-->
जेनिरिक औषधांचा प्रसार वाढवा

जेनिरिक औषधांचा प्रसार वाढवा

मंगळवार दि. 25 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
जेनिरिक औषधांचा प्रसार वाढवा
रुग्णांना बाहेरून आणायची औषधे लिहून देताना ब्रँडेड नावे न लिहिता औषधांची फक्त जेनेरिक नावेच लिहून द्यावीत आणि औषधाची चिठ्ठी सुवाच्य अक्षरात लिहावी, असे आदेश मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने देशभरातील सर्व डॉक्टरांना काढलेे असून, याचे पालन न करणार्‍यांवर कारवाई करण्याची तंबी दिली आहे. या निर्णयाचे सर्व पातळ्यांवर स्वागत झाले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात सूरतमध्ये एका इस्पितळाचे उद्घाटन करताना डॉक्टरांनी जेनेरिक औषधे द्यावीत व यासाठी सरकार कडक नियम करेल, असे सूतोवाच केले होते. डॉक्टर गिचमिड अक्षरात जे लिहून देतात ते रुग्णांना तर वाचता येत नाही अनेकदा मेडिकल स्टोअरमध्ये देखील औषदे देणार्‍यांना अवघड जाते. याच्या परिणामी खासगी मेडिकल स्टोअर्समधून गरिबांच्या हाती महागडी ब्रँडेड औषधे सोपविली जातात, असे पंतप्रधान म्हणाले होते, हे शंभर टक्के वास्तव खरे आहे. पंतप्रधानांचा हा इशारा लक्षात घेऊन डॉक्टरी व्यवसायाचे नियमन करणार्‍या मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेने यासंदर्भात गेल्या वर्षी दिलेल्या निर्देशांचे स्मरण देत नवे परिपत्रक जारी केले आहे. गेल्या वर्षी मेडिकल कौन्सिलने डॉक्टरांसाठी आचारसंहितेमधील कलम 1.5मध्ये सुधारणा करून डॉक्टरांनी ब्रँडेड औषधांऐवजी फक्त जेनेरिक औषधेच लिहून देणे बंधनकारक केले होते. कौन्सिलकडे नोंदणी केलेल्या देशभरातील सर्व डॉक्टरांनी याचे कसोशीने पालन करावे, असे नवे परिपत्रक सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना, सर्व सार्वजनिक इस्पितळांच्या संचालकांना व सर्व राज्यांच्या मेडिकल कौन्सिलच्या अध्यक्षांना पाठविण्यात आले आहे. डॉक्टरांनी तर्कसंगत औषधे लिहून द्यावीत व निष्कारण अव्वाच्या सव्वा औषधे लिहून देण्याचे टाळावे, असेही यात नमूद करण्यात आले आहे. जेनिरिक औषधे म्हणजे नेमके काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडेल. कारण त्यांना जेनिरिक औषधे व ब्रँडेड औषधे यातील नेमका फारक माहित नसतो. सर्वसामान्य माणूस डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे दुकानात जाऊन खरेदी करतो. त्यावेळी त्याला आपण काय खरेदी करतो त्याची कल्पना नसते. कारण डॉक्टर त्याला नेहमीच ब्रँडेड औषधे लिहून देतात. जेनिरिक औषधेे म्हणजे काय? जागतिक पातळीवरील बहुराष्ट्रीय कंपन्या कित्येक वर्षांच्या संशोधनानंतर शोधल्या गेलेल्या फॉर्म्युल्यानुसार औषधे तयार करीत असतात. यासाठी त्यांना करोडो रुपये खर्च येत असतो. औषधाचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च कमी असेल तर संशोधनावरील खर्च भरून काढणे कंपनीसाठी अत्यावश्यक असते. त्यासाठी या औषधांची निर्मिती करण्याचा हक्क काही वर्षांकरिता (सुमारे 20 वर्षे) फक्त त्याच कंपनीला देण्यात येतो व ती औषधे कंपनीच्या नावानेच बाजारात उपलब्ध होतात. या दरम्यान औषधाच्या संशोधनावरील खर्च वसूल झाल्यानंतर इतर औषध कंपन्यांना ही औषधे तयार करता येतात. या औषधात वापरलेल्या रासायनिक संयुगांवरून ती औषधे ओळखता येतात. त्यामुळे या कंपनीचा त्या औषधावरील हक्क संपुष्टात आल्यावर त्याचे उत्पादन अन्य कोणत्याही कंपन्या करु शकतात. त्यांनी केलेली ही औषधे मात्र खूपच स्वस्त असतात. या औषधांना जेनिरिक औषधे असे संबोधिले जाते. जेनिरिक औषधे म्हणजे ती काही दुय्यम दज्र्याची नसतात तर त्यांचा दर्जा उत्कृष्ट असतो. फक्त देशातील तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या डॉक्टरांना त्यांची औषधे लिहून देण्यासाठी आग्रह धरीत असतात त्यामुळे डॉक्टर जेनिरिक औषधे लिहून देत नाहीत. मात्र आता सरकारने यासंबंधी योग्य पाऊल टाकल्याने डॉक्टरांची मोठी अडचण होणार आहे. अर्थात या आजारी असलेल्यांना फायदा होणार हे नक्की. आता त्याचबरोबर जेनिरिक औषधे ठिकठिकाणी उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी जेनिरिक औषधांचा प्रचार व प्रसार करणे तसेच त्यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर सुरु करणे आवश्यक ठरणार आहे. जेनिरिक औषधांची दुकाने उघडण्यासाठी सहकारी संस्था, महिलांचे बचत गट व स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. कारण डॉक्टरांनी नुसती औषधे लिहून देऊन भागणार नाही तर ती औषधे बाजारात उपलब्ध केली पाहिजेत. आयुर्वेद आणि युनानी वैद्यकीय पदवी (बीएएमएस, बीयूएमएस) असलेले डॉक्टरही सर्रास अ‍ॅलोपथीची औषधे लिहून देतात. मात्र या डॉक्टरांवर मेडिकल कौन्सिलचे बंधन असणार नाही. त्यामुळे या अन्य वैद्यक शाखांच्या कौन्सिल त्यांच्या डॉक्टरांना अ‍ॅलोपथीची औषधे देण्यास मज्जाव करणार नाहीत तोपर्यंत रुग्णहितासाठी उचलले जात असलेले हे पाऊल सर्वंकश आणि परिणामकारक ठरणार नाही. एकीकडे अमेरिका जेनेरिक औषधांमुळे अब्ज डॉलर वाचवत असताना दुसरीकडे भारतीय कंपन्या जेनेरिक औषधांची मोठ्या प्रमाणावर निर्यात करत असून देशात मात्र ब्रँडेड नावानेच औषधे विकत आहेत. त्यामुळे भविष्यात ब्रँडेड औषधांचा काळाबाजार संपुष्टात यावा आणि जेनेरिक औषधांकडे आरोग्यसेवा क्षेत्र वळावे, यासाठी फार्मासिस्ट असोसिएशनने सोशल मीडियाचा वापर करण्याचे ठरविले आहे. सरकारच्या या आदेशामुळे लाखो जीवांचे प्राण वाचू शकतात. तसेच अनेकांना ज्यांना औषधे परवडत नाहीत त्यांना जेनिरिक औषधे घेऊन आपला प्राण वाचविता येईल. 90 टक्के रोगांवर जेनिरिक औषधे चालू शकतात. मात्र फारच कमी रोगांसाठी ब्रँडेड औषधांचा वापर करण्याशिवाय काही पर्याय राहात नाही. त्यामुळे जेनिरिक औषधांचा वापर वाढण्यासाठी एक चांगले पाऊल टाकले आहे. आता जनतेने याचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे.
--------------------------------------------------

0 Response to "जेनिरिक औषधांचा प्रसार वाढवा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel