-->
राष्ट्रपती कोण?

राष्ट्रपती कोण?

रविवार दि. 23 एप्रिल 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
राष्ट्रपती कोण?
-------------------------------------------------------
एन्ट्रो- राष्ट्रपतीपदाची निवडणुक आता हळूहळू जशी जवळ येऊ लागली आहे तशी अनेक नावे चर्चेत येऊ लागली आहेत. सुरुवातीपासून लालकृष्ण अडवाणी यांचे नाव होतेच. त्यांच्यापाठोपाठ मोहन भागवतांचे नाव शिवसेनेने सुचविले. मात्र त्याही पलिकडे जाऊन सुमित्रा महाजन व उद्योगपती रतन टाटा हे देखील यातील डार्क हॉर्स आहेत. आता यातून नेमके कोण राष्ट्रपती होतात ते पहायचे...  
---------------------------------------------------------------
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे आता वेध लागू लागले आहेत. उत्तरप्रदेशातील निवडणूक जिंकल्यावर भाजपामध्ये समाधान व्यक्त होत आहे, त्यातील एक कारण म्हणजे आगामी काळातील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाचे पारडे वजनदार झाले आहे. असे असले तरी सत्ताधारी पक्ष हा कितीही मोठा असला तरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविताना त्यांना सर्वच आपल्या सहकारी पक्षातील नेत्यांना तसेच विरोधकांनाही विश्‍वासात घ्यावे लागते. ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न असतो. परंतु ती होत नाही. 90च्या दशकापर्यंत कॉग्रेस पक्ष हा केंद्रात व बहुतांशी राज्यात सत्तेत होता. त्यामुळे कॉग्रेसचे वर्चस्व होते. परंतु ते देखील विरोधकांना विश्‍वासात घेत असत. इंदिरा गांधींच्या वेळी मात्र राष्ट्रपदाची निवडणूक ही गाजली होती. आता भाजपाच्या राज्यात राष्ट्रपती कोण होणार असा सवाल आहे. एखाद्या सत्तारूढ पक्षाकडे आवश्यक बहुमत नसल्याच्या स्थितीत छोट्या पक्षांना विश्‍वासात घेणे अनिवार्यच होऊन जाते. या वेळीही अशीच स्थिती आहे. भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रपतिपदासाठी आवश्यक बहुमत नाही. त्यामुळे इतर मित्रपक्षांची मदत लागणारच आहे. भाजपाचा सर्वात जुना साथीदार असलेल्या शिवसेनेचे याबाबत काय मत आहे? राष्ट्रपतीपदासाठी त्यांनी तर चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवून एक गुगलीच टाकला होता. भाजपाने या गुगलीवर मौन पाळणेच पसंत केले. तर भागवतांनी याबाबतीत स्पष्टच केले की आपल्याला राष्ट्रपतीपदात काही रस नाही. नेहमीप्रमाणे भाजपावर कुरघोडी करण्याच्या शिवसेनेच्या प्रकृतीला साजेशीच ही सुचना होती. त्यामुळे शिवसेनेच्या यागुगलीवर कुणीच बाद झाले नाही. राष्ट्रपतिपदासाठी आवश्यक मतांचे गणित पाहिले तर शिवसेनेची ताकद आपल्या ध्यानात येऊ शकेल. उत्तर प्रदेशात दणदणीत बहुमत मिळाल्यावरही भाजपला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी किमान 20 हजार मतांची आवश्यकता आहे. त्यामुळेच मोदी यांनी वेळीच शिवसेनेशी संपर्क साधला. उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. आता आगामी राष्ट्रपती मोदी ठरवतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणजेच हा उमेदवार राष्ट्रीय स्वंयंसेवक संघच ठरविणार आहे. भाजपापुढे 20 हजार मते गोळा करणे हे एक आव्हानच होते. छोट्या छोट्या पक्षांकडून ही पूर्तता शक्य नव्हती. शिवसेना या एकाच पक्षाकडे मतांची सुमारे 25 हजार ताकद आहे. सेना सोबत असेल तर भाजपच्या उमेदवाराला काहीच धोका नाही, हे स्पष्ट आहे. शिवसेनेकडे 21 खासदार आणि 63 आमदार असून त्यांच्या मतांचे मूल्य 25 हजार 800 इतके आहे. हे संख्याबळ शिवसेनेने भाजप उमेदवाराच्या मागे उभे केल्यास भाजपचा उमेदवार निवडून येण्यात काहीच अडचण नाही. राष्ट्रपतीपदासाठी भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे नाव चर्चेत होते. मोदींनी एकहाती सत्ता खेचून आणल्यावर अडवाणी हे अडगळीत फेकले गेले होते. त्यामुळे आता मोदी त्यांच्यावर उपकार म्हणून का होईना राष्ट्रपदीपदासाठी त्यांचे नाव जाहीर करतील अस वाटत होते. कारण त्याव्दारे आजवर सिंधी समाजाला कधी मिळाले नव्हते एवढे मानाचे पद मिळेल, असाही अनेकांचा होरा होता. मात्र तो ही अंदाज खोटाच ठरला. अचानक अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्या विरोधात असलेल्या बाबरी प्रकरणीच्या खटल्याने डोके वर काढले. यात अडवाणी यांचा पत्ता साफ झाल्याचे स्पष्ट झाले व राष्ट्रपदी जाण्याचे दरवाजेही बंद झाले. बिच्चारे अडवाणी. पुढच्या वेळी त्यांना खासदारकीही मिळणे मुश्किल वाटत आहे. अडवाणी यांचे जर नाव असते तर शिवसेनेनेही त्यांना पाठिंबा दिला असता. मात्र अडवाणी हे राष्ट्रपती होण्यास कायद्याची काहीच आडकाठी नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. पण विरोधी पक्ष या मुद्द्यावरून रान पेटवतील हे नक्की. याचा फायदा भाजपलाच होणार आहे. अडवाणी यांचे इतर पक्षांतील नेत्यांशी असलेले संबंध ध्यानात घेता राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नसलेले नितीशकुमार आणि इतर अनेक महत्त्वाचे पक्ष अडवाणींच्या बाजूने कौल देण्याची शक्यता अधिक आहे. तसेच शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिल्यास अडवाणी राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचतील. मात्र हे जर किंवा तर च्या गप्पा झाल्या. एखाद्या माणसावर एवढा गंभीर मुद्दावरील खटला सुरु असताना त्यांना राष्ट्रपती करणे हे संकेतास धरुन नाही. परंतु भाजपाने अनेक संकेत आजवर धुळीस मिळविले आहेत. त्यामुळे कदाचित अडवाणींना ही राष्ट्राध्यक्षपदाची लॉटरी लागू शकते. त्याचबरोबर आणखी एक नाव चर्चेत आहे ते विद्यमान लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांचे. खरे तर त्या सलग नऊ वेळा आपल्या मतदारसंघातून विजयी झालेल्या आहेत व भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. लोकसभेच्या सभापती म्हणून त्यांची कामगिरी देखील नजरेत भरणारी आहे. सलग आठ वेळा विजयी झाल्यावर त्यांना 2014 साली निवडणूक लढवायची नव्हती. मात्र नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या विनंतीवरुन त्यांनी ती लोकसभा लढविली. आता कदाचित त्यांना राष्ट्रपतीपद बहाल करुन त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव केला जाऊ शकतो. त्यांचे माहेर कोकणातील असल्यामुळे शिवसेना मराठी उमेदवार दिल्यामुळे त्यांच्या नावाला पाठिंबा देऊ शकते. यापूर्वी शिवसेनेने प्रतिभाताई पाटील या मराठी असल्यामुळे त्यांना मतदान केले होते, याची यावेळी आठवण येते. कोकणची ही कन्या राष्ट्रपती झाल्यास केवळ कोकणाचाच नव्हे तर संपूर्ण राज्याचाच सन्मान ठरेल. त्याचबरोबर आणखी एक आश्यर्य वाटावे असे नाव सध्या राष्ट्रपतीपदासाठी चर्चेच आहे व ते म्हणजे, उद्योगपती रतन टाटा यांचे. गेल्या सहा-आठ महिन्यांपूर्वीरतन टाटा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरसंघचालकांकडे राष्ट्रपती होण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे समजते. अशा प्रकारे कॉर्पोरेट क्षेत्रातील नामवंत उद्योगपतीस राष्ट्रपतीपदी नियुक्त करुन भाजपा व नरेंद्र मोदी हे एक वेगळाच संदेश देऊ इच्छित असतील. आजवर अशा प्रकारे देशाच्या उद्योगपतीला या सर्वोच्च पदी बसवून जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांमध्ये एक नवा विश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. एकूणच पाहता राष्ट्रपतीपदाची निवडणूक आता हळूहळू रंगू लागली आहे. यात नेमकी माळ कोणाच्या गळ्यात पडते ते पहायचे.
---------------------------------------------------------------    

0 Response to "राष्ट्रपती कोण?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel