-->
सायबर हल्ल्याचा धोका

सायबर हल्ल्याचा धोका

बुधवार दि. 17 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
सायबर हल्ल्याचा धोका
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेतून चोरलेल्या सायबर शस्त्राच्या आधारे करण्यात आलेल्या सायबर हल्ल्याचा भारतासह जवळपास शंभर देशांना फटका बसला आहे. यामुळे मोठे नुकसान भोगावे लागले आहे. जगभरात असे अनके हॅकर्स कार्यरत असतात व त्यांचे अशा प्रकारचे लहान-मोठे हल्ले हे होतच असतात. परंतु नुकता झालेला हा हल्ला सर्वात मोठा समजला गेला आहे. रॅन्समवेअर मालवेअरद्वारे संगणकातील डेटा ब्लॉक केला गेला व तो अनलॉक करण्यासाठी विशिष्ट रकमेची खंडणीही मागितली गेली. हॅकर्सनी गेल्या वर्षी सायबर हल्ल्याद्वारे भारताच्या विविध बँकांतून कोट्यवधी रुपये लंपास केले होते. त्यामुळे सुमारे 32 लाख डेबिट कार्ड्स रद्द करण्याची वेळ या बँकांवर आली होती. आताच्या रॅन्समवेअरच्या धुमाकुळाचा फटका दक्षिण भारतातील दोन महत्त्वाच्या बँका तसेच दिल्लीतील तीन कंपन्या, एका कंपनीचे मुंबईतील मुख्यालय, आंध्र प्रदेशातील पोलिस ठाण्यांतील 100 संगणकांना बसला आहे. हे हॅकर्स कधी चीनमधून, तर कधी तिसर्‍या जगातील एखाद्या देशातूनही सक्रिय असतात. अमेरिकेला जगावर हुकूमत गाजवायची खुमखुमी असल्याने व तिच्यावर थेट हल्ला करण्याइतके सामर्थ्य खूप कमी देशांमध्ये असल्याने अशा अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने छुपे हल्ले केले जातात. सायबर युगात हॅकिंगचे परिणाम हे विशिष्ट देशापुरतेच मर्यादित राहत नाहीत तर ते अनेक देशांना भोगावे लागतात. हॅकर्ससाठी देश ही सीमा नसते तर त्यांची बाजारपेठ ही आन्तरराष्ट्रीय असते, त्यामुळे अनेक देशांना याचा फटका बसतो. भारत, अमेरिका आणि ब्रिटनसह सार्‍या जगाला वेठीस धरणार्‍या रॅनसमवेअर वॉनाक्राय चा प्रसार आणखी पसरवण्यापासून 22 वर्षीय युवक मार्कस हचिंस याने विशेष प्रयत्न केले. त्याने ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा केंद्रात सर्वप्रथम हा व्हायरस ओळखून जगभरात आणखी फैलाव होण्यापासून थांबवला. रॅनसमवेअरचा हल्ला पुन्हा होऊ नये यासाठी ब्रिटनचे सायबर गुप्तचर मुख्यालय जीसीएचक्यू त्याची मदत घेत आहे. म्हणजे ज्या प्रकारे हॅकर्स एखादा डाटा संपविण्यसाठी जसे कार्यरत असतात तसेच त्यांच्या विरोधात काम करणारेही अनेक लोक आहेत. ते अशा प्रकारचा सायबर हल्ला परतवून लावण्यासाठी कार्यरत असतात. अमेरिकेमध्ये गेल्या डिसेंबरात पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन (डीएनसी)चे हॅकिंग झाल्याने त्याचा फायदा रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाला होता. हे कृष्णकृत्य रशियाच्या हॅकर्सनी केले होते व त्याला पुतीन यांचा आशीर्वाद होता, अशी जगभर चर्चा होती. त्यामुळे संगणकावर आपले अवलंबित्व जसे वाढत जाईल तसे अशा प्रकारचे हल्ले वाढत जाणार आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. अर्थात त्यावर उपाय म्हणून संगणकीकरण थांबविले जाऊ शकत नाही. तर या हॅकर्सविरोधात मोहीम आखावी लागेल. आपल्या देशात अनेक भागात याचा फटका बसला आहे. प्रामुख्याने बँकिंग सेवा ढासळली आहे. रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना तत्काळ आपली एटीएम यंत्रणा अपडेट करण्याचे आदेश दिले. अपडेट पूर्ण होत नाही तोपर्यंत एटीएम सेवा सुरू न करण्याचे आदेश दिले आहेत. जगभरातील अनेक संगणकावर सायबर हल्ला करणार्‍या रॅन्समवेअर मालवेअरपासून बचाव करण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण होईल. मायक्रोसॉफ्ट विंडोजचे जुने व्हर्जन असलेल्या यंत्रणांमध्ये हा मालवेअर ई-मेलच्या माध्यमातून पसरतो. यामुळे अनेक यंत्रणांमधील डेटा लॉक होऊन कामकाज ठप्प झाले आहे. डेटा अनलॉक करण्यासाठी तीनशे डॉलरची खंडणीही डिजिटल करन्सीच्या स्वरूपात मागण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका संशोधकाने याबाबत माहिती कळताच याचे विश्‍लेषण करण्यास सुरवात केली. अमेरिकेतीलही काही संशोधक याबाबत विश्‍लेषण करत होते. त्या सर्वांनी चर्चा करताना ब्रिटनमधील मालवेअरटेकला याबाबतचा किल स्वीच म्हणजेच रोखण्याचा मार्ग अचानक सापडला. मालवेअरकडून वापरात असलेले डोमेन रजिस्टर केल्यास त्याचा प्रसार रोखता येतो, हे त्याच्या लक्षात आले. रजिस्टर नसलेल्याच डोमेनला मालवेअरकडून लक्ष्य केले जात असल्याने डोमेन रजिस्टर करणे हा रोखण्याचा मार्ग म्हणजेच किल स्वीच असल्याचे मालवेअरटेकने ट्विटरवर म्हटले आहे. या किल स्वीचमुळे मालवेअर रोखण्याचा मार्ग मिळाला असला, तरी आधीच ज्या यंत्रणांमध्ये मालवेअर आला आहे, त्यावर उपाय मिळालेला नाही. भारतातील सर्व एटीएम यंत्रे विंडोज एक्सपी ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. यामुळे अनेक एटीएम यंत्रांवर सायबर हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. मायक्रोसॉफ्टने काही वर्षांपुर्वीच विंडोज एक्सपीशी निगडीत सुविधा देणे बंद केले आहे. परंतु कंपनीने आता भारतासह इतर देशांमध्ये विंडोजसाठी अपडेट रिलीज केले आहे. 2015 मध्ये भारतात तीन लाखांच्या जवळपास सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती. भारतातील एकूण माहिती क्षेत्रातील सत्तर टक्क्यांहून अधिक उद्योग महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये असून त्याच राज्यांत सर्वाधिक सायबर गुन्हे नोंदले आहेत. सायबर हल्ल्याचा धोका आपल्या प्रत्येकाच्या संगणकापर्यंत आलेला आहे याचे भान राखून अद्ययावत तंत्रज्ञानदृष्ट्या दक्ष राहणे हाच प्रभावी तोडगा ठरणार आहे. अशा प्रकारचे सायबर हल्ले हे भविष्यात होणार आहेत, हे गृहित धरुन त्यासंबंधी खबरदारीचे उपाय योजले गेले पाहिजेत. आता सायबर सिक्युरिटी हा कळीचा प्रश्‍न असणार आहे.
-----------------------------------------------------

0 Response to "सायबर हल्ल्याचा धोका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel