-->
कोकणाच्या विकासाचे नवे पर्व

कोकणाच्या विकासाचे नवे पर्व

मंगळवार दि. 28 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
कोकणाच्या विकासाचे नवे पर्व
रत्नागिरीतील जयगड बंदर देशाला अर्पण करण्याचा व तेथून घाटमाथा रेल्वेने जोडण्याच्या झालेल्या पायाभरणी कार्यक्रमामुळे कोकणाच्या विकासाचे एक नवे पर्व सुरु झाले आहे असे म्हणता येईल. कोकणातील जयगड बंदर हे महाराष्ट्र व गोव्यातील किनारपट्टीवरील जवळपास मधोमध असलेले बंदर आहे. तसेच या बंदराभोवती अनेक प्रकल्प सध्या असल्याने तसेच अनेक प्रकल्प येऊ घातल्याने जयगड बंदर हे आगामी काळात चांगलेच विकसीत होईल यात काही शंका नाही. या बंदरावर दोन लाख टन क्षमतेचे अवाढव्य जहाज या किनारपट्टीवर लागल्याने याला विशेष महत्व आहे. त्याचबरोबर येथे जहाजांच्या दुरुस्तीची सोय असल्याने जहाजांसाठी एक मोठी जमेची बाजू ठरणार आहे. सध्या येथे दुबई किंवा आपल्या भौगोलिक परिसरातील बंदरात जाऊन जहाजे दुरुस्त करण्याएवजी ती जयगडला येऊ आपली दुरुस्ती करु लागली आहेत. जहाजांना तेथे दुरुस्ती करण्यापेक्षा जयगडला करणे आर्थिकदृष्ट्या परवडते. त्यामुळे येथे नवीन रोजगार निर्मीतीचे एक साधन निर्माण झाले आहे. 750 कि.मी. लांबीची किनारपट्टी आपल्याला लाभली असली तरी आपण त्याचा व्यावसायिकदृष्टीने फारसा उपयोग करुन घेतलेला नाही. आता त्यादृष्टीने काही सकारात्मक पावले पडू लागली आहेत. आता येथे मोठी जहाजे येऊ लागल्याने कोकणात व्यापाराचे एक नवे दालन खुले झाले आहे. कोकण किनारपट्टीवर लहान-मध्यम-मोठी अशी सुमारे 40 बंदरे उभी राहू शकतात. एकदा येथे बंदरे उभी राहिली की तेथील स्थानिक गरजांनुसार, आयात-निर्यातीचे प्रकल्प उभे राहू शकतात. महत्वाची बाब म्हणजे सध्या कोल्हापूर व त्याच्या परिसरातील साखर कारखाने कांडला किंवा अन्य बंदरातून साखर निर्यात करतात. त्यांच्यासाठी जयगड बंदर हे वरदान ठरणार आहे. ब्राझीलहून कच्ची साखर आयात करुन येथील साखर कारखान्यात प्रक्रिया करुन त्याची निर्यात करणे हा एक मोठा व्यवसाय आहे. हा व्यवसाय आपण काबीज करु शकतो. जलवाहतूक ही रस्ते व रेल्वेच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. एखाद्या वस्तूची वाहतूक करायला रस्त्याव्दारे दीड रुपया पडत असेल तर रेल्वेव्दारे त्याला एक रुपया पडतो. तर जलवाहतुकीने त्याला केवळ 20 पैसेच पडतात. यावरुन जलवाहतूक किती स्वस्त आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. कोकण रेल्वेवरील ट्रक वाहून नेण्याची रो-रो सेवा यामुळेच लोकप्रीय झाली आहे. राज्याच्या किनारपट्टीचा आपण अशा प्रकारे वापर करुन राज्याच्या तिजोरीत भर घालू शकतो. गुजरातमधील हजिरा व त्याच्या परिसरातील किनारपट्टी ही गेल्या वीस वर्षात झपाट्याने विकसीत झाली. रिलायन्सपासून अनेक कंपन्यांनी येथील किनारपट्टीच्या लगत प्रकल्प उभारले आहेत. परंतु गुजरात व कोकणातील किनारपट्टी यात मूलभूत फरक आहे व तो म्हणजे दोन्हीकडील जमिनीची सुपिकता व त्यामुळे जमीनींच्या वाढलेल्या किंमती. गुजरातमध्ये किनारपट्टीवरील जमीनी या नापिक होत्या. त्यामळे तेथे जमीन ताब्यात घेणे सोपेही  गेले व त्या जमीनी कवडीमोलाने उपलब्ध झाल्या. तेथे शेतकर्‍यांनी जमीनी आनंदाने  दिल्या. कोकणात मात्र वेगळी परिस्थीती आहे. जमीनी महाग आहेत व सुपीकही आहेत, परिणामी येथे जमीनी देण्यास शेतकर्‍यांचा विरोधही आहे. अर्थात जैतापूर येथे नियोजित अणूउर्जा प्रकल्पाला कातळ जमीन असूनही त्याला विरोध झाला कारण तो केवळ राजकीय होता. आपल्याकडे शेतकर्‍यांच्या हिताची चर्चा करीत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार या निमित्ताने झाला. असो.  येथील जमीनीला सर्वात जास्त दर दिला गेला, याचे कारण तो सरकारी प्रकल्प होता. खासगी उद्योजकाला एवढा दर देणे परवडणारे नाही. कोकणाचा विचार करता येथे रस्ते, पाणी व बर्‍यापैकी जीवनमान आहे. त्यामुळे कोकणात  लोक खाऊन-पिऊन सुखी आहेत. त्यांचा जीनवस्तर गुजरातमधील किनारपट्टीचा विचार करता केव्हाही कित्येक पटीने चांगला आहे. अशा वेळी त्याला बेघर करणारे प्रकल्प नको आहेत. मात्र सर्वांगिण विकास करावयाचा असेल तर अशा प्रकल्पांची गरज आहे हे येथील जनतेला पटवून देण्याची आवश्यकता आहे. आज कोकणात अनेक प्रकल्प येण्यास इच्छुक आहेत. परंतु जमीन ताब्यात घेणे हे एक मोठे संकट ठरले आहे. आता राज्य सरकार मोठी रिफायनरी आणण्याच्या तयारीत आहे. अगदी किनारपट्टीपासून 100 किमी दूर जागा मिळाली तरी चालू शकते अशी भूमिका गुंतवणूकदार कंपन्यांची आहे मात्र त्यासाठी जागा कुठे व कशी मिळणार हा मोठा सवाल आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पामुळे कोकणातील फळांचे उत्पादन धोक्यात येईल असाही धोका आहे. मात्र अशा प्रकारचे प्रकल्प आल्यामुळे एकूणच कोकणाचे उत्पन्न वाढणार आहे. अर्थाच यामुळे कोकणातील पर्यटन उद्योगावर काही परिणाम होणार नाही, उलट तो वाढतच जाईल. कोकणातील विकास हा केवळ पर्यटन किंवा आंबा, नारळाच्या उत्पादनातून होऊ शकत नाही. त्यासाठी जर अशा प्रकारच्या मोठ्या प्रकल्पांची साथ लाभणे जरुरीचे आहे. यासाठी राजाकरण बाजूला ठेवून सर्वपक्षांनी काम करण्याची आवश्यकता आहे. आता येऊ घातलेल्या सागरमाला प्रकल्पाने कोकणात रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी कोकणी माणसाने आपला दृष्टीकोन बदलून याचे स्वागत केले पाहिजे. त्यातच मुंबई-गोवा महामार्ग दुपदरी होत आहे. रेल्वे मार्गही दुपदरी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातून नजिकच्या काळात कोकणाचे रुपडे पालटणार आहे. त्याचया संधी घेण्यासाठी कोकणी माणसाने सज्ज झाले पाहिजे.
----------------------------------------

0 Response to "कोकणाच्या विकासाचे नवे पर्व"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel