-->
अखेर निवडणूक रद्द!

अखेर निवडणूक रद्द!

मंगळवार दि. 11 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
अखेर निवडणूक रद्द!
एखाद्या उमेदवाराचे निधन झाल्यास निवडणूक रद्द होते किंवा बोगस मतदान झाल्यासही निवडणूक रद्द होऊ शकते. मात्र चक्क पैशाचा वारेमाप खर्च होत असल्याचे आढळल्याने एक पोटनिवडणूक चक्क रद्द करावी लागली आहे. तामिळानाडूत आर.के.नगर विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पैशाच्या प्रचंड वापरामुळे येथील मतदान निवडणूक आयोगाला रद्द करावी लागली आहे. या ठिकाणी 12 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार होती. पण तामिळनाडूमधील निवडणूक अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर निवडणूक अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. प्रतिष्ठेच्या झालेल्या या पोटनिवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे आणि भेटवस्तूंचा वारेमाप वापर केला गेला. त्यामुळे निवडणुकीत निष्पक्षपातीपणा संपुष्टात आला होता. आता या सर्वांचा प्रभाव संपुष्टात आल्यावर योग्यवेळी मतदान घेतले जाईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मात्र हा प्रभाव कमी खरोखरीच होईल का, असा सवाल आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर या मतदार संघातील जागा रिक्त झाली होती. निवडणूक प्रचारादरम्यान तामिळनाडूचे मंत्री सी. विजयभास्कर यांच्या एका सहकार्‍याच्या घरातून 89 कोटी रुपये मिळाले होते. विजय भास्कर हे एआयडीएमकेच्या शशिकला गटाचे उमेदवार टीटीव्ही दिनकरन यांचे विश्‍वासू मानले जातात. या पोटनिवडणुकीत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची आमिषे दाखवण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यात मोबाईल रिचार्जपासून वर्तमानपत्राच्या बिलांपर्यंतची आमिषे दाखवली गेली. निवडणूक आयोगाने देखरेखीसाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्ग तैनात केल्यानंतरही हे गैरप्रकार रोखणे अवघड झाले होते. तामीळनाडू हे सध्या सत्ता संघर्षाचे एक मोठे केंद्र झाले आहे. भाजपाची इकडे ताकद नगण्य असली तरीही त्यांची इच्छा मोठी आहे व त्यासाठी त्यांची पैसा खर्च करण्याची तयारी आहे. त्याचबरोबर एआयडीएमके या पक्षाकडेही सत्तेच्या जोडीला पैसाही मुबलक आहे. त्यामुळे दोन धनाढ्यांची ही लढत आहे. यात निवडणूक आयोग देखील हतबल झाल्याचे विदारक चित्र आपल्यापुढे दिसते.
----------------------------------------------------------

0 Response to "अखेर निवडणूक रद्द!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel