-->
पाकला चपराक

पाकला चपराक

शनिवार दि. 13 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
पाकला चपराक
भारतीय उद्योजक कुलभूषण जाधव यांच्या पाकिस्तानातील फाशीला आन्तरराष्ट्रीय न्यायलयाने स्थगिती देल्याने एक जबरदस्त चपराक पाकला बसली आहे.
जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे दाद मागण्याचा निर्णय भारताने घेतला होता. जाधव हे भारतीय नागरिक आहेत. त्यांना पकडून त्यांच्यावर परस्पर खटला चालविण्याचा प्रकार व त्यांना भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांना भेटू न देणे किंवा भारताला त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्कच उपलब्ध होऊ न देण्याचा प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय व मुख्यत: व्हिएन्ना संकेतांचा भंग होता. याबाबत भारताने 8 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यावर तत्काळ सुनावणी होऊन जाधव यांची फाशी रोखण्यात आली. जाधव यांच्याशी संपर्क साधण्याची परवानगी मिळावी यासाठी भारताकडून केल्या गेलेल्या सोळा अर्जाच्या प्रती सादर करण्यात आल्या. त्याचप्रमाणे जाधव यांच्या आई व अन्य कुटुंबीयांनी पाकिस्तान सरकारकडे व्हिसा मागण्यासाठी केलेले अर्ज, आईचे फाशी न देण्याबाबतचे आवाहन, सुषमा स्वराज यांनी जाधव यांच्या आईला व्हिसा द्यावा यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताझ अझीझ यांना लिहिलेले पत्र, हे सर्व दस्तावेज भारताने सादर केले होते. या सर्व दस्तावेजांची पूर्ण शहानिशा करूनच जाधव यांची फाशीची शिक्षा रोखली गेली आहे. भारताच्या आन्तरराष्ट्रीय धोरणाचा हा एक मोठा विजय म्हटला पाहिजे. परंतु पाकचे लष्कर व तेथील माध्यमे ही भारताविरुध्द गरळ ओकत आहेत. जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतर दुसर्‍या दिवशी पाकमधील एकाही प्रमुख दैनिकात याबाबतचे वृत्त प्रकाशित झाले नाही. तर इलेक्ट्रॉनिक मीडियानेही या बातमीला एकदम थंडा प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने असा कोणताही निकाल दिला नसून, भारताने पसरविलेली ही अफवा असल्याचे पाक मीडियाचे मत व्यक्त केले आहे. अर्थात पाकच्या मिडियाचा हा एक मोठा गौष्यस्फोटच आहे. किंवा आता जागतिक पातळीवर जाधव प्रकरणी उलटे फासे पडू लागल्याने तेथील सरकारधार्जिणी वृत्तपत्रे एकदम थंड पडली आहेत. जीओ टीव्हीच्या दाव्यानुसार तर, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कायदे पाकिस्तानला लागू नाहीत किंवा पाकिस्तान त्यांच्या न्यायकक्षेत येत नाही. ते केवळ दोन्ही पक्षांच्या संमतीने एखाद्या घटनेची दखल घेऊ शकतात. डॉन या वृत्तपत्राने स्थगितीच्या आदेशाची बातमीच प्रसिद्ध केली नाही. दी एक्स्प्रेस ट्रिब्यूननेही स्थगितीचे वृत्त दिलेले नाही, तर न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास केल्यानंतरच आम्ही प्रतिक्रिया देणार असल्याचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अझिज यांनी म्हटल्याने पाकचे थोबाड बंद झाल्याचे दिसते. जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्याने पाकिस्तानला जबर धक्का बसला आहे. परंतु हे लष्कर मानावयास तयार नाही. मात्र आन्तरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश मानले नाहीत तर त्याचे देशावर किती गंभीर परिणाम होऊ शकतात त्याची पाक लष्कराला कल्पना नाही. हुकूमशाहीला लाज आणेल अशा पद्धतीने पाकच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा सुनावताना आंतरराष्ट्रीय कायदाही धाब्यावर बसविण्यात आला होता. आता त्यांना मात्र चांगलीच चपराक बसली आहे.
-----------------------------------------------

0 Response to "पाकला चपराक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel