-->
स्वारी शुक्रावर

स्वारी शुक्रावर

बुधवार दि. 26 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
स्वारी शुक्रावर
मानवाला नेहमीच परग्रहाचे आकर्षण राहिले आहे. कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे, कोणत्या ग्रहावर कसे वातावरण आहे, याची मानवाला नेहमीच उत्सुकता असते. शास्त्रज्ञांनी गेली कित्येक शतके याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपल्याकडे भारतीय संशोधन याबाबतीत वेग घेत आहे. आपल्या ग्रहमालेतील शुक्र या ग्रहाची रहस्ये उलगडण्यासाठी भारताने तेथे यान पाठविण्याची योजना अद्याप प्राथमिक स्तरावर असली तरी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) याची जय्यत तयारी सुरु केली आहे. व्हिनस मिशनमध्ये कोणते वैज्ञानिक प्रयोग करावेत याविषयीचे प्रस्ताव पाठविण्याचे देशभरातील वैज्ञानिकांना आवाहन केले आहे. इस्रोने त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या माहितीनुसार शुक्र ग्रहाच्या दिशेने पाठवायच्या उपग्रहाचे वजन अंदाजे 175 किग्रॅ एवढे असण्याची अपेक्षा असून त्यावर 500 वॉट वीज उपलब्ध असेल. हा उपग्रह 500 बाय 60 हजार किमी अंतराच्या लंबवर्तुळाकार कक्षेतून शुक्राभोवती घिरट्या घालेल. काही महिन्यांनी ही कक्षा कमी होईल. हे यान शुक्राभोवती प्रदक्षिणा करीत असताना कोणते प्रयोग केले जाऊ शकतील याची संकल्पना वैज्ञानिकांना तयार करता यावी यासाठी इस्रोने ही प्राथमिक माहिती प्रसृत केली आहे. शुक्र ग्रहाच्या वातावरणाचा व पृष्ठभागाचा अभ्यास, सूर्य व शुक्राचे परस्पर संबंध, प्राणीशास्त्रीय प्रयोग आणि नव्या तंत्रज्ञानाची तपासणी व सिद्धता यावर या मिशनमध्ये भर असेल व त्यादृष्टीने वैज्ञानिकांनी करायचे वैज्ञानिक प्रयोग सुचवावेत, अशी अपेक्षा आहे. या मिशनला सरकारकडून मंजुरी मिळाली असून संसदेने संमत केलेल्या लेखानुदानातही याचा उल्लेख आहे. मात्र या मिशनचा नक्की कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही. आकार, वस्तुमान, घनता व गुरुत्वाकर्षण इत्यादींच्या बाबतीत बरेच साम्य असल्याने शुक्र हे पृथ्वीची जुळे भावंड मानले जाते. सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी व शुक्र या दोन्ही ग्रहांची निर्मिती एकाच वेळी झाली असावे, असे वैज्ञानिकांना वाटते. मात्र शुक्राच्या या मोहिमेमुळे आपल्याला या ग्रहाविषयी आणखी अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. आजवर अमेरिका यात अग्रस्थानी होती. मात्र भारतीय संशोधन संस्थेने यात भरारी घेतली आहे व वेगाने काम हाती घेतली आहे. याचा सर्वसामान्य भारतीयास अभिमान निश्‍चित वाटेल.
---------------------------------------------------------------

0 Response to "स्वारी शुक्रावर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel