-->
ग्राहक हाच राजा!

ग्राहक हाच राजा!

शनिवार दि. 06 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
ग्राहक हाच राजा!
भारतातील दूरसंचार ग्राहकांची संख्या फेब्रुवारीत 1.17 टक्क्यांनी वाढून 1.18 अब्जांचा आकडा पार करून गेली आहे. लँडलाइन आणि मोबाइल अशा दोन्ही ग्राहकांचा त्यात समावेश आहे अशी माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ने प्रसिध्द केली आहे. फेब्रुवारीत 13.75 दशलक्ष नवे ग्राहक दूरसंचार कंपन्यांना मिळाले. अर्थातच यत मोबाईलचाच प्रसार जास्त आहे. एके काळी लोकप्रिय असलेल्या लँडलाइन फोनची मागणी मात्र आता प्रचंड प्रमाणात घटली आहे. लँडलाईन फोन आता काही काळाने इतिहास जमा होतील असेच दिसते. स्वस्त मोबाइल हँडसेट, कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे मोफत सेवा आणि स्वस्त दर यांचे पेव फुटल्याचा फटका लँडलाइनला बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नव्याने आलेल्या मुकश अंबांनी यांचाय रिलायन्सच्या जिओ, तसेच भारती एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्या दररोज आकर्षक ऑफर्स ग्राहकांना देत आहेत. जानेवारी 2017 च्या अखेरीस 1,174.80 दशलक्ष दूरसंचार ग्राहक देशात होते, तर आता फेब्रुवारी 2017 च्या अखेरीस हा आकडा 1,188.5 दशलक्षांवर गेला. ग्राहकसंख्येत 1.17 टक्क्यांची वाढ झाल्याचे ही आकडेवारी दर्शविते. शहरी भागातील जोडण्या फेब्रुवारीअखेरी 1.6 टक्के वाढीसह 692.15 दशलक्षांवर गेल्या आहेत. ग्रामीण भागातील ग्राहकसंख्या तुलनेने कमी 0.56 टक्क्याने वाढून 496.39 दशलक्षांवर गेली. भारतीय दूरसंचार बाजार जगात चीनच्या खालोखाल दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारतीय दूरसंचार कंपन्यांचा पारंपरिक तंत्रज्ञानाच्या सेवेद्वारे मिळणारा महसूल 2026 पर्यंत चार लाख कोटी रुपयांवर जाईल. अर्थव्यवस्था आणि लोकसंख्येतील वाढीचा लाभ कंपन्यांना मिळूनही व्यवसायवृद्धी होईल. सध्या तर आपल्याकडे फोर जी आलेले आहेच, त्यापाठोपाठ फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कंपन्यांच्या महसूलात आणखी 20 टक्क्यांनी वाढ होईल. या उद्योगात मरणाची स्पर्धा सुरु आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता मोबाईल फो जी मध्ये उतरल्यानंतर आता मोबाईलचे उत्पादन करण्याच्या क्षेत्रात उतरणार आहे. अवघ्या पंधराशे रूपयात फोर जी फोन भारतात आणण्याची तयारी रिलायन्स करीत आहे. यासाठी त्यांनी चीनी कंपनीशी सहकार्य करार केला आहे. स्वस्त फोर जी फोननंतर भारतातील मोबाईल क्षेत्रातील स्पर्धा आणखी तीव्र होईल. सध्या मायक्रोमॅक्स भारतात स्वस्त फोर जी फोन बनवित आहे. मायक्रोमॅक्सच्या  आगामी फोनची किमत 1900 रूपये असेल. त्याहीपेक्षा चारशे रूपयांनी स्वस्त फोन रिलायन्स बाजारात आणणार आहे. रिलायन्स जीओचा प्रमुख व्यवसाय डेटा आणि बॅन्डविड्थचा आहे. मात्र, स्वस्त फोर जी फोनमुळे आणखी ग्राहक रिलायन्स जीओकडे आकर्षित होतील, असा कंपनीला विश्‍वास आहे. हा स्वस्त फोन प्रामुख्याने निमशहरी आणि ग्रामीण ग्राहकांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे. रिलायन्सने ज्यावेळी आपला पहिला मोबाईल प्लॅन आणला होता त्यावेळी त्यांची घोषणा करलो दुनिया मुठ्ठी मे अशी होती. त्यावेळी रिलायन्सच्या आगमनामुळे कॉल्सच्या दरात झपाट्याने घसरण झाली होती. ही कंपनी अनिक अंबांनींच्या ताब्यात गेली. तर आता मुकेश अंबानींच्या रिलायन्सनेही या उद्योगात प्रवेश करताच अनेक कंपन्यांच्या झोपा उडविल्या आहेत. याला तोंड देण्यासाठी प्रत्येक मोबाईल कंपनी आपले दर घसरवीत आहे. त्याशिवाय त्यांच्यापुडे काहीच पर्याय नाही. मुकेश अंबांनींच्या स्पर्धेत त्यांचे भाऊ अनिल अंबानी उतरले असून त्यांच्या मालकीच्या रिलायन्सने ग्राहकांना भुलविण्यासाठी आकर्षक प्लॅन आखला आहे. या प्लॅननुसार, 148 रुपयांचं पहिल्यांदा रिचार्ज करणार्‍या ग्राहकाला 70 दिवसांच्या वैधतेसह दररोज एक जीबी डेटा मिळणार आहे. मात्र या प्लॅन अंतर्गत कोणत्याही कॉलिंगची सुविधा मोफत मिळणार नाही. नव्या ग्राहकांसाठी कॉलिंगचा रेट 25 पैसे प्रतिमिनिट असेल. एकूणच सध्या कॉलिंगचे दर व डेटाचा दर झपाट्याने उतरत आहे. याला मुकेश अंबांनींच्या रिलायन्सच्या या उद्योगातील प्रवेश याला कारणीभूत आहे. अर्तातच याचा सर्वात जास्त फायदा ग्राहकांना होणार आहे. मात्र त्यात कोणत्याही एका कंपनीची मक्तेदारी होणे भविष्याचा विचार करता धोकादायक ठरणारा आहे. यासाठी टेलिकॉम उद्योगात किमान सात कंपन्या असल्या तर त्यांच्याच कायम स्वरुपी स्पर्धा राहू शकते. यातून ग्राहकांचा फायदा होईल. जर काळाच्या ओघात या उद्योगात कंपन्यांचे विलीनीकरण झाले व मोजक्याच दोन-तीन कंपन्या शिल्लक राहिल्या तर या कंपन्यांच्या हातात देशातील टेलिकॉम उद्योगाची सर्व सुत्रे जातील. यामुळे घसरलेले हे दर पुन्हा वाढू लागतील. यासाठी टेलिकॉम अथॉरिटीने जागरुक राहून आपले काम करण्याची आवश्यकता आहे. गेल्या दोन दशकात टेलिकॉम उद्योगात झपाट्याने बदल झाले. एकेकाळी सरकारी खात्याची मक्तेदारी असताना लोकांना घरातील फोनसाठी पाच-सात वर्षे वाट बघावी लागत होती. मात्र त्यानंतर हे क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले केल्यावर सर्व चित्र पालटले. ग्राहकांना मोबाईल उपलब्ध झाल्यावर सुरुवातीच्या काळात ते सर्वसामान्यांना परवडणारे नव्हते. कारण त्यावेळी प्रति कॉलचा दर तब्बल 20 रुपये होता. मात्र त्यानंतर या दरांची घसरण होणे गरजेचे होते. त्याशिवाय या कंपन्या वाढू शकत नव्हत्या. त्यानुसार कॉल्सचे दर घसरले. आम आदमीच्या हातात मोबाईल आले. यानंतर केवळ मोबाईल नव्हे तर त्यात इंटरनेट असण्याची गरज ही महत्वाची ठरु लागली. त्यामुळे तर जग प्रत्येकाच्या हातात आहे. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यातील गोष्ट मोबाईलचे एक बटन दाबून आपण मिळवू शकतो. त्यामुळे भविष्यात मोबाईल हाच आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होणार आहे.
--------------------------------------------------

0 Response to "ग्राहक हाच राजा!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel