-->
उष्णतेचा चढता पारा

उष्णतेचा चढता पारा

शुक्रवार दि. 31 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
उष्णतेचा चढता पारा
गेल्या दोन दिवसात उष्णतेने कहर केला असून रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील भिरा येथे 46.6 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले आहे. हे देशातील सर्वाधिक असून जगातील हे दुसर्‍या क्रमांकाचे आहे. केवळ रायगडातच नाही महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आदी राज्यातही तापमानात वाढ होणार असल्याचे यापूर्वीच प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र त्यांचा हा अंदाज खरा ठरला आहे. हवेची दिशा व तीव्रता बदलल्याने गुजरात-राजस्थानकडून जमिनीच्या पातळीवरुन येणारे उत्तर-पश्‍चिम वारे उष्ण आहेत. अशातच उष्ण लहरींचे वारे वाहत असल्याने उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात उष्णतेची लाट पुढील दोन दिवस राहणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस रायगडवर उष्ण लहरी वार्‍यांचे संकट घोंगावत राहिल. मुंबईसह रायगड जिल्ह्यातील तसेच संपूर्ण कोकणपट्टीत अनेक भागात 37 ते 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद रायगड जिल्ह्यातील भिरा येथे 46.6 अंश सेल्सिअस इतकी झाली. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष हे भिरा या ग्रामीण भागातील गावाकडे लागले आहे. गुरुवारी या परिस्थीतीत थोडा बदल झाला व भिराला मागे सारुन खामगावने पहिला क्रमांक पटकाविला आहे. उत्तर-पश्‍चिम दिशेने राजस्थानच्या बाजूने येणारे उष्ण वारे विदर्भ आणि मध्य भारतावर आदळत असल्याने सर्वच ठिकाणी पारा 3 ते 4 अंशाने चढला होताच. मात्र गेल्या दोन दिवसात हा पारा वेगाने वाढला आणि ही स्थिती मोठी चिंतादायक ठरावी अशीच आहे. तापमानात वाढ झाल्याचा फटका केवळ मनुष्यालाच नाही तर प्राणीमात्रांनाही  सहन  करावा लागत आहे. माणगांव तालुक्यातील भिरा येथे मंगळवारी 46.6 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली होती. तर दि. 1 एप्रिलपर्यंत तापमान तेवढेच राहणार असून दि. 2 एप्रिलनंतर 1 अंश सेल्सिअसने प्रतिदिन पारा घसरण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मात्र तोपर्यंत रायगड जिल्ह्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील नागरिकांचा घाम निघणार हे आता नक्की. आजवर राज्यात उष्णतेची लाट येते. विदर्भ व मराठवाड्यातील जनतेला 45 अंश सेल्सिअस हे तापमान काही नवीन वाटत नाही. मात्र आजवर रायगड जिल्ह्यात एवढा पारा कधी चढला नव्हता. त्याबद्दल अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. उत्तर भारतात जिकडे उन्हाळा व थंडी हे दोन्ही मोसम टोकाचे असतात तेथे असा प्रकारच्या हवामानाची सवय असते. मात्र कोकणपट्टीत उन्हाळा असला तरी 45 अंशांच्यावर फारसे जात नाही. परंतु यावेळी काही तरी निसर्गाचे चक्र बिघडलेले दिसते. आता देशाच्या अनेक भागात टोकाचे हवामान आपल्याला आढळते. गेल्या पाच वर्षातील हवामानच्या संदर्भात झालेला हा एक मोठा बदल म्हटला पाहिजे. मात्र यामागचे नेमके कारण याविषयातील तज्ज्ञ काही देऊ शकलेले नाहीत. गेल्या पाच वर्षात पावसाळाही किमान महिनाभर लांबला आहे. गेल्या वर्षी तर समाधानकारक पाऊस झाला असला तरी त्याअगोदरची किमान तीन वर्षे पाऊसच कमी झाला होता. आता उन्हाळ्यात टोकाचे हवामान निर्माण झाले आहे. पर्यावरणवादी याचा अर्थातच मानवाच्या साधनसंपत्तीच्या नाश करण्याला दोष देतील. परंतु याचे नेमके कारण काय असेल हे कुणीच सांगू शकलेले नाही. भिराच्या या चढलेल्या पार्‍याचे नेमके कारण शोधण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडील जनतेला अशा प्रकारच्या उन्हाळ्याची फारशी सवय नाही, त्यामुळे उन्हाळ्याशी मुकाबला करण्यासाठी पावले उचलली गेली पाहिजेत. यासाठी लोकांचे प्रबोधन करण्याचे काम आरोग्य खात्यावर आले आहे.

0 Response to "उष्णतेचा चढता पारा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel