-->
खेळाडूंचा मार्गदर्शक

खेळाडूंचा मार्गदर्शक

सोमवार दि. 15 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
खेळाडूंचा मार्गदर्शक 
खेळाडूंमध्ये जिंकण्यासाठीचा आत्मविश्‍वास निर्माण करणारे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये पदकांची लयलूट करणार्‍या अनेक नेमबाजांना मार्गदर्शन केलेले ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम यांचे नाशिकमध्ये व्याख्यान देत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने क्रीडाक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने अनेक खेळाडूंचे वैयक्तीक नुकसान झाले आहे. अनेक खेळाडूंना बाम यांचा मोठा मानसिक आधार होता व ते त्यांनी दिलेल्या आत्मविश्‍वासावर अनेक विजयश्री खेचून आणीत असत. खेळाडूंनी मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीला प्राधान्य द्यावे यासाठी क्रीडा क्षेत्रातून मानसोपचाराचा अभ्यास करून देशातील अनेक खेळाडूंना घडवण्यात बाम यांचे मोलाचे योगदान राहिले त्यांनी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, नेमबाज अंजली भागवत, रिशुसिंग, कविता राऊत, गगन नारंग यांसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंनाही मार्गदर्शन केले होतेे. क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेत राज्य सरकारने त्यांना जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित केले होते. मार्ग यशाचा, संधीचे सोने करणारी इच्छाशक्ती, विजयाचे मानसशास्त्र, मना सज्जना यांसारखी अनेक पुस्तके भीष्मराज बाम यांनी लिहिली. या पुस्तकांचा हिंदी, पंजाबी आणि तामिळ भाषेतही अनुवाद झाला. याचबरोबर मराठीतील अनेक वृत्तपत्रांमध्ये बाम यांनी स्तंभलेखनही केले. 1963 साली महाराष्ट्र पोलिस सेवेत पोलिस उपअधिक्षकपदी ते रुजू झाले. 18 वर्षांच्या सेवेनंतर त्यांची गृहमंत्रालयात महत्त्वाच्या पदावर नेमणूक झाली. त्यानंतर पुढे ते पोलिस महासंचालक म्हणून निवृत्त झाले. दक्षता या पोलिसांच्या मासिकाचे ते दोन वर्षे मुख्य संपादकही होते. खेळाडू कितीही प्रतिभाशाली असला तरी, मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी त्याच्यामध्ये एक मानसिक कणखरता लागते. हाच गुण भीष्मराज बाम यांनी खेळाडूंमध्ये विकसित केला. राहुल द्रविडचा समावेश आज यशस्वी खेळाडूंमध्ये होतो. पण हाच द्रविड 1999 साली चाचपडत असताना त्याने भीष्मराज बाम यांचे मार्गदर्शन घेतले होते. त्यानंतर द्रविडने कधी मागे वळून बघितले नाही.  कोणत्याही खेळातील यशाकरिता शारीरिक तंदुरुस्तीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. बारावी इयत्तेपर्यंत खेळ हा विषय सक्तीचा केला पाहिजे. सूर्यनमस्कार, योगासने आदी व्यायाम प्रकार अनिवार्य केले पाहिजेत, असे ते नेहमी सांगत. आपण केवळ क्रिकेटवर अधिकाधिक पैसा खर्च करतो. या खेळाला अपेक्षेपेक्षा जास्तच प्रसिद्धी दिली जाते. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी खेळ हे सर्वोत्तम माध्यम आहे हे लक्षात घेतले पाहिजे. क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी खेळाडू, पालक, संघटक, प्रशिक्षक, शासन, प्रसार माध्यमे अशा सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे त्यांचे मत होते व ते वेळोवेळी विविध व्यासपीठांवरुन बोलताना सांगित असत. खेळाडूंचा खराखुरा मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे.
-------------------------------------------------------

0 Response to "खेळाडूंचा मार्गदर्शक "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel