Tuesday, 18 April 2017

नक्षलवादी चळवळीचे पितामह

बुधवार दि. 19 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
नक्षलवादी चळवळीचे पितामह
देशातील नक्षलवादी चळवळीतील एक प्रमुख नेते व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-माओवादी या पक्षाचे दुसर्‍या क्रमांकाचे नेते नारायण संन्याल यांचे सोमवारी रात्री कोलकाता येथे वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले. सी.पी.आय.(माओवादी) या पक्षाचे सरचिटणीस एल.लक्ष्मण राव यांच्या नंतर त्यांचे पक्षात स्थान होते. गेली काही वर्षे ते प्रकृती अस्वासाथामुळे पक्षात सक्रिय नव्हते. मात्र चळवळीशी काही ना काही कारणाने जोडलेले होते. त्यांच्या जाण्याने नक्षलवादी चळवळीतील एक प्रमुख नेता, ज्यांना आपण नक्षलवादी चळवळीतील पितामह म्हणू शकतो, तोे काळाच्या पडद्याअड गेला आहे. नारायण संन्याल हे सध्याच्या नक्षलवादी चळवळीतील नेत्यांसारखे नव्हते. नक्षलवादाच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी आपल्या खांद्यावर लाल झेंडा घेतला होता. शेवटपर्यंत व आपल्या विचारांशी व आपल्या तत्वज्ञानाशी प्रामाणिक राहिले. गेल्या तीन दशकात नक्षलवादी चळवळीत अनेक बदल झाले. कामगार, कष्टकर्‍यांच्या खर्‍या स्वातंत्र्यासाठी आपल्याला सशस्त्र उठावच केला पाहिजे व तोच क्रांतीचा खरा मार्ग आहे. बंदुकीच्या गोळीनेच अनेक उत्तरे दिले दिली पाहिजेत, असे मानत मोठी झालेली नक्षलवादी चळवळ आज आपले तत्वज्ञान बाजुला ठेवून अतिरेक्यांशी जऴळीक साधण्यापासून ते खंडणी गोळा करण्यांपर्यंत पोहोचली आहे. सध्याच्या नक्षलवाद्यांच्या या कृत्यांमुळे एकूणच डाव्या चळवळीला यातून बदनाम केले जात आहे. मात्र संन्याल हे या पिढीचे टोकाचे जाऊन सशस्त्र लढा देणार्‍यातले पुढारी नव्हते. एक बाब आजही खरी आहे की, सशस्त्र लढा हेच उत्तर आहे, असे मानणारे ते जरुर होते, मात्र त्यासाठी त्यांनी आपल्या तत्वज्ञानाशी तडजोड केली नाही. त्यावेळच्या एकसंघ असमार्‍या बांगलातील बोगरा जिल्हयातील एक सधन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आता हा जिल्हा बांगला देशात आहे. सुरुवातीपासून त्यांना फुटबॉलची विशेष आवड होती. त्यामुळे हा मुलगा फुटबॉलचा खेळाडू होईल व आपले नाव काढेल असा घरच्यांचा कयास होता. मात्र त्यांचा हा अंदाज पूर्णपणे खोटा ठरला. तरुणपणातच नारायण संन्याल हे डाव्या चळवळीकडे ओढले गेले. त्यांचे वडिल हे स्वातंत्र्यसैनिक होते व जिल्ह्याचे कॉग्रेसचे नेते होते. त्यांच्या घरी कॉग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांची उठबस असे. त्याकाळच्या कॉग्रेसच्या नेत्या सरोजिनी नायडू, पश्‍चिम बंगालच्या स्थापनेनंतर झालेले तेथील दुसरे मुख्यमंत्री बी.सी. रॉय हे त्यांच्या घरी नेहमी येत असत. आपल्या मुलाने देखील कॉग्रेस पक्षात काम करावे असे त्यांच्या वडिलांना नेहमी वाटे. परंतु संन्याल हे सुरुवातीपासूनच डाव्या चळवळीकडे ओढले गेले होते. 1940 साली संन्याल कुटुंब हे पश्‍चिम बंगालमध्ये स्थायिक झाले आणि त्यानंतर तर तेथील कडव्या नक्षलवादी चळवळीशी ते जोडले गेले. कोलकात्यातील युनायटेड बँक ऑफ इंडियात ते नोकरीला लागले. 1960 साली त्यांनी नोकरी सोडली व सी.पी.आय.(मार्क्स-लेनिनवादी) या पक्षात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून दाखल झाले. त्यावेळी पश्‍चिम बंगालमध्ये व देशातील अनेक भागात नक्षलवादी चळवळ जोरात होती. त्याकाळी तरुणांचा ओढा डाव्या पक्षांकडे जास्त होता. स्वातंत्र्य मिळून दोन दशके ओलांडूनही देश विकासाच्या प्रगतीपथावर नव्हता त्यामुळे यातील नक्षलवाद्यांचे ठाम मत होते की, ब्रिटीशांशी समझोता करुन मिळविलेले हे स्वातंत्र आपल्याला नको आहे. सशस्त्र लढा करुन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून कामगार व कष्टकर्‍यांची सत्ता स्थापन करावयाची आहे. त्यांच्याकडे त्यावेळच्या सोव्हिएत युनियनच्या क्रांतीपेक्षा चीनमधील मोओंच्या क्रांतीची प्रेरणा होती. नारायण संन्याल हे याच पिढीतील होते. सी.पी.आय.(एम.एल.) या पक्षात बिहारचे नेते सत्यनारायण सिंग यांच्या नेतृत्वाखाली फूट पडली. संन्याल हे आपल्या मूळ पक्षातच राहिले व त्यांनी बिहारमधील भूमिहीन, लहान शेतकर्‍यांना संघटीत करण्याचे ठरविले. 1972 साली त्यांना अटक झाली व 1977 साली पश्‍चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीचे सरकार आल्यावर त्यांची सुटका झाली. डाव्या आघाडीने सत्तेत आल्यावर अनेक नक्षलवाद्यांची शिक्षा माफ केली होती, त्यात संन्याल यांची सुटका झाली. सुटका झाल्यावर संन्याल पुन्हा बिहारला पक्ष बांधणी करण्यासाठी भूमिहीनांमध्ये काम करु लागले. 1980 साली त्यांनी नक्षलवादी विचारांच्या विविध गटांना एकत्र करुन त्यांचा एक पक्ष स्थापन करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. अर्थात त्यांचे हे काम काही सोपे नव्हते. तरीही त्यांनी मोठ्या जिद्दीने केले. यासाठी त्यांना वैचारिक संघर्ष करावा लागला व यातून सी.पी.आय.(एम.एल.) पार्टी युनिटी हा नवा पक्ष स्थापन झाला. यात त्यांनी विविक्ष लहान नक्षली विचारांच्या गटांना एकत्र आणले. 1980 साली बिहारमधील मोठ्या जमीनदारांच्या खासगी सेनांच्या विरोधात या नव्या पक्षाने मोठे आंदोलन केले. वेळ पडेल त्यावेळी त्यांच्याशी त्यांना त्यांच्या भाषेत चोख उत्तर दिले. यासाठी त्यांच्या सशस्त्र सेनेचा फायदा झाला. 1990 साली पार्टी युनिटी, माओवादी कम्युनिस्ट सेंटर व पिपल्स वॉर ग्रुप या तीन नक्षली संघटनांना एकत्र आणण्यात त्यांना यश आले. यातही संन्याल यांची महत्वाची भूमिका होती. 2004 साली त्यांनी अशा विविध गटांना एकत्र आणले व सी.पी.आय.-माओवादीची स्थापना झाली. त्यांना कसे एकत्र आणले त्याचे गुपित त्यांनी कधीच उघड केले नाही. यासंबंधी ते बोलणेही टाळत असत. आता त्यांच्या जाण्याने नक्षली गटांना एकत्र कसे आणले हे गुपित गुपितच राहिले आहे. आता तर त्यांच्या जाण्याने नक्षलवादी चळवळीचे पितामह काळाच्या पडद्याआड गेले आहेत, असेच म्हणता येईल.
----------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment