-->
पाकिस्तानची हिंम्मत!

पाकिस्तानची हिंम्मत!

बुधवार दि. 12 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
पाकिस्तानची हिंम्मत!
हेरगिरी आणि विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून वर्षभरापूर्वी बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावल्याने भारतात संतापाची लाट उसळली आहे. अर्थातच अशा प्रकारे संतापाची लाट येणे सहाजिकच आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर आता पाकिस्तानचे कंबरडे मोडले असे भारतास वाटत होते, परंतु तसे काही झालेले नाही असेच या कृतीवरुन दिसते. या घटनेनंतर भारताच्या वतीने पाकिस्तानातील पकडलेल्या 12 मच्छिमारांना सोडण्यात येणयाचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. गेल्याच महिन्यात पाकिस्तानने भारतातील सुमारे 400 हून जास्त पकडलेल्या मच्छिमारांना सोडले होते. पाकच्या या कृतीचे स्वागत केले जात असतानाच पुन्हा एकदा कुलभूषण जाधव यांच्यांवर खोटे आरोप करुन त्यांना फाशीची शिक्षा दिल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. यामुळे उभय देशातील शांतता प्रक्रियेला पुन्हा एकदा खीळ बसली आहे. जाधव हे मुंबईतील पवई भागात राहणारे असून, त्यांचा हेरगिरीशी काहीही संबंध नाही, असे भारताने तसेच कुलभूषण यांच्या कुटुंबीयांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी होते. ते भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंगफ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे मूळ रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12 मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सोमवारी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, कुलभूषण जाधववर पाकिस्तानच्या लष्करी कायद्यानुसार कोर्ट मार्शल चालविण्यात आले आणि त्यात दोषी ठरल्यामुळे फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमाल जावेद बाजवा यांनी या शिक्षेवर सोमवारी शिक्कामोर्तब केले, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. जाधव यांनी दंडाधिकार्‍यांपुढे आणि न्यायालयातही गुन्हे कबूल केल्याचा दावा करून या पत्रकात म्हटले की, बलुचिस्तान आणि कराचीमधील अशांतता काबूत आणण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांमध्ये अडथळे आणून तेथे आणखी अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी व हेरगिरी करण्यासाठी रॉने आपल्याला पाठविल्याचे जाधव यांनी शपथेवर कबूल केले. याआधी पाकिस्तान लष्कराने जाधव यांच्या या कथित कबुलीजबाबाचा व्हिडिओही जारी केला होता. मात्र यात बर्‍यात कात्र्या लावल्या असून मूळ व्हिडिओत बरेच बदल झाल्याचा दावा भारताने केला होता. भारताच्या दाव्यानुसार हे सर्वच बनावट आहे व पाकिस्तान सफशेल खोटे बोलत आहे. भारताने उभय देशातील एका करारानुसार, कोणत्याही देशाचा नागरिक पकडला गेल्यास 90 दिवसांपर्यंत संबंधित देशांच्या राजदुतांना तशी तक्रार तकरुन तो आपल्या देशाचा नागरिक असल्याचे सिध्द करावे लागते. मात्र जाधव यांच्या संदर्भात भारताने ही दाद मागितली नव्हती. खरे तर अन्य प्रकारे प्रयत्न करीत असताना राजदुतांच्या पातळीवरही एक प्रयत्न करण्याची गरज होती असे संरक्षण तज्ज्ञांना वाटते. पाकिस्तानने जाधव यांना इराकमध्ये पकडले व पाकिस्तानातील बलुचिस्तानात आणल्यावर अटक केल्याचे जाहीर केले असे सांगितले जाते. तसेच पाकने त्यांच्यावर लष्करी खटला चालविला. खरे तर त्यांच्यावर पाकने रितसर न्यायालयात खटला चालविला पाहिजे होता. तसेच जाधव यांना त्यांच्या बाजूने लढण्यासाठी वकिल देण्याची आवश्यकता होती. आपण कसाबने केलेले गुन्हे सर्वांसमोर असतानाही त्याला वकिल दिला होता. आता मात्र जाधवला पाकने वकिलही दिला नाही व थेट निकालच जाहीर केला. आन्तरराष्ट्रीय मानवी हक्क संघटना अ‍ॅम्नेस्टी इंटरनेॅशनलने यासंबंधी पाकवर टीका केली आहे. जाधव यांना भारतीय दुतावासाशी संपर्क साधण्यास परवानगी मागण्यासाठी भारताकडून 13 वेळा निरोप देण्यात आले होते. मात्र त्याकडे पाकने पूर्णपणेे दुर्लक्ष केले. कोणत्याही अरोपीस त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. मात्र ही सधी जाधव यांना देण्यात आली नाही. भारतानेही या संदर्भात जो आग्रह धरुन पाठपुरवठा केला पाहिजे होता तो देखील केलेला नाही. हा विषय संरक्षणाशी संबंधीत असल्याने यातील काही बाबी जाहीर करु शकत नाही असे परराष्ट्र खाते म्हणत असले तरीही त्यांचा दावा पोकळ ठरला आहे. आता तरी भारताने जाधव प्रकरणाती बाबी आन्तरराष्ट्रीय पातळीवर तातडीने मांडल्या पाहिजेत व जाधव यांना परत मायदेशी आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पाहिजेत. केंद्रातील सरकारला आपण पाकला धडा शिकविला असे सर्जिकल स्ट्राक नंतर वाटत होते. मात्र अशा प्रकारचे स्ट्राईक करण्यापेक्षाही चर्चेतून प्रश्‍न सोडविणे हा उत्तम उपाय असतो. यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात अमन की आशा च्या बॅनरखाली जे सेक्युलर लोक प्रयत्न करीत आहेत त्यांची भाजपाचे प्रवक्ते टर उडवित आहेत. केवळ युध्दाने प्रश्‍न सुटत नाहीत हे सत्ताधार्‍यांना आता तरी समजेल. यासंबंधी वाजपेयी यांनी चर्चा व धाक अशा दोन्ही पातळीवर कामे केली होती. आता हे सरकार चर्चेला वाटाण्याच्या अक्षता लावत आहे. असे केल्याने वातावरण आणखी चिघळू शकते, हे आता तरी समजून घ्यावे.
---------------------------------------------------

0 Response to "पाकिस्तानची हिंम्मत!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel