-->
क्रांतीकारकाची व्दिशताब्दी

क्रांतीकारकाची व्दिशताब्दी

शुक्रवार दि. 05 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
क्रांतीकारकाची व्दिशताब्दी
जागतिक तत्ववेधता, महान क्रांतीकारक, समाजशास्त्रज्ञ व ज्यांच्या विचाराने एके काळी अर्धे जग प्रभावित होते त्या कार्ल मार्क्स यांच्या जन्माला आज 5 रोजी बरोबर दोनशे वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या दोनशे वर्षात जगात अनेक बदल झाले. परंतु कार्ल मार्क्स यांनी भांडवलशाहीबद्दल लिहून ठेवलेली अनेक भाष्ये आजही तंतोतंत लागू पडतात. आज त्यांच्या विचारांचा प्रभाव जगात कमी झाला असला तरीही मार्क्स यांच्या विचाराशिवाय कोणत्याही अन्य तत्वज्ञानाची साधी चर्चा करता येत नाही, हा त्यांचा मोठा विजयच म्हटला पाहिजे. मार्क्स यांचा जन्म जर्मनीतला असला तरीही त्यांच्या 64 वर्षाच्या आयुष्यातील बहुतांशी काळ हा इंग्लंडमध्येच गेला. त्यावेळी इंग्लडला औद्योगिकीकरणाची नुकतीच सुरुवात झाली होती. भांडवलशाहीचा जन्म त्यातून होण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. मात्र मार्क्स यांनी त्यावेळी भांडवलशाहीविषयी लिहिलेली टिपणे आजही लागू पडतात, हे त्यांच्या तत्वज्ञानाचा मोठेपणा आहे. आज भांडवलशाहीचे स्वरुप बदलले असले तरीही त्याचा गाभा कायम आहे. कामगारांची पिळवणूक करण्याची प्रक्रिया काही बदलेली नाही. उलट विविध गोंडस नावाखाली नवभांडवलशाही पिळवणूक करीत आली आहे. त्यामुळे मार्क्सचे विचार आजही प्रभावी ठरतात. मार्क्सने मांडलेली मनुष्यत्वाची संकल्पना, भौतिकवादी पध्दती व मानवाच्या इतिहासाचे आकलन, भांडवलशाहीचे स्वरुप, माणसाची संकल्पना याबाबत विस्तृत मांडणी केली आहे. मार्क्सने आपल्या 64 वर्षाच्या आयुष्यात 50 वर्षे अखंड वाचन केले व त्यातील 40 वर्षे लिखाण केले. अतिशय गरीबीत त्यांचे आयुष्य गेले. परंतु त्यांनी आपला अभ्यास कधीच सोडला नाही. भांडवलशाही उलथवून कामगारांची सत्ता आणण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, यावर मार्क्सने भाष्य केले आहे. भांडवलशाहीत प्रत्येक बाबतीत फक्त नफा पाहिला जातो. त्यातून मनुष्याचे परस्परांतील संबंध दुरावले जातात. माणसे बाजारातील क्रयवस्तुप्रमाणे वागू लागतात. यात केवळ काम करणारा कष्टकरीच नव्हे तर पैसे कमाविणारा मालकही भरडला जातो. सध्याच्या काळातील अनेक घटना, प्रामुख्याने केवळ पैसा डोळ्यापुढे ठेवून घडलेल्या पाहतातच मार्क्सने किती तंतोतंत लिहून ठेवले होते याची कल्पना येते. मार्क्सने आपल्या भांडवल या ग्रंथात भांडवली व्यवस्थेचे योग्य वर्णन केले आहे. भांडवलशाहीत जशी प्रगती होत जाईल तशी समाजातील विषमत वाढत जाईल. त्या प्रमाणात मागणी निर्माण करण्याची समस्या वाढत जाईल. मग त्यासाठी नवीन बाजारपेठांचा शोध घेण्याची प्रक्रिया हे देश करतील. मार्क्सचे हे मापन अतिशय योग्यच आहे. गेल्या तीन दशकात आपण मुक्त अर्थव्यवस्थेच्या वाटचाल करीत आहोत. मात्र आपल्याकडे श्रीमंत ज्या गतीने श्रीमंत झाले त्याहून जास्त गतीने गरीबी वाढत गेल्याचे चित्र दिसते. तसेच श्रीमंत असलेल्या अमेरिकेतही गेल्या आठ वर्षात मंदी आहे. लोकांची क्रयशक्ती संपली आहे, याचे नेमके विश्‍लेषण मार्क्सच्या विवेचनात आढळते. अशा प्रकारे भांडवलशाहीचे विश्‍लेषण करुन मार्क्स यांनी कामगारांची सत्ता स्थापन करण्याबाबत भाष्य आपल्या ग्रंथात केले आहे. मार्क्सच्या विचारंशी एकनिष्ठ राहून सोव्हिएत युनियनमध्ये कॉम्रेड लेलिनच्या नेतृत्वाखाली क्रांती झाली व कामगारवर्गाची सत्ता स्थापन झाली. मात्र तब्बल पाच दशकानंतर ही महासत्ता पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. दुसर्‍या महायुध्दानंतर भांडवलशाही जग व समाजसत्तावादी जग अशी जगाची वाटणी झाली. भांडवलशाहीचे नेतृत्व अमेरिकेकडे तर समाजसत्तावादी जगाचे नेतृत्व सोव्हिएत युनियनकडे म्हणजे आत्ताच्या रशियाकडे होते. परंतु सोव्हिएत युनियनच्या सत्ताधार्‍यांनी मार्क्सला पोथीतबध्द करुन कारभार केल्याने तेथे अनेक प्रश्‍न निर्माण झाले. सर्वावर सरकारी मालकी असल्याने लोकामध्ये सुस्ती आली. तसेच आपले जग व नागरिकांमध्ये पोलादी पडदा उभा करुन त्यांना बंदिस्त केले व त्यातून सोव्हिएत युनियनमध्ये अनेक प्रश्‍न निर्माण झाले. सोव्हिएत युनियन कोसळण्याचे हे वरवरचे विश्‍लेषण झाले, मात्र त्यातील काही ढोभळ बाबींचा यात समावेश होतो. चीनने मात्र आपल्याकडे लाल क्रांती करताना अनेकदा वेळोवेळी आपल्या कार्यपद्तीत व्यवहार्य बदल केले व त्यामुळे आज तेथील लाल क्रांती टिकली आहे. अनेकाच्या मते चीन आता लाल राहिलेला नाही, तो एक भांडवलीशाही देशच झाला आहे. ही वस्तुस्थिती मान्य केली तरीही चीनच्या व्यवहार्य भूमिकेमुळे त्यांचा सोव्हिएत युनियन झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. यातून मार्क्सचे विचार कालबाह्य झाले असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र मार्क्सचे विचार ज्यांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला त्या राज्यकर्त्यांच्या चुका झाल्या. त्यांनी मार्क्सचा विचार हा पोथीनिष्ट पध्दतीने अंमलात आणण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे सर्व गणित फिसकटले. 70च्या दशकात एकीकडे अमेरिका व दुसरीकडे सोव्हिएत युनियन यांच्यात जग विभागले गेले होते. त्यापुढील काळात तर शीतयुध्दाने एवढा पेट घेतला होता की, जग नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले होते. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यावर जगातील बहुतांशी समाजसत्ता देश पांगळे झाले व त्यांच्याकडील सत्ता ही कोसळत गेल्या. क्युबात फिडेल कॅस्ट्रोने मात्र आपला किल्ला शेवटपर्ंयत लढविला. अर्थात हा दोष कार्ल मार्क्स यांच्याकडे जात नाही तर त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन शासन करणार्‍या राज्यकर्त्यांकडे जातो. मार्क्स हा एक महान तत्ववेधता होता, त्याने केलेली मांडणी आजही लागू पडते, यात त्यांच्या विचाराचा विजय आहे. मार्क्सच्या निधनानंतर निघालेल्या अंतयात्रेत त्यांचे अत्यंत जवळचे केवळ अकरा साथीदार सहभागी झाले होते, परंतु याच मार्क्सने जगावर आपला प्रभाव गाजविला. शेवटी विचार महत्वाचा असतो हेच खरे.
---------------------------------------------------------------

0 Response to "क्रांतीकारकाची व्दिशताब्दी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel