-->
अस्वस्थ राणे; थंड कॉग्रेस

अस्वस्थ राणे; थंड कॉग्रेस

शनिवार दि. 25 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
अस्वस्थ राणे; थंड कॉग्रेस
माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायणराव राणे हे सध्या फारच अस्वस्थ आहेत. त्यांनी काही कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व अनेक अफवांना वाट मोकळी करुन दिली. राणे पुन्हा शिवसेनेत स्वगृही चालले आहेत किंवा भाजपामध्ये जाण्यासठी दरवाजे ठोठावत आहेत अशा त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालींबद्दल बातम्या प्रसुत होऊ लागल्या. या अफवांना उत आला असताना राणे यांनी काल पत्रकारांना आपण कॉग्रेसमध्येच राहाणार असून अन्य कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचा खुलासा केला आहे. मात्र हे ठासून सांगत असताना भूकंप काही सांगून होत नाही असे सांगण्यास ते काही विसरले नाहीत. त्यामुळे राणे खरोखरीच अन्य पक्षात जातात की काय अशी कुणकूण सुरुच राहिली आहे. आपल्या विरोधात कॉग्रेसमधीलच लोक अफवा पसरवित आहेत अशी टिपणी त्यांनी केली आहे. राणे पक्षात अस्वस्थ आहेत यात काही शंका नाही. अर्थात सध्या सत्तेत नाही ही खंत तर आहेच शिवाय कॉग्रेस पक्ष सध्या विरोधात असूनही जी त्यांच्यात थंडपणा आला आहे याची खदखद नारायणरावांना जास्त आहे. कारण राणे हे आक्रमकपणाबद्दल ओळखेल जातात. शिवसेनेसारख्या पक्षात त्यांनी 35 वर्षे काढल्यावर ते कॉग्रेसमध्ये आले आहेत. आता कॉग्रेसमध्ये येऊनही त्यांना एक तप झाले असले तरीही तथाकथीत कॉग्रेस संस्कृतीशी त्यांची नाळ म्हणावी तशी जुळलेली नाही. थंडा करके खाव ही कॉग्रेसची संस्कृती त्यांना मान्य नाही. जे काही असेल ते सडेतोडपणे मांडणारे नारायण राणे आहेत. त्यामुळे कॉग्रेसचे नेते सध्या विरोधात असतानाही जनतेच्या प्रश्‍नावर आक्रमक नाहीत त्याची त्यांना खंत वाटते. अशा वेळी त्यांच्यातला जुना शिवसैनिक जागा होतो. राणेंनी पक्षाच्या संदर्भात जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यात काही चूक आहे असे नव्हे. रत्नागिरी जिल्ह्याला गेली अडीज वर्षे पक्षाने अध्यक्षच दिलेला नाही. अशा स्थितीत तिकडे पक्षाची नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाताहात झाली. पक्षाचे जबाबदार नेतृत्वच जर नसेल तर कुणाला जाब विचारावयाचा असा प्रश्‍न त्यांनी जो उपस्थित केला आहे तो काही चुकीचा नाही. आज कॉग्रेस पक्ष पराभवातून अजूनही अडीज वर्षानंतर सावरलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. केंद्रात झालेला मोदींकडून पराभव, त्यानंतर राज्यातला पराभव आणि त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांतील पराभवाची मालिका कायमच राहिल्याने कॉग्रेस आणखीनच दुबळा झाला आहे. यातून पत्र नेतृत्व अगदी केंद्रीय नेतृत्वापासून ते स्थानिक पातळीवरील नेतृत्वापर्ंयत कुणीच सावरलेला नाही. पक्षाने निवडणुका लढविल्या तरी त्यात लढवय्या वृत्ती नव्हती. मानपासून त्या लढवल्या गेल्या नाहीत. नियोजनातला अभाव व ढिसाळपणा आणि त्याहून सर्वात महत्वाचे विश्‍वास गमावलेला असल्याने अलिकडच्या निवडणुका कॉग्रेसने गमावल्या आहेत. अर्थात कॉग्रसेमध्ये सध्या तरी तजेला येऊ शकत नाही असेच वातावरण आहे. मात्र त्याचबरोबर कॉग्रेसने राणेना आश्‍वासन दिलेले मुख्यमंत्रीपद दिले नसले तरीही पक्षाने त्यांना अनेक महत्वाची पदे दिली आहेत. महसूलमंत्रीपद त्यांनी प्रदीर्घ काळ भूषविले. अगदी त्यांचा पराभव झाल्यावरही त्यांना विधानपरिषदेवर पाठविले ते कॉग्रेसनेच. त्यामुळे कॉग्रेसने त्यांना अगदीच काही दिला नाही असे बोलता येणार नाही. मात्र नारायणरावांच्या अपेक्षा सध्या तरी कॉग्रेस पूर्ण करु शकणार नाही हे वास्तव आहे. अर्थात नारायणराव सध्याच्या स्थितीत शिवसेना असो किंवा भाजपात गेले तरीही त्यांना फारसे काही हाताला लागणार नाही. त्यापेक्षा कॉग्रेसमध्येच त्यांनी राहणे त्यांच्या भविष्यातील राजकीय करिअरच्यादृष्टीने योग्यच आहे. पण अस्वस्थ राणेंना सांगेल कोण? व ते एैकणार तरी कोणाचे असा प्रश्‍न आहे.

0 Response to "अस्वस्थ राणे; थंड कॉग्रेस"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel