-->
घनदाट मुंबई

घनदाट मुंबई

शुक्रवार दि. 26 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
घनदाट मुंबई
घनदाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये मुंबई जगात दुसर्‍या स्थानावर असून, बांगलादेशातील ढाका शहर पहिल्या स्थानावर आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने जगातील दहा घनदाट लोकवस्तीच्या शहरांची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये भारतातील मुंबई आणि राजस्थानतील कोटा या दोन शहरांचा समावेश आहे. ढाक्यामध्ये प्रतिचौरस किलोमीटरवर सरासरी 44,500 नागरीक वास्तव्य करतात तर, मुंबईत प्रतिचौरस किलोमीटरवर सरासरी 31,700 लोक राहतात. राजस्थानातील कोटा शहरही लोकसंख्या वाढीमध्ये पाठी नाही. उद्योगनगरी, स्पर्धापरीक्षांची तयारी करुन घेण्यासाठी ओळखले जाणारे कोटा शहर घनदाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये सातव्या स्थानावर आहे. कोटामध्ये प्रतिचौरस किलोमीटरवर सरासरी 12,100 लोक वास्तव्य करतात. या यादीत मेडीलीन तिसर्‍या, मनिला चौथ्या, कासाब्लानका पाचव्या, लागोस सहाव्या, अबुजा आठव्या, सिंगापूर नवव्या आणि जकार्ता दहाव्या स्थानावर आहे. जगातील घनदाट लोकवस्तीची सहा शहरे आशिया खंडात, तीन आफ्रिका खंडात आणि एक दक्षिण अमेरिकेत आहे. कोटा हे शहर या यादीत आल्याने अनेकांना आश्‍चर्य वाटले असेल. मात्र त्यासाठी काही भौगोलिक व आर्थिक कारणेे आहेत. चंबळ नदीमुळे पाण्याची उपलब्धता आणि विनाखंड वीज पुरवठा यामुळे नागरीक मोठया संख्येने कोटामध्ये स्थायिक होत आहेत. कोटा शहराला जंगलानी वेढलेले आहे. त्यामुळे निवासी बांधकामासाठी मर्यादीत जागा उपलब्ध आहे. त्यामुळे दाटीवाटीने राहणार्‍या लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करुन घेण्यासाठी अनेक कोचिंग क्लासेस असल्याने विद्यार्थीही त्यांच्या पालकासह इथे राहतात. शेतकरी वर्गही नोकरीसाठी कोटामध्ये स्थलांतरीत होतोय त्यामुळे शहरात दाटावाटी वाढत चालली आहे. मुंबई घनदाट वस्ती असण्याची कारणे मात्र वेगळी आहेत. मुंबई हे सात बेटांचे मिळून तयार झालेले आहे. त्यामुळे खुद्द मुंबईच्या विस्तारावर अनेकदा मर्यादा येतात. मुंबई हे त्यामुळे उभी वाढत गेली. मात्र त्याचा आडवा विस्तार झाला व अनेक उपनगरे स्थापन झाली. एकीकडे कल्याण, पनवेल, विरारपर्यंत मुंबई विस्तारली गेली. अर्थात खुद्द मुंबईत विस्तार करण्यास मर्यादीत जागा उपलब्ध आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून गणली गेलेली धारावीची वस्ती देखील याच मुंबईत येते. या धारावी मध्ये कदाचित प्रतिचौरस फूट वस्ती ही सर्वात जास्त असेल. मुंबईची ही वस्ती वाढण्याचे कारण म्हणजे मुंबईत आलेल्या प्रत्येकाला येथे रोजगार मिळतो. त्यामुळे केवळ राज्याच्या कानाकोपर्‍यातूनच नव्हे तर देशाच्या अनेक भागातून लोक मुंबईत येतात. इथे प्रत्येकाला रोजगार मिलण्याची संधी असल्यमुळे मुंबई या निर्वासितांना आपल्यात समावून घेऊ लागली. यातूनच मुंबई घनदाट झाली. परंतु या घनदाट वस्तीचे नियोजन करण्यात आजवरची सर्व राज्य सरकारे अपयशी ठरली आहेत. पाणी, स्वच्छतागृहे, सांडपाणीचा निचरा यासाठी मुंबईत नियोजनच झालेले नाही. ज्या प्रमाणात वस्ती वाढत जाते तशा नागरी सुविधा पुरविण्याबाबत नियोजन मुंबईसारख्या महानगरात झालेले नाही, ही दुदैवी बाब आहे. त्यामुळे मुंबई ही घनदाट होऊनही गचाळही आहे, हे वास्तव विसरता येणार नाही.  

0 Response to "घनदाट मुंबई"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel