-->
येरे येरे पावसा...

येरे येरे पावसा...

मंगळवार दि. 30 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
येरे येरे पावसा...
उष्णतेच्या लाटा सहन करणार्‍या देशवासियांसाठी एक चांगली खुशखबर आली आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 102 टक्के, तर कोकणात 105 टक्के पडण्याची शक्यता ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केल्याने आता दिलासा मिळाल्यासारखे वातावरण आहे. अंदमानात नियोजित वेळेच्या अगोदरच यंदा पाऊस दाखल झाल्याने यंदा पावसाळा नक्कीच लवकर आहे. मान्सून आता केरळाच्या वाटेवर असून, येत्या 30 मेपर्यंत तेथे पाऊस बरसला की, पुढील दोन-चार दिवसांत महाराष्ट्राची किनारपट्टी गाठेल. येत्या 2 ते 4 जूनदरम्यास मान्सूनच्या पहिल्या सरी राज्यात बरसतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पाऊस अगदी हाकेच्या अंतरावर आला आहे, असे म्हणता येईल. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. त्याअगोदर मात्र दोन वर्षे ङ्गअल निओफच्या प्रभावामुळे पावसावर अनेक मर्यादा आल्या होत्या. अर्थात, यंदादेखील सुरुवातीला ङ्गअल निओफचा प्रभाव असेल, असे बोलले जात होते. मात्र, नंतर हवामान खात्याने यंदा हा प्रभाव नसल्याचे स्पष्ट केले. यंदा पावसाच्या पहिल्या अंदाजात पाऊस वेळेत असेल व सरासरीएवढा असेल, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, आता दुसर्‍या अंदाजानुसार, यंदा पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी शेतकरी व जनतेला मोठा दिलासा मिळणार, हे नक्की. डॉ. साबळे यांच्या अंदाजानुसार, वार्‍याचा वेग कमी आढळल्यास जून व जुलै महिन्यात पावसात खंड पडू शकेल. त्यामुळे कमी दिवसांत जास्त पाऊस पडेल, असा अंदाज आहे. यात मराठवाडा, विदर्भ येथील पावसाच्या खंडाचा कालावधी जास्त असेल. मात्र, नशिक, पुण्यात पाऊस अंदाजाप्रमाणे जास्त पडेल. उन्हाळ्याच्या दिवसात यावेळी सरासरीपेक्षा जास्तच उष्मा होता. त्यामुळे मान्सून हा यावेळी वेळेपेक्षा लवकरच येईल. 2 ते 4 जूनदरम्यान चांगला पाऊस अपेक्षित असल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीसाठी हा उत्तम कालावधी ठरेल. त्यामुळे यंदा मटकी, मूग, उडीद अशा कडधान्यांसाठी यंदाचा कालावधी चांगला ठरेल. महाराष्ट्रात यंदा दरवर्षीप्रमाणे कोकणात चांगला पाऊस अपेक्षित आहे. सरासरीच्या 105 टक्के पाऊस कोकणात पडण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. कोकणात पावसाची नेहमीच चांगली दृष्टी असते. यंदादेखील ही कृपा राहील व कोकणातील नद्या दुथडी भरुन वाहतील. पश्‍चिम महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे भाकीत आहे. विदर्भ व मराठवाडा यंदा कोरडा राहणार नाही, ही चांगली बाब म्हटली पाहिजे. त्यामुळे यंदा चांगला पाऊस झाल्यास दुष्काळी वातावरण पुढील वर्षी राहणार नाही. गेल्या वर्षीदेखील समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा तेवढा दुष्काळ जाणवला नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची झळ फारशी लागली नाही. यंदा पाऊस चांगला पडण्याचा अंदाज व्यक्त झाल्याने आता कधी एकदा पाऊस सुरु होतो व उष्णता संपुष्टात येऊन समाधान व्यक्त होते, याकडे जनतेचे डोळे लागले आहेत.

0 Response to "येरे येरे पावसा..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel