी धोरणे आणि ओबीओआर प्रकल्पाच्या विस्ताराबद्दल जर्मनी सावध आहे. भारताने योग्यवेळी जर्मनीबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी पावले उचलली असली तरी, जर्मनीच्या दृष्टीकोनातून अजूनही भारतापेक्षा चीन जास्त महत्वाचा आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने वेगळा आशिया-पॅसिफिक विभाग सुरु केला आहे. भारत आणि चीन या दोन देशांबरोबरच्या संबंध दृढ करण्यावर या विभागाचा भर असेल. आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर भारत-जर्मनी किंवा भारत-युरोप संबंधाचे भवितव्य अवलंबून असेल. अमेरिकेबरोबर दुरावा वाढल्यानंतर जर्मनीच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसत आहे. आपण दुसर्‍यांवर पूर्णपणे अवलंबून रहायचो तो काळ आत मागे पडला आहे. 2016 मध्ये भारत आणि जर्मनीमध्ये 17.42 अब्ज डॉलरचा व्यवहार झाला. या दौर्‍यात जर्मनीमधल्या छोटया आणि मध्यम उद्योग कंपन्यांना भारताच्या मेक इन इंडिया प्रोजेक्टमध्ये जोडण्याचा मोदींनी प्रयत्न केला. आर्थिक संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत. मी या भागीदारीसाठी खूप आशावादी आहे असे मोदीं म्हणाले, मात्र हे प्रत्यक्षात उतरणार किंवा नाही ते पहायचे. भारताच्या दृष्टीने युरोपात जर चांगले पाय रोवायचे असलतील तर जर्मनी हाच चांगला सहकारी आहे. आज युरोपातील जवळजवळ सर्वच देश आर्थिक संकटात आहेत. अशा वेळी जर्मनीशी आपण व्यापार वाढविण्यास भरपूर संधी आहे. आय.टी. उद्योगातील भारतीय कंपन्यांनाही जर्मनीत मोठा वाव आहे. पंतप्रधानांची जर्मन भेट यासाठी मोठी मदतकारक ठरणार आहे. परंतु जर्मनीचा भारताविषयक दृष्टीकोन बदलणार का हा मुख्य प्रश्‍न आहे.

0 Response to "जर्मनीत मोदी फ्लॅप?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel