-->
गणेशोत्सवाची चाहूल

गणेशोत्सवाची चाहूल

गुरुवार दि. 27 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
गणेशोत्सवाची चाहूल
कोकणातील चाकरमान्यांचा आता गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणार्‍या गाड्यांचे आरक्षण सुरू होताच अवघ्या काही तासांमध्ये फुल्ल झाले आहे. रेल्वे नियमानुसार रविवारी आणि सोमवारी कोकणात धावणार्‍या नियमित गाड्यांचे आरक्षण सुरू करण्यात आले. मात्र, अवघ्या काही वेळातच 400 हून अधिकच्या प्रतीक्षा यादीची तिकिटे प्रवाशांच्या हाती पडली आहेत. रेल्वे आरक्षण 120 दिवस अगोदर सुरू करण्यात येत असल्याने 21 आणि 22 ऑगस्टकरिता आरक्षण सुरु झाल्यानंतर वेटिंग लिस्टची तिकिटे हाती पडल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात म्हणजे लाखोंच्या संख्येत असते. या काळात रेल्वे प्रशासनाकडून जादा गाड्यादेखील सोडण्यात येतात. या गाड्यांमुळे अनेकदा जादा गाड्यांच्या वेळापत्रकात अनियमितता होते. त्यामुळे बहुतांश प्रवासी कोकण रेल्वेमार्गावर धावणार्‍या नियमित गाड्यांना प्राधान्य देतात. त्यामुळे रविवारी 21 ऑगस्ट आणि सोमवारी 22 ऑगस्टचे बुकींग सुरु होताच अवघ्या काही तासांमध्ये गाड्या फुल्ल झाल्या असून, कोकणकन्या, राज्यराणी या नियमित गाड्यांची वेटींग लिस्ट 400 ते 450 वर पोहोचली आहे. तर जनशताब्दी एक्सप्रेसचे 22 ऑगस्टचे आरक्षण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई आणि परिसरातून कोकणात जाणार्‍या भाविकांची श्रावणापासूनच तयारी सुरू होते. गणपती उत्सवाला जाण्यासाठी अगोदरपासूनच नियोजन सुरू होते. यंदाच्या वर्षी शुक्रवार 25 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे कोकण वा मध्य रेल्वेच्या गाड्यांचे तिकीट आरक्षण 21 एप्रिलपासून सुरु झाले आहे. मेल, एक्स्प्रेससाठी रेल्वेच्या नियमाप्रमाणे 120 दिवस अगोदर आरक्षण करता येते. गतवर्षी पेक्षा यावर्षी गणरायाचे आगमन 20 दिवस अगोदर म्हणजे 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे आता सोडण्यात येणार्‍या जादा गाड्यांवर कोकणात जाणार्‍या भाविकांची भिस्त असणार आहे. गणेशोत्सव, नाताळ, होळी आणि उन्हाळी सुट्टीच्या काळात कोकणात जाणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक असते. अजूनही गणेशोत्सवाला तब्बल चार महिने आहेत. मात्र कोकण रेल्वेवडील गाड्या फूल्ल होण्यास सुरुवात झाल्याने खर्‍या अर्थाने गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे, असे म्हणता येईल. कोकणात जायला एस.टी. व आता तर ए.सी. असलेली व्हॉल्वोची शिवनेरी देखील प्रायोगिक तत्वावर सुरु केल्याने तसेच स्वत:चे वाहन घेऊन जाणारे अनेक लोक असले तरीही सर्वात पहिले प्राधान्य हे कोकणी माणूस रेल्वेलाच देतो. कारण रेल्वेचा प्रवास सुखकारक असतोच शिवाय सवलीततही असतो. हा प्रकल्प सुरु होऊन 25 वर्षे लोटली असली तरीही अजून प्रवाशांना प्रवासासाठी सबसिडी दिली जाते. गणपती उत्सवासाठी जाताना चाकरमनी पैशाकडे बघत नाही, मिळेल ते वाहन व तिकीटासाठी कितीही पैसे मोजून आपल्या गावी जाण्याची त्याची मानसिकता असते. मात्र स्वस्त असलेली व सुरक्षित असल्याने तो रेल्वेला पसंती देतो. याचा परिणाम म्हणून रेल्वेवर जादा ताण येत असतो. आता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेवर विशेष लक्ष देऊन कोकणी माणसाला जास्तित जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी जातीने लक्ष घालण्याचे ठरविले आहे. गेल्या वर्षात कोकणातून जाणार्‍या आठ नवीन गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जास्त प्रवासी यावेळी जाऊ शकतील. मात्र एकाच वेळी लाखो प्रवासी जात असल्यामुळे प्रत्येकांना तिकिट मिळणेही अशक्य ठरते. मात्र गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आता दोन वर्षात कोकण रेल्वेने स्थानिक जनतेसाठी जादा गाड्या सोडल्या आहेत, हे वास्तव नाकारता येणार नाही. याचे सर्व श्रेय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना जाते. गणेशोत्सवाची आता चाहूल लागल्याने यंदा देखील कोकणी माणसाला सध्याच्याच जुन्या रस्त्यावरुन जाण्याची पाळी येणार आहे, यचे वाईट वाटते. केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे दुपदरीकरण करण्याचे ठरविले आहे व त्याचे काम आता वेग घेत आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षाने कोकणी माणूस रस्त्यावरुन आपल्या गावी चार-पाच तासात पोहोचेल. सध्या या रस्त्याच्या कामाचा वेग पाहता रस्त्याचे कामदोन वर्षात पूर्ण होईल. सध्या या रस्त्यावर दरवर्षी हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत, याला आळा बसेल हे नक्की. या रस्त्याच्या उभारणीसाठी अनेकांना आपली जमीन द्यावी लागणार आहे, त्यासाटी त्यांना सरकारने चांगली नुकसानभरपाई दिली आहे. तसेच अनेक झाडांचे पुर्नरोपण करण्यात येणार आहे. एकीकडे रस्ता चांगला झाल्यावर कोकण रेल्वेवरील भारही कमी होण्यास मदत होणार आहे. त्याच्या जोडीला सरकारने आता समुद्रमार्गे प्रवास कसा सुरु करता येईल याची चाचपणी केली आहे. तीन दशकांपूर्वी बंद झालेली सागरी वाहतूक पुन्हा एकदा नव्या दमाने सुरु करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. तसे झाल्यास मुंबई ते गोव्या पर्यंत तसेच कोकणातील प्रवाशांना तसेच पर्यटकांना प्रवासाचे एक नवे दालन खुले होणार आहे. कोकणातील प्रवास पुन्हा एकदा बोटीने सुरु होईल. कोकण रेल्वे, चांगला रस्ता व त्या जोडीला बोटीची वाहतूक हे तीनही पर्याय खुले झाल्यावर कोकणातील प्रवास सुखकारक होणार आहे. अर्थात यासाठी किमान दोन वर्षांची वाट बघावी लागणार आहे. अर्थातच त्याची तयारी कोकणी माणसाची आहे. आजवर त्याने बराच काळ वाट बघीतली आहे, त्यात आता अजून काही काळ. सध्यातरी त्याचा गणेशाच्या भेटीचा मार्ग अडथळ्यांचा ठरणार आहे.
------------------------------------------------------------

0 Response to "गणेशोत्सवाची चाहूल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel