-->
हरहुन्नरी विनोद खन्ना

हरहुन्नरी विनोद खन्ना

शुक्रवार दि. 28 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
हरहुन्नरी विनोद खन्ना
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांनी गुरुवारी वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा आजारपणातील एक फोटो व्हायरल झाला होता, तो फोटो पाहाताच अनेकांना एकेकाळच्या स्मार्ट दिसणार्‍या या अभिनेत्याची झालेली अवस्था पाहून वाईट वाटले. पाकिस्तानातील पेशावर येथून फाळणीनंतर आलेले त्यांचे कुटुंबिय ते आजपर्यंत विनोद खन्ना यांनी केलेली वाटचाल पाहता एक हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याअड गेला असेच म्हणावे लागेल. हिंदी चित्रपटसृष्टीत व्हिलन म्हणून काम केलेल्यांवर कायमचा तोच ठप्पा लागतो व त्या अभिनेत्याच्या नशिबात कायमस्वरुपी व्हिलनचीच कामे येतात. मात्र त्याला विनोद खन्ना हे अपवाद ठरले. 1968 साली त्यांनी मेरे अपने या चित्रपटात व्हिलनची भूमिका केली होती. हा चित्रपट हिट होऊनही त्यांच्या मागे आयुष्यभर व्हिलनची भूमिका काही चिकटली नाही. विनोद खन्ना यांचे आयुष्य हे अनेक टप्प्यात बदलत गेले ते त्यांच्या मृत्यूपर्यंत. त्यांचे अनेक चित्रपट हिट होत असताना त्यांनी अचानक बॉलिवूडला रामराम केले आणि त्यांनी आचार्य रजनिश यांचे शिष्यत्व पत्करले.
त्यावेळी ते अज्ञातवासात असल्यासारखेच होते. त्याच काळात त्यांचा घटस्फोटही झाला. त्यानंतर पाच वर्षांनी ते पुन्हा चित्रपटसृष्टीत परतले. त्यांच्या फॅन्सनी त्यांचे पुन्हा एकदा जोरदार स्वागत केले. 1997 साली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि गुरदासपूर मतदारसंघातून खासदार झाले. 2002 साली ते वाजपेयींच्या सरकारमध्ये सुरुवातीला सांस्कृतिक व पर्यंटन मंत्री व नंतर विदेश राज्यमंत्री होते. 2014 साली ते पुन्हा याच मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे या अभिनेत्याने एक कलाकार म्हणून, त्यानंतर सन्यसी जीवन व त्यानंतर पुन्हा अभिनेता म्हणून व त्यानंतर राजकारण अशा विविध क्षेत्रात काम केले व आपला ठसा उमटविला. मात्र त्यांची अभिनेता म्हणून आजही सर्वांना आठवण आहे. विनोद खन्ना यांनी मेरे अपने, कुर्बानी, पूरब और पश्‍चिम, रेशमा और शेरा, हाथ की सफाई, हेरा फेरी, मुकद्दर का सिकंदर यांसारखे अनेक शानदार हिट सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. शाहरुख खान आणि वरुण धवन यांच्यासोबत दिलवाले या सिनेमात ते शेवटचे दिसले होते. 1968 ते 2013 या 45 वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत त्यांनी एकूण 141 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, मुकद्दर का सिंकदर, गद्दार, जेल यात्रा, इम्तिहान, इन्कार, अमर अकबर अँन्थनी, राजपूत, कुरबानी, कुदरत, दयावान, कारनामा, सुर्या, जुर्म या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मेरा गाव, मेरा देशमधील त्यांनी खलनायकाची भूमिका विशेष गाजली. अचानकमधील भूमिकेसाठी समीक्षकांनी त्यांना दाद दिली. अशा प्रकारे अभिनेता, राजकारणी, अध्यात्म यात त्यांनी आपले करिअर केले आणि गाजवलेही. आयुष्याच्या शेवटी मात्र त्यांना झालेल्या कॅन्सरमधून ते काही पुन्हा उभे राहू शकले नाहीत आणि हा हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याअड गेला.

0 Response to "हरहुन्नरी विनोद खन्ना"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel