-->
आता झिंकाचा धोका

आता झिंकाचा धोका

मंगळवार दि. 30 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
आता झिंकाचा धोका
आशिया व आफ्रिका खंडात असलेल्या झिंका विषाणूचे रोगी आता भारतात आढळल्याने आपल्या आरोग्य व्यवस्थेपुढे एक नवे आव्हान उभे राहाणार आहे. अहमदाबादमध्ये तीन रुग्णांमध्ये झिंका आढळल्याने देशात एकूणच खळबळ माजणे स्वाभाविक आहे. कारण, आजवर आपला देश या झिंकाच्या रोग्यांपासून मुक्त होता. जागतिक आरोग्य संघटनेने याला दुजोरा दिल्याने आपल्याकडील रोगांमध्ये आता आणखी एका रोगाची भर पडली आहे. गुजरात सरकारने 2022 सालापर्यंत राज्य मलेरियामुक्त करण्याची घोषणा केली आणि नंतरच काही काळाने झिंका आढळला आहे. झिंका व डेंग्यूचे विषाणू एकच आहेत. त्यामुळे झिंका आपल्याकडे डेंग्यूच्या विषाणूंमार्फतच पसरले असावेत, असा अंदाज आहे. गर्भारपणाच्या काळात आईकडून नवजात बालकाला या विषाणूचा संसर्ग होतो. हा विषाणू बाळाच्या मेंदूवर हल्ला करतो. परिणामी, या मुलाला जन्मानंतर मायक्रोसेफिली हा रोग होतो. झिका विषाणूचा प्रसार हा डासाच्या चावण्याने होतो. यात हलका ताप येतो व शरीरावर रॅश उठते. यात डोकेदुखी मोठ्या प्रमाणावर सतत होत राहते, तसेच जॉईंट दुखत राहतात. या रोगावर कसलेही ठोस औषध उपलब्ध नाही, तसेच याची लसदेखील अजून शोधण्यात आलेली नाही. त्यामुळे याचा रोगी हा रामभरोसे जगतो. त्याच्या आयुष्याची दोरी दिवसेंदिवस कमी होत जाते. या रोगाची लक्षणे दिसणार्‍या रोग्यांच्या रक्ताची मोठ्या संख्येने तपासणी आरोग्य खात्यामार्फत करण्यात आली, तसेच अनेक डासांचीदेखील तपासणी केली गेली. त्यानंतर तीन जणांमध्ये झिंकाचे विषाणू आढळले आहेत. आपल्याकडे डेंग्यू, मलेरिया यासारखे रोग गल्या काही वर्षांत झपाट्याने वाढले आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, आपण सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतेही नियोजन केलेले नाही. त्यामुळे डासांची पैदास होण्यास मदत होते व त्यातूनच विविध संसर्गजन्य रोग फैलावत आहेत. आज अनेक मोठ्या शहरात हे रोग आढळतात याचे कारणच हे आहे की, या शहरांमध्ये स्वच्छता पाळली जात नाही, स्वच्छ पिण्याचे पाणी नागरिकांना आपण अजूनही पुरवू शकलेलो नाही. त्याचबरोबर उघडी गटारे आहेत, सांडपाण्याचा योग्य निचरा होत नाही, कचरा आपल्याकडे डंपिंग ग्राऊंडवर टाकणे व त्याला जाळणे याशिवाय काही करत नाही. जगातील अनेक देश या कचर्‍यापासून ऊर्जा किंवा खतांची निर्मिती करतात. अशा प्रकारे कचर्‍याचे नियोजन करुन त्यापासून ऊर्जा निर्माण करणारे एकही शहर आपल्याकडे नाही, हे मोठे दुर्दैव आहे. अशा प्रकारे जोपर्यंत नागरिकांना आपण या किमान गरजा पुरवित नाही, तोपर्यंत अशा प्रकारचे साथीचे रोग फैलावतच जाणार आहेत. यातून त्यांचे दैनंदिन जीवनमान खालावत जाणार आहे. एकीकडे आपण पोलिओ, देवी यासारखे रोग संपुष्टात आणण्यात यश मिळविले. परंतु, दुसरीकडे नवनवीन रोगांना दरवाजे उघडे करुन दिले. यावर आपण कधी मात करणार, हा सवाल आहे.
-------------------------------------------------------------

0 Response to "आता झिंकाचा धोका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel