-->
अजूनही रुळावरुन घसरलेलीच...

अजूनही रुळावरुन घसरलेलीच...

बुधवार दि. 10 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
अजूनही रुळावरुन घसरलेलीच...
पर्यटन हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला जोरदार चालना मिळते, स्थानिकांना रोजगार मिळतो. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या केवळ पर्यटनावर अवलंबून आहेत. इतर देशांचे सोडा आपल्याकडे गोवा व केरळ या दोन राज्यांनी आपल्या प्रचाराव्दारे विदेशी पर्यटकांना भूरळ घातली आहे. रायगड जिल्हा हा देखील पर्यटनाचे एक महत्वाचे केंद्र ठरले आहे. एकीकडे समुद्रकिनारा तर दुसर्‍या बाजूला शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला. तर ब्रिटीशांनी विकसीत केलेले माथेरान हे पर्यटन स्थळ. मात्र याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्द आहे तसेच ते तेथील मिनी रेल्वे सेवेबद्दलही पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. माथेरानची ही मिनी रेल्वे अबालवृध्दांना भूरळ घालते. सर आदमजी पिरभाय यांनी या रेल्वेची स्थापना 1907 साली केली होती. 2007 मध्ये या रेल्वे सेवेने आपल्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण केली होती.
26 जुलै 2005 मध्ये झालेल्या प्रलयकारी पावसात रेल्वेचे रुळ वाहून गेल्याने ही रेल्वे सेवा खंडित झाली होती. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर ही रेल्वे सेवा सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले होते. त्यानंतर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या रेल्वे सेवेचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. आता मात्र प्रवाशांच्या सुरक्षेचे कारण पुढे करीत रेल्वे प्रशासनाने ही रेल्वे सेवा बंद केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या मुद्दयावरून घसरलेली माथेरानची मिनी रेल्वे सेवा वर्षभरानंतरही रुळावर आलेली नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतरही रेल्वे सेवा सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलेले नाही. त्यामुळे माथेरानच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. माथेरान येथून नेरळ येथे जात असलेल्या या रेल्वेचे प्रवासी डब्बे एकाच आठवडयात दोन वेळा नॅरोगेज रुळावरून खाली घसरले होते. त्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचे कारण पुढे करीत नेरळ-माथेरान ही घाटात धावणारी मिनी ट्रेन सेवा गेल्या 9 मे 2016 रोजी बंद करण्यात आली. या घटनेला आज तब्बल एक वर्ष लोटले आहे. मात्र माथेरानच्या अर्थकारणाचा कणा मानली जाणारी रेल्वे सेवा पुन्हा सुरू होऊ शकलेली नाही. रेल्वे सेवा अनिश्‍चित काळासाठी बंद केल्यानंतर याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले होते. पर्यटक, स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी, पर्यटन व्यावसायिकांनी रेल्वे सेवा सुरळीत व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यात हस्तक्षेप करीत माथेरानची रेल्वे सेवा बंद केली जाणार नाही अशी ग्वाही दिली होती. अत्याधुनिक प्रणालीसह मिनी ट्रेन सेवा पुन्हा सुरू केली जाईल. यात एअर ब्रेक प्रणाली, तीन नवीन इंजिने आणि दहा प्रवासी डब्यांचा समावेश असेल असे जाहीर करण्यात आले होते. नेरळ ते माथेरान रेल्वे सेवा सुरू होईपर्यंत अमन लॉज ते माथेरान शटल सेवा तातडीने सुरू केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मध्यंतरी यातील काही नवे डबेही माथेरानमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ही सेवा पुन्हा सुरु होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र वर्षभरानंतरही रेल्वे सेवा आणि शटल सेवा सुरू होऊ शकलेली नाही. माथेरानची मिनी रेल्वे ही माथेरानकरांसाठी जीवनवाहिनी आहे. दैनंदिन जीवन तसेच येथील अर्थकारण या रेल्वेवर अवलंबून आहे. येथे येणार्‍या पर्यटकांच्या आकर्षणाचे मिनी ट्रेन सेवा प्रमुख केंद्र आहे. दैनंदिन जीवनाश्यक वस्तूची, भाजीपाला यांच्या वाहतुकीचे किफायतशीर संसाधन म्हणून रेल्वे सेवेचे महत्त्व आहे. मात्र रेल्वे सेवा खंडित झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पर्यटकांची संख्या रोडावली आहे. जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला यांची वाहतूक हातगाडयांच्या साहाय्याने अथवा घोडयावर टाकून आणावी लागत आहे. त्यामुळे मालवाहतूक खर्चात वाढ झाली आहे.
रेल्वे सेवा लवकर सुरू व्हावी अशी मानसिकताच रेल्वे अधिकार्‍यांची नाही. त्यामुळे अतिशय संथ गतीने मार्ग दुरुस्तीची कामे सुरू आहेत. रेल्वेसाठी दाखल झालेले नवीन इंजिन आणि नवीन डबे वापराविना पडून आहेत. रेल्वे सेवा खंडित झाल्याने त्याचा येथील पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. गेल्या वर्षभरात ज्येष्ठ नागरिक आणि कौटुंबिक सहलीसाठी येणार्‍या पर्यटकांची संख्या घटली आहे. त्यामुळे रेल्वे सेवा आणि शटल सेवा तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. माथेरानची ही सेवा केवळ पर्यटकांना आकर्षित करते असे नव्हे तर हा आपल्याकडील एक एतिहासिक ठेवा आहे व तो नष्ट होण्याचा धोका आहे. या रेल्वेने अबालवृधादांना वेड लावले आहे. पर्यटकांसाठी ही रेल्वे एक महत्वाचे साधन ठरले आहे. कारण त्यामुळे येथे जाणे सहज शक्य होते. ज्येष्ठ नागरिकांना येथे येणे शक्य होते. एकीकडे आपण पर्यटनावर जास्त बर देऊन कोकणाचा विकास कऱण्याची भाषा करतो मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत माथेरानमधील टॅक्सीचालकांचे कसे खिसे भरता येतील याकडे लक्ष पुरविले जाते. माथेरानचे तथील रहिवासी व प्रथम नागरिक यांनी हा प्रश्‍न धसास लावला पाहिजे. कारण या रेल्वेवरच त्यांचे जीवन अवलंबून आहे. ही रेल्वे जर अशा प्रकारे टप्प्याने बंद करण्याचा कुणी घाट घालीत असेल तर तो डाव उधळला पाहिजे. ब्रिटीशांनी विकसीत केलेले हे थंड हवेचे ठिकाण भविष्यात शिल्लक राहाणार नाही, यासाठी रेल्वे तातडीने सुरु झाली पाहिजे.
-------------------------------------------------------------------

0 Response to "अजूनही रुळावरुन घसरलेलीच..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel