-->
राणें कॉग्रेसमध्येच?

राणें कॉग्रेसमध्येच?

बुधवार दि. 24 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
राणें कॉग्रेसमध्येच?   
नारायण राणे सध्या कोणत्या पक्षात आहेत? नुकत्या झालेल्या वस्तू व सेवा कर विधेयकाच्या विशेष आधिवेशनात त्यांनी सत्ताधार्‍यांवर केलेली टीका पाहता, राणेंचा मुक्का कॉग्रेसमध्येच राहाणार असे दिसते. गेल्या दोन महिन्यांपासून राणेसाहेब भाजपामध्ये जाणार अशा वावड्या सुरु होत्या. राणेंच्या वक्तव्यावरुनही त्यात तथ्य दिसत होते. त्यानुसार, राणे भाजपाचा दरवाजा खटखटावत आहेत असेच वाटत होते. मात्र आता भाजपापासून राणे दूर जात असल्याचे दिसत आहे. जी.एस.टी. हे महाराष्ट्राच्या हिताचे नसून राज्याला दिवाळखोरीकडे नेणारे असल्याची जोरदार टीका काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी विधान परिषदेत केली. अर्थातच ही त्यांची टीका टोकाची झाली. कारण केंद्रातील या विधेयकाला कॉग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता व कॉग्रेसच्याच पाठिंब्यामुळे हे विधेयक संमंत झाले होते. फक्त कॉग्रेसचा विरोध हा कराचा दर ठरविण्याचा होता. जी.एस.टी.ला कधीच नव्हता. कारण जी.एस.टी.चा प्रणेताच कॉग्रेस पक्ष आहे. राणेंनी यात मांडलेले काही मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. राज्यात जीएसटी लागू झाल्यानंतर एकीकडे करवाढ होणार असली तरी उत्पन्नात जवळपास 35 टक्क्यांनी घट होणार असून महाराष्ट्र यामुळे केवळ कमकुवत होणार आहे. आज अमेरिकेत 11.7 टक्के कर आहे. जर्मनीत 17.5 टक्के, जपानमध्ये 16 टक्के, चीनमध्ये 17 टक्के, तर रशियात 24 टक्के कर असून जीएसटीनंतर राज्यातील कराची पातळी 28 टक्के एवढी होणार आहे. करांच्या बाबतीत आपण जगात प्रथम क्रमांकावर असू, असा टोला राणेंनी जो लगावला तो खराच आहे. महाराष्ट्राची तिजोरी आजच खाली आहे. कर्जाचा डोंगर राज्यावर असून केवळ व्याजापोटी 32 हजार कोटी रुपये चुकवावे लागणार आहेत, अशी राणेंची टीका रास्तच आहे. राज्याचा वाटा तसेच महापालिकेचा हिस्सा जर वेळेत मिळाला नाही तर त्याची जबाबदारी राज्य शासन घेणार आहे का, असा सवालही त्यांनी केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई पालिकेला जकातीच्या माध्यमातून सात हजार कोटी रुपये मिळतात. त्याची जबाबदारी केंद्र शासनाने न घेतल्यास उद्या मुंबई महापालिकेतील कर्मचार्‍यांचा पगार तरी होऊ शकेल का, असा प्रश्‍न करतानाच समजा उद्या नैसर्गिक आपत्ती अथवा कर्जमाफी करायची असेल तर सरकार पैसा आणणार कोठून, असा सवालही त्यांनी केला. राणेंनी उपस्थित केलेले हे मुद्दे योग्यच आहेत. मात्र त्यावरुन एक बाब स्पष्ट झाली की, राणे आता भाजपामध्ये जात नाहीत.
-----------------------------------------------------

0 Response to "राणें कॉग्रेसमध्येच? "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel