-->
वाट कसली बघता?

वाट कसली बघता?

गुरुवार दि. 04 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
वाट कसली बघता?
भारत पाक संबंधातील तणाव आता पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. मध्यंंतरी भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यावर आपण आता वाघच मारला अशा थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी वावरत होते. आता यानंतर पाकची बोबडी वळेल व कुत्र्याची शेपटी सरळ होईल असा आव सरकारने आणला होता. मात्र सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकवर फारसा काही परिणाम झालेला नाही. ज्यावेळी भारताने हा त्यांच्या भूमित जाऊन हल्ला केला त्यावेळी यापूर्वीच्या सरकारप्रमाणे आम्ही बुळे नाहीत. आम्ही असा हल्ला करुन पाकला धडा शिकवला, असा सांगण्यात आले होते. खरे तर भारताने डॉ. मनमोहनसिंग पंतप्रदान असताना असा हल्ला केला होता, मात्र त्याचा गाजावाजा करुन त्याचा राजकिय लाभ उठविण्याचा विचार केला नव्हता. मात्र मोदी सरकारने या हल्याचा गाजावाजा करुन राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा लाभ क्षणभंगूरच ठरला आहे. कारण पाकने आपले डोके पुन्हा वर काढले आहे. पाकिस्तान नियंत्रणरेषेवरील पूँछ विभागात हुतात्मा झालेल्या दोन भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करून पाकिस्तानने आपल्या अमानुष आणि राक्षसी मानसिकतेचे दर्शन पुन्हा घडविले आहे. यात गंभीर बाब म्हणजे या पाशवी कृत्याबाबत पाकिस्तानी लष्कराने साळसूदपणे कानावर हात ठेवून कपटनीतीचा प्रत्यय दिला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाज्वा यांनी नियंत्रणरेषेची हाजिपीर विभागाची पाहणी केली होती. त्यानंतरच्या अवघ्या 24 तासांत ही घटना घडली. खरे तर ही घटना पाकने मुद्दाम घडवून आणली आहे. त्याचवेळी तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप एर्दोगान सध्या भारत दौर्‍यावर आले होते व त्यांनी काश्मीरमधील तणाव निवळावा, यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठाची मदत घेण्याबाबतचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्याच पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्याने संताप व्यक्त होत आहे. पाकचे हे कृत्य अमानवीय आहे व त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांची जागतिक पातळीवर निंदा होत आहे. एखाद्या युध्दातही अशा प्रकारे जवनांच्या मृतदेहाची विटंबना केली जात नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतीय हद्दीत सुमारे 250 मीटर आत घुसून पाक सैनिकांनी गस्तीवरील भारतीय जवानांवर हल्ला केला, तेव्हा पाकिस्तानी त्यांच्यावर हवाई छत्र होते. त्यामुळे एकुणातच पाकिस्तानचे मनसुबे उघड झाले आहेत. पाकिस्तानच्या या कृत्यामागे गेल्या काही महिन्यात काश्मिरात असलेली अशांतता कारणीभूत आहे. भारताने अतिरेकी येऊ नयेत यासाठी आपल्या सीमेवर पाहारा कडक केल्याने अनेक अतिरेकी घुसू शकत नाहीत. याचा परिणाम असा होतो की, अतिरेकी भारतात घुसविण्यासाठी पाकला नेमकी जागा मिळत नाही. त्यामुळे पाक लष्कर अस्वस्थ आहे. अशा स्थितीत भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे आम्ही काही घाबरणार नाही हे दाखविण्याची खुमखुमी पाक लष्करात आहे. यासाठीच हे अमानवीय कृत्य करण्यात आले. मात्र या घटनेनंतर भारतीय सरकार, संरक्षण मंत्रालय बॅकफूटवर गेल्यासारखे आहे. संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी या घटनेचा अमानवी अशा शब्दांत तीव्र निषेध करतानाच अशा घटना युद्धकाळातही घडत नाहीत; मग शांततेच्या काळातील तर गोष्टच वेगळी, अशी प्रतिक्रिया व्यक्त आहे. आता या घटनेनंतर आता भारत नेमकी कोणती पावले उचलणार, असा प्रश्‍न आहे. उभय् देशातील वाटाघाटी सध्या थांबल्याच आहेत. त्या पुन्हा लगेचच सुरु होण्याची अपेक्षा नाही. शांतता सध्या या सीमेवर नांदू शकत नाही असेच दिसते. मग आता एकदा सर्जिकल स्ट्राईक केल्यावर पुन्हा तेच करणार की, काही वेगळे हल्ले करणार? 56 इंची छातीचे नेतृत्व म्हणून सतत आत्मगौरव करू पाहणार्‍या भारतीय जनता पक्षाकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सध्या सोशल मिडियावर पाकिस्तानच्या 50 सैनिकांची मुंडकी आणा अशी भाषा केली जात आहे. याला भारत सरकार बळी पडेल असे दिसत नाही. कारण थेट युध्दालाच तोंड फुटू शकते. तयाकथीत भारतीय हेर कुलभूष जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेनंतर निर्माण झालेला तणाव आता वाढतच चालला आहे. जाधव यांच्या प्रश्‍नातही अद्याप काही तोडगा दृष्टीपथात नाही. असा वेळी कोंडी सरकार कशी फोडणार असा सवाल आहे. हा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे नेणे, असा एक मार्ग काही जण सुचवितात. पाकिस्तान तेथे काश्मीरप्रश्‍न उपस्थित करू शकत असल्यामुळे, मोदी सरकार तसे करण्याची शक्यता कमी आहे. काश्मीरप्रश्‍न हा आंतरराष्ट्रीय नव्हे, तर दोन देशांमधीलच विषय आहे ही आपली पहिल्यापासून भूमिका आहे. अगदी मोदी सरकारनेही यात सुदैवाने बदल केला नाही. पाकिस्तानशी राजनैतिक संबंध पूर्णपणे तोडून टाकले, पाकिस्तानी उच्चायुक्तांची मायदेशी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्यास चर्चेची दारे पूर्णपणे बंद होऊ शकतात. त्यामुळेच आता सरकार पाकिस्तानला नेमक्या कशा प्रकारे सडेतोड प्रत्युत्तर देते, ते बघावे लागणार आहे. एक मात्र खरे की एकीकडे समझोता एक्स्प्रेस सुरू ठेवायची आणि त्याच वेळी सरहद्दीवर अशा अमानुष कारवाया करत राहावयाच्या, या पाकनीतीला आता खंबीरपणे उत्तर देण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानातील लष्कर व तेथील लोकनियुक्त सरकार यात जमिन आसमानची तफावत आहे. लष्कराला युध्द पाहिजे आहे, मात्र आपण त्या चिथावणीला बळी पडणार का, असाही सवाल आहे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "वाट कसली बघता?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel