-->
नरिमन खरेच बोलले

नरिमन खरेच बोलले

बुधवार दि. 29 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
नरिमन खरेच बोलले
तीन वषार्पूर्वी केंद्रात आलेले नरेंद्र मोदींचे सरकार आणि आता उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी करण्यात आलेली अध्यात्मिक गुरु महंत योगी आदित्यनाथ यांची नियुक्ती म्हणजे आपला भारत देश सावरकरप्रणीत हिंदुत्त्वाच्या दिशेने निघाला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ वकील आणि घटनातज्ज्ञ फली नरिमन यांनी म्हटले आहे. अर्थात नरिमन यांनी केलेले हे प्रतिपादन काही चुकीचे नाही. सध्या देशातील राजकीय पावले ही त्याचदृष्टीने पडत आहेत, असे म्हणता येईल. नरिमन हे काही मोदींचे विरोधक नाहीत की भक्तही नाहीत मोदींच्या ज्या चांगल्या बाबी आहेत त्यांचे ते मुक्तकंठाने स्तुतीही करतात. मात्र नरिमन हे घटनातज्ज्ञ असल्यामुळे त्यांचे वक्तव्य हे घटनेशी निगडीतच असते. 1975 च्या आणीबाणी वेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी याना विरोध करणारे नरिमन हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. नरिमन यांनी, भाजपचे नेते (त्यावेळी जनता पक्ष) लालकृष्ण आडवाणी यांना सांगितले होते की, त्यांचा पक्ष पुढील काळात, हिंदुत्त्वाकडे झुकेल. आणि आता अगदी तसेच घडत आहेे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सांगितलेल्या हिंदू राष्ट्र, हिंदू जाती आणि हिंदू संस्कृती या दिशेनेच भाजपा निघाला आहे, याकडे नरिमन यांनी लक्ष वेधलेे. नरिमन यांची भविष्यवाणी ही आजवर खरी होत आली आहे. त्याचे आणखी एक उदाहरण द्याचे म्हणजे भाजपाचे आमदार विक्रम सैनी यांनी केलेले वक्तव्य. गाईचा अनादर केल्यास आठवा किंवा गो-मातेची हत्या केल्यास, अशांचे हात आणि पाय मी तोडून टाकेन, अशी संतापजनक धमकी भाजप आमदार विक्रम सैनी यांनी दिली आहे. या आमदारानं गोवंशहत्येबद्दल वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर, राज्यातील अवैध कत्तलखान्यांवर कारवाई सुरू झाली आहे. तसेच उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी मुस्लिमविरोधी घोषणाबाजीही सुरु झाली आहे. त्यामुळे राज्यात वातावरण तापू लागले आहे. सन 2013 मध्ये मुझफ्फरनगर इथे झालेल्या दंगलीवेळी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याच्या आरोपावरून सैनींना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली होती. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान मिळालेले सुरेश राणा नुकतेच मुझफ्फरनगरमध्ये आले होते. त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमातच विक्रम सैनी यांनी अनेक बेताला वक्तव्ये केली. वंदे मातरम् म्हणायची ज्यांची इच्छा नसते, देशाचा जयजयकार करताना ज्यांना अभिमान वाटत नाही, जे गायीला माता मानत नाहीत किंवा तिची हत्या करतात, त्यांचे हात-पाच मोडायलाही मी कमी करणार नाही, असं ते म्हणाले. सैनी यांचा तोल सुटल्याचं पाहून उपस्थित नेत्यांनी नवल व्यक्त केले. पक्ष कार्यकर्त्यांंनी तर त्यांना भाषण संपवायला भाग पाडलं. भाजपच्या कोणाही मंत्री किंवा आमदारांनी वादग्रस्त विधानं करू नयेत, अशी तंबी योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. मात्र यापूर्वी मुख्यमंत्री होण्याअगोदर  महंत आदित्यनाथ यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांचाही समावेश होता. भाजपाला विकासाचा गाजरे दाखवीत आपला हिंदुत्वाचा अजेंडा राबवायचा आहे, हे अनेकदा सिध्द झाले आहे. नरिमन यांची शंका खरीच ठरणार हे नक्की.
-----------------------------------------------------

0 Response to "नरिमन खरेच बोलले"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel