-->
राष्ट्रप्रेमी मल्ल्या!

राष्ट्रप्रेमी मल्ल्या!

गुरुवार दि. 8 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
राष्ट्रप्रेमी मल्ल्या!
भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून पसार झालेला विजय माल्ल्या इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारत विरुध्द पाकिस्तान सामन्यात (खरे तर युध्दात) भारतीय संघाला तो ज्याप्रकारे चिअर करीत होता ते पाहून कोणत्याही राष्ट्रप्रेमी भारतीयाचे मन भरुन येईल. मल्याने अशा प्रकारे छप्पन इंचाची छाती असलेल्यांना थेट आव्हान देत आपली भारत निष्ठा भारतीय संघाच्या चरणी अपर्ण केली. सध्या आपली भारतनिष्ठा ही तुम्ही काय खाता, कोणत्या धर्माचे आहात, भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाला पाठिंबा देता किंवा नाही, यावर मोजली जात आहे. अशा वेळी मल्ल्याने ही संधी साधत आपली भारत निष्ठा खुल्या मैदानात दाखविल्याबद्दल त्याचे आभार मानलेच पाहिजेत. नाही तरी मल्ल्याने बुडविलेले नऊ हजार कोटी रुपये ही रक्कम देशाच्या अर्थकारणाची व्याप्ती पाहता नगण्यच आहे. मल्ल्या बिचारा कफल्लक झाला, त्याची विमान कंपनी बुडाली तो आता पैसे आणणार तरी कुठून हे जनतेने व सरकारने समजून घेतले पाहिजे. त्याने बुडविलेल्या पैशांपेक्षा त्याने पाकिस्तानी संघाला विरोध करीत भारतीय संघातील खेळाडूंना चिअर करणे ही महत्वाची बाब आहे. आपला सध्याचा सर्वात जास्त मोठा शत्रू हा पाकिस्तान आहे, त्याला जो विरोध करेल, मग तो पाकिस्तानी संघालाही विरोध असला तरी बेहत्तर मात्र शत्रूचा शत्रू हा आपला मित्रच असला पाहिजे, हे सूत्र विसरता कामा नये. बरे ज्यावेळी मल्ल्याकडे भरपूर पैसे होते त्यावेळी त्याने विमान कंपन्यांपासून ते खेळाडूंच्या प्रमोशनसाठी विविध कंपन्या काढून त्यावर हजारो कोटी खर्च करुन आपल्या देशाच्या तिजोरीत भर घालत अर्थव्यवस्थेला चालना दिलीच होती ना? त्यावेळी बिचारा मल्ल्या देशाच्या तिजोरीत कर भरीतच होता ना? पण आता त्याचे ग्रह फिरले आहेत. आता हे सरकार त्याला मुसक्या आवळून जेलमध्ये सडत ठेवणार होते. मात्र त्यामुळे का पैसे थोडेच येणार होते. फार तर काय त्यातून नरेंद्रभाईंची छत्तीस इंचाची छाती अजून मोठी झाली असती. पण बुडालेले पैसे थोडेच येणार होते? त्यापेक्षा विजयभाईंनी आपला मुक्काम लंडनमध्ये हलविला. बरे तेथे जाताना पोलिसांच्या रडारवर असूनही त्याला मुक्तव्दार दिले गेले. यात चूक कोणाची? मल्ल्याची की सरकारची? त्या बिचार्‍या मल्ल्याला वाटले आपल्याला जाताना कोणी विचारतही नाही, मग बिनधास्त जावे. आणि मग दोन दिवसांनी सरकारला जाग आली. हाच जर मल्ल्या कॉग्रेसच्या राजवटीत पळाला असता तर भाजपावाल्यांनी किती थयथयाट केला असता याचा विचारच न केलेला बरा. मल्ल्या लंडनमध्ये पोहोचल्यावर त्याच्याविरुध्द भारतात अटक वॉरंट काय, न्यायालयात खटला काय, लंडनच्या सरकारकडे तक्रार काय आणि तेथील सरकारने अटक करण्याचे केलेले नाटक काय हे सर्व सुरु झाले. पण मल्ल्या काही हाती लागत नाही. मल्ल्या लंडनमध्ये गेला तरी त्याचे राष्ट्रप्रेम काही संपलेले नाही, हे त्याने खुले आम दाखवूनच दिले आहेच. आता म्हणे इग्लंडमध्ये तेथील हिंदूंना संघटीत करुन त्यांना रामरक्षा म्हणवून घेण्याचे सामाजिक काम मल्ल्या हाती घेणार असल्याची अफवा आहे. यातून त्याला आपली राष्ट्रभक्ती आधिक जोमाने दाखविता येणार आहे. मल्ल्यांच्या राष्ट्रभक्तीला आमचा सलाम!

0 Response to "राष्ट्रप्रेमी मल्ल्या!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel