-->
मायक्रो फायनान्स हे आधुनिक पठाणच

मायक्रो फायनान्स हे आधुनिक पठाणच

सोमवार दि. 17 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
मायक्रो फायनान्स
हे आधुनिक पठाणच
आपल्याकडे व्याज देणारे पठाण आता संपले आहेत. गेल्या दोन दशकात व्याजाने पैसे देणारे पठाण आता आपल्याला फारसे पहायला मिळत नाहीत. मात्र त्याची जागा आता आधुनिक काळातील पठाणांनी घेतली आहे. खासगी सावकारी ही त्यातीलच एक पठाण ठरले आहेत. मात्र मायक्रो फायनान्स या कंपन्या देखील याला काही अपवाद राहिलेल्या नाहीत. या कंपन्या बचत गटाच्या गोंडस नावाने काम करुन ग्रामीण भागातील अनेक गरीबांना नाडत असल्याचे आढळले आहे. आधुनिक काळातील हे पटाणच आहेत असे म्हटल्यास त्यात काही वावगे ठरु नये. सोलापुरातील सुमारे 70 हजार महिला विडी कामगारांना मायक्रो फायनान्स कंपन्यांचा चांगलाच विळखा पडला असून यात कर्जाची परतफेड करता येईना म्हणून विडी कामगार पार खचत चालल्या आहेत. त्यातून आत्महत्या करून थेट मृत्यूला कवटाळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. मायक्रो फायनान्स अशा प्रकारे गरीबांना नाडण्याचे व सावकारशाही रेटण्याचे काम आपल्या विविध कर्ज योजनांनतून करीत आहे. सोलापूरातील वीणकर समाजातील गोरगरीब महिला मोठया संख्येने विडी उद्योगात काम करतात. विधवा, परित्यक्ता असलेल्या महिलांसह आर्थिकदृष्टया गरीब असलेल्या महिलांना विडी वळण्याच्या कामाचा मोठा आधार मिळतो. मुळात किमान वेतनापेक्षा कमी मजुरीत काम करणार्‍या महिला विडी कामगारांवर एकापाठोपाठ संकटांची मालिका सुरूच आहे. या महिलांना संघटीत करण्याचे आजवर बरेच प्रयत्न झाले मात्र त्यात अनेकांना फारसे यश आलेले नाही. आता मात्र या महिलांना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आर्थिकदृट्या नाडण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय धूम्रपानविरोधी कायद्यातील कठोर तरतुदीमुळे तयार विडी बंडलाच्या वेष्टनाचा तब्बल 85 टक्के भाग वैधानिक इशार्‍यासाठी वापरण्याचे बंधन आहे. त्यामुळे विडी उद्योग घटत आहे. विडी पिणार्‍यांची संख्या गेल्या काही वर्षात कमी झाली आहे. परिणामी विडी कामगारांचा रोजगारही संकटात आला आहे. यातच गतवर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीचा फटका विडी कामगारांना मोठया प्रमाणात बसला होता. दोन-तीन महिने विडी कामगारांना मजुरीपासून वंचित राहावे लागले असताना दुसरीकडे बँंकांद्वारेच मजुरी अदा करण्याचे बंधन घालण्यात आल्याने अशिक्षित विडी कामगार वैतागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर मायक्रो फायनान्स कंपन्यांनी नाडलेल्या या विडी कामगारांच्या भोवती कर्जवसुलीचा फास आवळायला सुरूवात केल्यानंतर कर्ज परतफेड कशी करायची, या विवंचनेतून आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय विडी कामगार घेत आहेत. बहुतांशी महिला मनाने खंबीर असतात. कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची मानसिकता त्यांच्या अंगी बाणवलेली असते. परंतु सोलापुरात महिला विडी कामगार अशा आर्थिक विवंचनेमुळे पार खचल्या आहेत. त्यातून आत्महत्यांचे प्रकार वाढू लागले आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पैसा नसल्याने आलेल्या नैराश्येतून आत्महत्येचा मार्ग पत्करण्याचे प्रमाण वाढले आहेत. मराठवाडा व विदर्भाच्या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची प्रकरणे वाढत असताना आता त्यात विडी कामगारांची भर पडली आहे. ही बाब अतिशय चिंतनीय असून त्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी सरकारवर आहे. सरकारने पहिल्या टप्प्यातच यावर उपाययोजना केल्या पाहिजेत अन्यथा शेतकर्‍यांच्या आत्महत्या प्रकरणांप्रमाणे विडी कामगारांच्या आत्महत्या आवाक्याबाहेर जातील.

0 Response to "मायक्रो फायनान्स हे आधुनिक पठाणच"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel