-->
नयनाला अखेर न्याय!

नयनाला अखेर न्याय!

गुरुवार दि. 11 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
नयनाला अखेर न्याय!
निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी जाहीर झाली. मात्र त्या फाशीची अंमलबजावणी कधी होईल हे आत्ताच काही सांगता येत नाही. निदान सध्या तरी तिच्या पालकांना आपल्या मुलीवर अत्याचार केलेल्यांना देहांताची शिक्षा झाल्याने न्याय मिळाल्याची भावना वाटणे स्वाभाविक आहे. त्यांच्या तीव्र भावना आपण समजू शकतो. मात्र या खुन्यांना जोपर्यंत फासावर लटकवले जात नाही, तोपर्यंत निर्भयाला न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही. आता संगणक अभियंता असलेल्या पुण्यातील नयना पुजारी हिच्यावर बलात्कार करुन तिचा खून करणार्‍या तिघा आरोपींना फाशी सुनाविण्यात आली आहे. मात्र यातील माफीचा साक्षीदार सहिसलामत सुटला आहे. खरे तर त्याचाही सहभाग यात होताच असे असताना तो केवळ माफीचा साक्षिदार म्हणून त्याची सुटका करणे योग्य ठरणार नाही. ऑक्टबर 2009 मध्ये घडलेल्या या घटनेमुळे केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात खळभळ माजली होती. कारण आय.टी.चे प्रमुख केंद्र असलेले पुणे हे अत्यंत सुरक्षित असल्याची सर्वांची भावना होती. मात्र पुणे असो किंवा दिल्ली आज देशातील कोणतेही शहर सुरक्षित राहिलेले नाही. नयनाच्या आरोपिंना फाशी झाल्याने तिच्या नातेवाईकांना न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे. आपल्याकडे नयनाचा खटला चालवून आरोपिंना शिक्षा जाहीर करायला तब्बल आठ वर्षे लागली आहे. एखाद्या मोठ्या गुन्हातील आरोपीला शिक्षा ठोठाविण्यासाठी हा घेतलेला फार मोठा कालावधी आहे. त्यामानाने निर्भयाच्या आरोपींना झपाट्याने शिक्षा सुनावण्यात आली होती. नयनाच्या आरोपींना आता वरच्या नायालयाचे दरवाजे खुले होतील. त्यानंतर तेथे पुन्हा खटला चालेल व पुन्हा निकाल लागायला अजून काही वर्षे किंवा आणकी दहा वर्षेही लागू शकतील. त्यानंतर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावमी. त्यापूर्वी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज. या सर्व प्रक्रियेनंतर फाशीची अंमलबजावणी. एकूणच पाहता आपल्याकडील न्यायदानाचे काम हे अतिशय धीमेगतीने होते, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. आपल्याकडे देशात महिलांवर अनेक अत्याचार होतात. मात्र यातील जेमतेम दहा टक्केच बलात्कार हे उघड होत असतात. कारण महिला अजूनही आपल्यावर अत्याचार झाला तर पुढे येऊन सांगण्यास कचरतात. कारण आपल्याला समाजात पुढे चांगले स्थान मिळणार नाही अशी त्यांना भीती असते. परंतु आता अनेक तरुण अत्याचाराचा सामना करण्यास पुढे येत आहेत ही बाब स्वागतार्ह म्हटली पाहिजे. सामूहिक बलात्कार, नृशंस हत्या अशा प्रकारांत तपासाला गती मिळायला हवी. खटला नुसताच फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यापेक्षा, कारवाई फास्ट ट्रॅकवर व्हायला हवी. त्यासाठी अशा कोर्टांची क्षमता वाढवायला हवी. तरच पीडितांना खर्‍या अर्थाने दिलासा मिळू शकेल. महिलांच्या अत्याचारावरील खटल्यांसाठी विशेष न्यायालये स्थापन करुन त्याचे निकाल कसे लवकर लागतील याचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी पुरेशे न्यायाधीश व वकिलांची फौज उभी केली पाहिजे. बलात्कार पीडितेने  बचाव पक्षांच्या वकिलांना तोंड देणे हे फारच अवघढ काम असते. वकिल आपल्या गुन्हेगार हशिलाला वाचविण्यासाठी कोणथ्याही थराला जाऊन प्रश्‍न विचारतात व त्यात मानहानी होते ती त्या अत्याचारीत महिलेची. एक तर ती मनाने खचलेली असते व त्यात तिच्यावर असे आघात झाले तर आणखीनच मनाने खचते. म्हणूनच बर्‍याचदा अशा प्रकारांत न्याय मागितलाच जात नाही. अनेकदा आरोपीला सहज जामीन मिळाल्याने तो तक्रारकर्त्यांना धमकावण्याची शक्यता वाढते. भयापोटी तक्रार मागे घेतली जाते. अपराध्यांना मोकळीक मिळते आणि गुन्हे घडत राहतात. निर्भया आणि नयनाच्या निमित्ताने न्याय व्यवस्थेतील या व्यंगावर चर्चा व्हायला हवी. शिवाय अशा खटल्यांतील आरोपींना अल्पवयीन किंवा माफीचे साक्षीदार म्हणून मिळणारी सूट थांबवायला हवी. अल्पवयातच भयाण गुन्ह्यात सामील असणारा मनुष्य, पुढे जाऊन काय करू शकतो याचा अंदाज बांधायला हवा. नयना आणि निर्भयाच्या निमित्ताने स्त्रियांच्या सुरक्षिततेवर चर्चा होईलच, पण अशा अनेक सुप्त पैलुंवरही प्रकाश पडायला हवा. समाजाला संदेश देण्यासाठी एखादी फाशीची शिक्षा पुरणार नाही, तर त्यासाठी व्यवस्थेतील सद्य आणि संभाव्य चोरवाटा आधीच रोखायला हवा. सध्याचे दिवस आपल्यासाठी सामाजिक - सांस्कृतिक स्थित्यंतराचे आहेत. एकीकडे या गुन्ह्यातील आरोपींना कडक शासन जसे होणे आवश्यक आहे तसेच महिलांविषयक दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. आपल्या एकीकडे आपण महिलेला माता असे संबोधून तिला देवीचा दर्ज्य देतो खरे मात्र याच देवीला आपण हिन दर्ज्याची वागणूकही देतो. आपल्या समाजातील हे चित्र बदलले पाहिजे. महिला ही सबल आहे तिला कोणत्याही पुरुषाच्या बळाची गरज नसते. तिला आपण कमकूवत ठरवून तिच्या सबलतेवर आपण एक प्रकारचे प्रश्‍नचिन्ह उभे करीत असतो. आज स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र पादाकांत केलेले आहे. त्यामुळे महिला कोणत्याही क्षेत्रात काम करु शकतात, हे सिध्द झाले आहे. असा वेळी त्यांच्याकडील आर्थिक दुर्बलता किंवा तिच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन तिच्यावर अन्याय करणारे हे सर्वात मोठे गुन्हेगार आहेत. यासाठी माणसांची महिलांच्या संदर्भातील मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. आपल्यकडे पुरुष किंवा मुलगा होणे याला फार महत्व दिले जाते. त्यातून अनेकदा महिला गर्भाची हत्या होते. यामागे महिलांना कमी लेखण्याचा प्रकार आहे. यातूनच पुढे बलात्काराची मानसिकता विकसीत होते. हे जर थांबवायचे असेल तर गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याच्या बरोबरीने महिलांना सन्मान दिला पाहिजे. अर्थातच हे सर्व बालपणापासून मनावर बिंबवावे लागेल.
------------------------------------------------------

0 Response to "नयनाला अखेर न्याय!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel