-->
आनंद मावळला

आनंद मावळला

सोमवार दि. 27 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
आनंद मावळला
आपल्याकडील जनतेला अच्छे दिन अजून काही दिसलेले नाहीत, मात्र कदाचित त्यामुळेच आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पुन्हा एकदा घसरला आहे असे दिसते. कारण जगातील आनंदी देशांच्या यादीत भारत गतवर्षीच्या तुलनेत चार अंकांनी अधिक खाली आला आहे. भारताचा 2013-14 मध्ये 118 वा क्रमांक होता. आता भारत 122 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. नरेंद्र मोदींनी आश्‍वासन दिलेले जर अच्छे दिन खरोखरीच दिसले असते तर लोकांमध्ये आनंद वाढला असता असे म्हणण्यास वाव आहे. आनंदी देशांच्या यादीत भारत हा चीन, पाकिस्तान आणि नेपाळपेक्षाही मागे पडला आहे. या यादीत नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे. जगात सर्वाधिक श्रीमंत राहात असलेल्या अमेरिकेचीही गेल्या वर्षीपेक्षा एका क्रमांकाने घसरण आता ते 14व्या क्रमांकावर आहेत. जगातील आनंदी देशांची यादी तयार करताना  दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न, सामाजिक स्थिती, आरोग्यदायी जीवनशैली, भ्रष्टाचाराबाबतचा दृष्टिकोन हे तपासून आनंदाचेे मोजमाप करण्यात येते. चीन, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, इराक आणि श्रीलंका या देशांनीदेखील भारताच्या पुढे मजल मारली आहे. आपल्याकडे असलेला आर्थिक, सामाजिक असमतोल, वाढती बेरोजगारी, स्पर्धा, कौटुंबिक ताणतणाव, बदलती जीवनशैली यामुळे आनंदी राहाण्यास अनेक मर्यादा येत असाव्यात. आपल्याकडे आनंदी राहाणे तर दूरच परंतु गेल्या काही वर्षात हिंसेंचे जे प्रकार होत आहेत व आत्महत्येचे प्रकार वाढत आहेत ते पाहता चींता करण्यासारखी स्थीती आहे. मागील वर्षी देशभरात दीड लाख स्त्री- पुरुषांनी विविध कारणांनी आत्महत्या केली आहे. महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक संवेदनशील आणि कमी सोशिक असतात असे आढळले आहे. आत्महत्या करणार्‍यांमध्ये 71 टक्के पुरुष आणि 67 टक्के महिला असल्याचे उघड झाले आहे. यात 14 ते 40 वयोगटांतील शेतकरी, विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार यांचा समावेश आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्येचाही फार मोठा गंभीर प्रश्‍न मराहाष्ट्र सरकारकडे आहे. यासाठी विविध उपाययोजना केल्या तरी आत्महत्या काही कमी झालेल्या नाहीत.आपल्या देशात दरवर्षी किमान 15 ते 18 हजार नागरिक आत्महत्येचा मार्ग निवडतात. आपल्याकडे मात्र जनतेतील हा आनंद हिरावून घेतला का जात आहे व त्यासाठी कोणता उपाययोजना कराव्या लागतील यासाठी सरकार काहीच पावले उचलत नाही. जपान, स्वीडन, ब्रिटन, चीन या देशांनी नैराश्येने ग्रासलेल्यांकरिता मदत केंद्रे उभी केली आहेत. आपल्याकडे नैराश्यातून बाहेर येण्यासाठी घरगुती पातळीवर उपाय योजले जातात. मात्र हरवलेला हा आनंद पुन्हा आपल्याला मिळवावाच लागेल. कारण आपल्या देशातील जनतेचे प्रश्‍न ज्यावेळी सुटतील त्यावेळी आपण आनंदाच्या दिशेने आधिक वेगाने वाटचाल करु असे दिसते. सद्या तर देशातील जनतेला अच्छे दिनची भूरळ पडली होती. परंतु हे स्वप्न काही प्रत्यक्षात उतरेल असे दिसत नाही. त्यामुळे आपण आनंदी देशांच्या यादीत दिवसेंदिवस घसरतच जाऊ असे दिसते.

0 Response to "आनंद मावळला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel