-->
सेन्सेक्सची उत्तुंग भरारी

सेन्सेक्सची उत्तुंग भरारी

शुक्रवार दि. 28 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
सेन्सेक्सची उत्तुंग भरारी
देशातील सर्वात जुना असलेल्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने पहिल्यांदाच इतिहासातील 30 हजाराचा पल्ला पार केला आहे. दोन वर्षांपूर्वी सेन्सेक्सने 30 हजार पर्यंत पल्ला गाठला होता. मात्र हा पल्ला पार करण्यात आला नव्हता. आता हा पल्ला पार झाल्याने शेअर बाजारात, गुंतवणूकदारांमध्ये व दलालांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. शेअर बाजाराच्या सेन्सेक्सचा इतिहास पाहिल्यास दहा वर्षापूर्वी हाच सेन्सेक्स 20 हजारांवर होता. म्हणजे गेल्या दहा वर्षात सेन्सेक्सने दहा हजाराने उसळी मारली आहे. प्रामुख्याने केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आल्यापासून सेन्सेक्स सातत्याने उसळत होता. मात्र अर्थव्यवस्था अपेक्षेएवढी तेजीत नसल्याने मध्येच त्याला ब्रेकही लागत होता. मोदींची पंतप्रधानपदी निवड झाल्यापासून हा निर्देशाकं तब्बल 50 टक्क्यांनी वधारला आहे. सध्या जागतिक पातळीवरील मंदीचे ढग थोड्या प्रमाणात निवळत असताना त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेला फायदा मिळत आहे. त्यामुळे भविष्यात आणखी चांगली कामगिरी सध्याचे सरकार करेल या अपेक्षावर सध्याची शेअर बाजारात तेजी आली आहे. तसेच कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले येऊ लागले आहेत. जागतिक बाजारातील मंदी आता कमी होऊ लागल्याने विदेशी गुंतवणुकीचा ओघ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येत्या दोन महिन्यात जी.एस.टी. लागू होणार आहे. तसेच नोटाबंदीनंतर अर्थकारण स्थिरावत असल्याचे शेअर बाजाराला वाटू लागल्याने शेअर बाजारात तेजी आली आहे. अर्थात जागतिक पातळीवरील प्रमुख शेअर बाजारात सध्या तेजी आली आहे. त्याचाच एक परिणाम आपल्याला देशात दिसत आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही आशिया खंडातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असून यंदा चांगला पावसाळा अपेक्षित असल्याने ग्रामीण भागातून खरेदी वाढेल व अर्थव्यवस्थेला त्यातून चालना मिळेल असा अंदाज आहे. आपल्यापुढील अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. प्रामुख्याने जी.एस.टी. सुरु झाल्यावर पहिली दोन वर्षे महागाई वाढत जाण्याचा धोका आहे. तसेच सरकारने नोटाबंदी केली खरी परंतु अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष करातील सुधारणा या आता पुढील टप्प्यात कराव्या लागणार आहेत. तसे न केल्यास काळ्या पैशाचा संचय वाढत जाईल. त्यामुळे नोटाबंदीचा दीर्घकालीन फायदा घेता येणार नाही. निर्यात वाढीला अजूनही वेग मिळत नाही. असा स्थितीत शेअर बाजार केवळ भविष्यात चांंगले दिवस येतील या आशेवर उत्तुंग भरारी घेत आहे.
--------------------------------------------------

0 Response to "सेन्सेक्सची उत्तुंग भरारी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel